‘ऑलिम्पिक’ फॅक्टरी! ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या ईर्ष्येने झपाटलेल्या नाशिकच्या मैदानांवरून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 09:43 AM2018-03-01T09:43:54+5:302018-03-01T09:43:54+5:30

नाशिकचा जुना लौकिक सामाजिक चळवळींचा, साहित्यिक कर्तृत्वाचा, कांदा-द्राक्षांचा आणि नंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाइनसाठीचा! त्यात आता एक नवी ओळख जोडली जाते आहे.

'Olympic' factory! From the heart of the nasal grounds of insinuation to get a medal in the Olympics ... | ‘ऑलिम्पिक’ फॅक्टरी! ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या ईर्ष्येने झपाटलेल्या नाशिकच्या मैदानांवरून...

‘ऑलिम्पिक’ फॅक्टरी! ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याच्या ईर्ष्येने झपाटलेल्या नाशिकच्या मैदानांवरून...

googlenewsNext

- समीर मराठे

नाशिकचा जुना लौकिक सामाजिक चळवळींचा, साहित्यिक कर्तृत्वाचा, कांदा-द्राक्षांचा आणि नंतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाइनसाठीचा! त्यात आता एक नवी ओळख जोडली जाते आहे. या शहराने आपल्या मातीत आता ऑलिम्पिक-पदकासाठीची स्वप्ने रुजत घातली आहेत. आदिवासी पाड्यातून आलेल्या कविता राऊतने थेट ऑलिम्पिकपर्यंत मारलेली धडक या शहरातल्या मैदानांना नवी संजीवनी देऊन गेली आहे. अ‍ॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याच्या ध्यासाने झपाटलेले देशभरातले खेळाडू प्रशिक्षणासाठी नाशिकचा रस्ता धरतात. राज्य-राष्ट्रीय पातळीवर पदकांची लयलूट करणारी इथली माती आता आॅलिम्पिकच्या दारावर धडका द्यायला सज्ज होते आहे. ...ही जादू कशी घडली?


१९९६. बरोब्बर २२ वर्षांपूर्वीची गोष्ट..
‘सावरपाडा एक्स्प्रेस’; रिओ ऑलिम्पिअन कविता राऊत तेव्हा पाचवीत शिकत होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा आश्रमशाळेत. आश्रमशाळांच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा होणार होत्या. त्र्यंबकेश्वरजवळच्याच एका गावात.

