टेक्स्टाईल्स अँण्ड क्लोदिंग - टेलर होणार ग्लोबल

By Admin | Published: May 14, 2014 02:35 PM2014-05-14T14:35:41+5:302014-05-14T14:35:41+5:30

जुन्या हिंदी सिनेमात एक दृश्य कायम असायचं, मशिन चालवत कपडे शिवणारी, खोकणारी म्हातारी आई.

Textiles & Clothing - Taylor to Global | टेक्स्टाईल्स अँण्ड क्लोदिंग - टेलर होणार ग्लोबल

टेक्स्टाईल्स अँण्ड क्लोदिंग - टेलर होणार ग्लोबल

googlenewsNext
>जुन्या हिंदी सिनेमात एक दृश्य कायम असायचं, मशिन चालवत कपडे शिवणारी, खोकणारी म्हातारी आई. तिचे ते सुईत दोरा ओवून ओवून खाचा झालेले डोळे. आणि तरीही पोटाची खळगी न भरल्याचं दु:ख.
असंच काहीसं चित्र तुमच्या डोळ्यासमोर वस्त्रोद्योगाचं असेल तर ते पुसा कारण ब्लॅक अँण्ड व्हाईटचाच काय पण इस्टमन कलरचा जमाना जाऊन मल्टिप्लेक्सचा जमाना जसा सिनेमात आला तसा या वस्त्रोद्योगाच्या जगातही आला आहेच. जुने कळकट, कमी पैशातले जग मागे पडून आता नवीन व्हायब्रण्ट कलरचे चकाचक मोठय़ा टर्नओव्हरचे दिवस या जगात दाखल होत आहे.
या जगाला मराठीत ‘वस्त्रोद्योग’ आणि इंग्रजीत ‘टेक्स्टाईल्स अँण्ड क्लोदिंग’ असं म्हणतात.
वस्त्रोद्योगाच्या या जगात डोकावून पाहिलं तर एक मोठी समस्या दिसते, प्रशिक्षित मनुष्यबळच न मिळण्याची. आणि येत्या काही वर्षांत या उद्योगासमोरची ही समस्या वाढेल कारण या उद्योगात मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होते आहे.
त्याचं कारणही उघड आहे, भारत सरकारने वस्त्रोद्योगात शंभर टक्के ‘एफडीआय’ला म्हणजेच थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. त्यामुळेच जगभरातले कपड्यांचे बडेबडे ब्रॅण्डस् आता भारतात गुंतवणूक करू लागले आहे. वॉलमार्टसारखा ब्रॅण्ड लवकरच भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवणार आहे. ‘मेड इन इंडिया’ असा टॅग लावलेले जास्तीत जास्त कपडे जगभरातल्या बाजारपेठेत लवकरच दिसू लागतील. (आज भारतापेक्षाही या व्यवसायात बांग्लादेश आघाडीवर आहे.) रेडिमेड कपड्यांची बाजारपेठच नाही तर मोठा निर्यातदार देश म्हणून भारतीय वस्त्रोद्योगाची ओळख निर्माण होऊ शकेल, अशी चिन्हं आत्ताच दिसू लागली आहेत. एप्रिल २0१४ मध्ये सरलेल्या आर्थिक  वर्षात भारतीय गारमेण्ट एक्स्पोर्टमध्ये १५.५ % वाढ झाली. एका वर्षात १४ अब्ज ९४ लाख डॉलर्स इतकी उलाढाल या निर्यातीतून झाली, अशी ‘अँपिरल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल’ची माहिती आहे.
या सगळ्याचा अर्थ एवढाच की, उद्योग वाढतो आहे, काम वाढतं आहे आणि कामासाठी जास्तीत जास्त हातांची गरज आहे.
 
यंत्रमाग ऑपरेटर
यंत्रमाग अर्थात पॉवरलूम ऑपरेटरची या उद्योगाला गरज आहे. छोट्या शहरातल्या यंत्रमाग उद्योगासह बड्या यंत्रमागांवर काम करतील अशा प्रशिक्षित माणसांना मोठी मागणी असेल, असा अंदाज आहे.
 
रेडिमेड कपडे निर्मिती
जमानाच रेडिमेड कपड्यांचा आहे. ब्रॅण्डेड पासून साध्या रेडिमेड कपड्यांची मागणी पाहता रेडिमेड कपडे निर्मितीला येत्या काळात मोठा स्कोप आहे. तशी र्निमिती करू शकणार्‍या, कपडे शिवू शकणार्‍या प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढेल हे उघड आहे.
 
 फॅशन डिझाईन
 फॅशनप्रेमी तरुण मुलं-मुली स्वत:पुरता पर्सनलाईज्ड फॅशनचा विचार करू लागतील तसतसे छोट्या शहरातही फॅशन डिझायनरचे काम वाढेल. प्रत्येक व्यक्तीला तिच्या गरजेप्रमाणे ड्रेस डिझाईन करून देऊ शकतील अशा डिझायनर्सपासून मोठय़ा उद्योगातल्या डिझायनर्सपर्यंत प्रशिक्षित डिझायनर्सची येत्या काळात चलती असेल.
 
लोकरीच्या कपड्यांचे विणकर
जगभरात जसजशी कपड्यांची निर्यात वाढेल तसतसे विदेशातल्या थंडीत आवश्यक लोकरीच्या कपड्यांच्या निर्यातीला वेग येईल. त्यातून लोकरीचे कपडे बनवण्याचा उद्योग भारतात वाढेल. त्यासाठी विणकर आणि विणकाम करणार्‍यांना मोठी मागणी असेल.
 
टेलर
 टेलरकाम,  काय करायचं, कसलं बोअर ते.
असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका. घरगुती टेलरकाम करणार्‍यांपासून ते बड्या उद्योगात, कंपन्यातल्या मशिन्सवर टेलरकाम करणार्‍यांची मोठी मागणी आजच आहे. ती वाढत जाईल.
 

Web Title: Textiles & Clothing - Taylor to Global

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.