कसं जाणार?
ठाणापाडा, बोरीपाडा, खरपडी आणि रायते या चारही आश्रमशाळांतील मुलांना गोळा करून त्यांना एका टेम्पोत कोंबलं गेलं! जवळपास दोनशे विद्यार्थी! टेम्पो निघाला स्पर्धेच्या ठिकाणी..
पण त्या ओबडधोबड, वळणावळणाच्या डोंगरी रस्त्यावर मध्येच टेम्पो उलटला. अगदी खाली डोकं वर पाय! जवळपास सगळीच मुलं जखमी झाली; पण सुदैवानं कुणालाच गंभीर मार लागला नव्हता.
कवितालाही बºयाच ठिकाणी खरचटलं होतं, हातातून, खांद्यातून रक्त येत होतं. प्रथमोपचार झाल्यानंतर मुलांना पुन्हा स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यात आलं. तशा जखमी अवस्थेतही कवितानं नंग्या पायांनी १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला!
कविता सांगते, ‘ती मुलगी ‘कविता’ होती की आणखी कोण, हे विसरून जा.. त्या मुलीला तुम्ही कोणत्याही नावानं हाक मारू शकता. एवढंच लक्षात घ्या, हे आहे ग्रामीण, आदिवासी भागांतलं टॅलेन्ट! अशा आणि यापेक्षाही टॅलेन्टेड ‘कविता’ इथं शेकड्यानं पडलेल्या आहेत. हे टॅलेन्ट फक्त हुडकायला हवं आणि त्याला पैलू पाडायला हवेत. बस्सं.. अशा कितीतरी कविता राऊत आणि ऑलिम्पिक खेळाडू या खाणीत सापडतील!’
कविता राऊतमधलं हे टॅलेन्ट पहिल्यांदा ओळखलं ते नाशिकमधल्या ‘स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’चे (‘साई’) कोच विजेंद्रसिंग यांनी. ते तिला नाशिकला घेऊन आले, कित्येक वर्षं स्वत:च्याच घरात मुलीसारखं सांभाळलं, नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर या हिºयाला पैलू पाडले आणि अल्पावधीतच हा हिरा चमकायला लागला.. राज्य, राष्टÑीय स्पर्धांत तिनं पदकांची लयलूट केली. २०१०च्या कॉमनवेल्थ गेम्समधे तर पदक मिळवून पन्नास वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवला. याआधी ट्रॅक इव्हेन्टमध्ये १९५८मध्ये मिल्खा सिंग यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं.. त्यानंतर थेट सावरपाड्याची कविता! कविताचा प्रवास त्यानंतर पार २०१६च्या आॅलिम्पिकपर्यंत पोहोचला. वयाच्या तेहेतिशीतही हा प्रवास अजूनही थांबलेला नाही.
पी. टी. उषानंतर अ‍ॅथलेटिक्समध्ये नाव गाजवलं ते कविता राऊतनं. नाशिकमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेलं हे पहिलं नाव.. पण ही सुरुवात होती. आज नाशिक ही नुसत्या राष्ट्रीय पातळीवरीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंची खाण बनली आहे. भारतभरात नाशिकचा दबदबा आहे, जो आशिया खंडापर्यंत पसरला आहे.
आगामी काही वर्षांत एकट्या नाशिकमधूनच किमान आठ-दहा खेळाडू आॅलिम्पिकपर्यंत खात्रीनं पोहोचतील! त्याची चुणूक त्यांनी मैदानावरच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीतून दाखवून दिली आहे.
नाशिकमध्ये दरवर्षी सरासरी किमान १५ ते २० राज्य, राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार होतात. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रीय स्तरावरचे जवळपास पाचशे खेळाडू एकट्या नाशिकनं दिले आहेत. आजच्या घडीलाही नाशिकमध्ये राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू शंभराच्या घरात आहेत. त्यातील काही खेळाडू आजच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताहेत. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या कविता राऊतनं आपला जो सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला होता, त्याची बरोबरी साधणारी किंवा त्यापेक्षाही चांगली वेळ आजच नाशिकच्या काही मुली देताहेत. याशिवाय अनेक तरुण मुलंही आहेत, ज्यांनी आत्ताच ऑलिम्पिकचा दरवाजा ठोठावायला सुरुवात केलीय..
अत्यंत कमी सोयी-सुविधा असतानाही इतके राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स खेळाडू घडवणारं नाशिक हे देशातलं कोणत्याही खेळातलं एकमेव उदाहरण आहे.
नाशिकमध्ये सराव करणाºया साºयाच तरुण खेळाडूंची कविता ही सर्वार्थानं ‘दीदी’ आहे. कारण कविताच्या रूपानं नाशिकमध्ये पहिल्यांदा अ‍ॅथलेटिक्सचा भक्कम पाया घातला गेला आणि तिच्याचकडून धडे घेऊन ही मुलंमुली आता जग पादाक्रांत करायला निघाली आहेत. आदिवासी पाड्यावरची कविता जर ऑलिम्पिकपर्यंत पोहोचू शकते, तर आपणही हे करू शकतो, हा आत्मविश्वास सर्वसामान्यांना मिळाला तो कवितामुळेच. ‘कविता’ हे नाव ऐकून आणि पाहूनच अनेक मुलामुलींनी मैदानावरील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ही मुलं आपल्याही पुढं जावीत, आपले आणि अ‍ॅथलेटिक्समधले विक्रम त्यांनी मोडावेत असं कविताचंही ध्येय आहे. त्यासाठी ‘कविता राऊत फाउण्डेशन’ आणि ‘एकलव्य अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’च्या माध्यमातून ती काम करते आहे.
आज संपूर्ण भारतभर आणि अगदी आशिया पातळीपर्यंत अ‍ॅथलेटिक्समध्ये नाशिकचा दबदबा आहे. का?.. कोणतंही शहर, कोणतंही ठिकाण एखाद्या खेळाचं इंटरनॅशनल, आॅलिम्पिक हब होण्याची नेमकी काय कारणं असतात?
नाशिकमधले खेळाडू, कोच, पालक, नागरिक या साºयांशी बोलल्यावर या
प्रश्नाचं उत्तर उलगडायला लागतं.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवलेल्या नाशिकच्या मोनिका आथरेशी बोलत होतो..
‘नाशिकमध्ये असं काय आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे एवढे खेळाडू इथं तयार होताहेत?’, असं विचारल्यावर तीच थेट प्रतिप्रश्न करते, ‘इथं असं काय नाही, ज्यामुळे खेळाडूंचं कसदार, दाणेदार पीक इथं उगवणार नाही? कुठल्याही मातीत खेळाडू घडायला जे काही लागतं, ते ते सारं नाशिकच्या मातीत आहे.. त्यामुळे इथून खेळाडू घडले तर त्यात काहीच नवल नाही!’
राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केल्यामुळे अ‍ॅथलेटिक्सच्या नॅशनल कॅम्पसाठी मोनिकाचं सिलेक्शन झालं. बंगळुरूला. वर्षं २००९. भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांत आणखी उत्तम कामगिरी करावी यासाठी त्यावेळी प्रमुख म्हणून रशियन कोचची नियुक्ती करण्यात आली होती. खेळाडू परफॉर्म करतोय, तोवर इथे राहता येतं. खेळाडूंच्या राहण्या, खाण्यापिण्यापासून ते उत्तम दर्जाच्या एकूण एक सोयी येथे उपलब्ध असतात. खेळाडूंनी फक्त आपल्या परफॉर्मन्सवर लक्ष द्यायचं.
मोनिका सांगते, ‘...पण या कॅम्पमध्ये माझी कामगिरी सुधारण्याऐवजी खालावत गेली, पदकं येत होती, मात्र परफॉर्मन्स डाउन होत होता, मी दुखापतींनी त्रस्त होते. कदाचित ओव्हर वर्कलोडचा, तिथल्या वातावरणाचा, तिखट-मसाल्याचा कणही न खाता केवळ उकडलेल्या पदार्थांच्या डाएटसक्तीचाही तो परिणाम असावा. दोन वर्षं मी बंगळुरूच्या कॅम्पमध्ये होते; पण परफॉर्मन्स सुधारत नसल्यानं कॅम्प सोडून मी पुन्हा नाशिकला, माझे नाशिकचे कोच विजेंद्रसिंग यांच्याकडे परतायचा निर्णय घेतला.. नाशिकला आल्यानंतर ‘रिकव्हर’ व्हायलाच मला सहा महिने लागले. पण नंतर माझी कामगिरी सुधारत गेली. २०१३ला परत नॅशनल कॅम्पसाठी माझं सिलेक्शन झालं. पण परत तोच प्रकार. परफॉर्मन्स डाउन! दुखापतीही वाढत गेल्या. २०१४ला मी निर्णय घेतला. रशियन कोचचं ट्रेनिंग सोडलं आणि पुन्हा कधीच कॅम्पमध्ये न जायचा ठाम निर्णय घेऊन परत नाशिकला आले. विजेंद्रसिंग सरांकडे! आज वाटतं, नॅशनल कॅम्पमध्ये न जाता नाशिकमध्येच राहिले असते, तर आणखी पुढे गेले असते. आयुष्याची अत्यंत बहुमोल अशी जवळपास चार वर्षं, अर्थातच ती वाया गेली असं मी म्हणणार नाही; पण त्याचा फारसा फायदा मात्र झाला नाही.
अर्थातच याचा सगळा दोष ती रशियन कोचला देत नाही, काही दोष ती स्वत:कडेही घेते; पण त्याचं मार्मिक विश्लेषण करताना मोनिका सांगते, कॅम्पमध्ये निवड होणारे खेळाडू मुळातच काही किमान गुणवत्तेचे असतात. त्यांना तिथे आयते, ‘तयार’ खेळाडू मिळतात. एखाद्याचा परफॉर्मन्स चांगला नाही झाला, त्याला काही दुखापत झाली, तर त्याच तोडीचे दुसरे खेळाडू तिथे तयार असतात. मग कोच त्या दुसºया खेळाडूवर कॉन्सन्ट्रेट करतात. हा खेळाडू आपोआपच स्पर्धेबाहेर आणि कॅम्पबाहेरही फेकला जातो. आपल्या पर्सनल कोचनं मात्र शून्यातून आपल्याला घडवलेलं असतं. आपली सगळी हिस्ट्री, क्षमता, प्लस पॉइंट्स हे सारं त्याला माहीत असतं. मुख्य म्हणजे त्याचा आपल्या विद्यार्थ्यावर ‘विश्वास’ असतो. या फेजमधून हा पुन्हा बाहेर येईल याची खात्री असते, त्यामुळे काहीही झालं तरी त्याचं बोट तो कधी सोडत नाही. खेळाडहीू मग जिद्दीनं पुन्हा मैदानावर परततोच.. माझ्याबाबत हेच झालं!.. आज मी जी काही आहे, ती केवळ माझ्या कोचमुळेच आहे.’
कोच हा खेळातला एक प्रमुख घटक; पण बरेच खेळाडू खेळातल्या राजकारणाचेही बळी ठरतात.
मूळच्या कोल्हापूरच्या; पण काही वर्षांपासून नाशिकमध्ये सराव करणाºया एका गुणी खेळाडूला तर तिच्या कोचनंच नाशिकला येण्यापासून सतत परावृत्त केलं. बाहेरगावी स्पर्धेला जाण्या-येण्यापासून ते तिथं राहणं आणि मिळालेल्या बक्षिसातली अर्धी रक्कम नियमितपणे कोचला देण्याचा पायंडाही त्यानं घालून दिला होता!.. राज्य स्तरावरील एका ठरावीक टप्प्याच्या पुढे ती सरकतच नव्हती. म्हणूनच तिला नाशिकला यायचं होतं; पण त्यासाठी कोणकोणत्या दिव्यांतून तिला जावं लागलं हे सांगताना तिच्या डोळ्यांत पाणी उभं राहतं.
उत्तर प्रदेशच्या रणजीत पटेल या आंतरराष्ट्रीय खेळाडूलाही खेळातल्या राजकारणामुळे तब्बल दोन-तीन वर्षं, सुमारे दहा राष्ट्रीय स्पर्धांना मुकावं लागलं. गेल्या तीन वर्षांपासून तो नाशिकमध्ये येऊन प्रॅक्टिस करतोय आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये नाशिकचं, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय..
असे अनेक किस्से.. पण त्यातून बाहेर पडून हे खेळाडू आपल्या कामगिरीकडे, आपल्या सरावाकडे लक्ष केंद्रित करताहेत.

खेळांतल्या उत्तम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कामगिरीमुळे परवाच नाशिकच्या संजीवनी जाधव या खेळाडूला आणि कोच विजेंद्रसिंग यांना राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्याच्या दिवशीही सकाळी, संध्याकाळी सरावासाठी ते मैदानावर हजर होते!
मैदानावरची ही कडक शिस्तच या मुलांचं वर्तमान आणि भविष्य घडवते आहे. आर्थिक परिस्थितीवर मात करीत संजीवनी जाधवनं नुकतंच स्वत:चं घर घेतलं. ज्या दिवशी मुंबईला शिवछत्रपती पुरस्कार स्वीकारायला जायचं त्याच दिवशी नेमकी तिच्या नव्या घराची वास्तुशांती होती. सारी निमंत्रणं अगोदरच दिली गेलेली होती.
सकाळी ९ वाजता तिला मुंबईसाठी रवाना व्हायचं होतं; पण त्या दिवशीही पहाटे ५ ते सकाळी साधारण साडेसात वाजेपर्यंतचा मैदानावरचा तिचा सराव चुकला नाही. कोच विजेंदसिंगही त्याच शिस्तीनं मैदानावर सराव घेत होते. पुरस्कार स्वीकारून मध्यरात्री ते परतले. तरीही दुसºया दिवशी पहाटे त्याच कडक शिस्तीनं पुन्हा मैदानावर हजर होते!
ही सारीच मुलं एका जिद्दीनं, एका अनामिक ध्येयानं वर्षानुवर्षं मैदानावर सराव करतात. रोज सकाळ-संध्याकाळ जवळपास पाच तास मैदानावर घाम गाळतात. आठवड्याला दोन-दोनशे किलोमीटर पळतात. कडाक्याची थंडी, वारा, पाऊस.. काहीही असो, पहाटे पाचला आणि संध्याकाळी साडेचारला मैदानावरची हजेरी कधी चुकत नाही..
कविता राऊत असो, मोनिका आथरे असो, संजीवनी जाधव किंवा त्यांच्यासारखेच इतर अनेक खेळाडू.. उत्साहानं सांगतात, मैदान हेच आमचं खरं घर आहे आणि इथले खेळाडू हेच आमचे कुटुंबीय! त्यामुळे वाढदिवस असो किंवा दिवाळी-दसºयासारखे मोठे सण.. हे सारं आम्ही मैदानावरच साजरं करतो!.. एक दिवसही खाडा नाही, सुटी नाही; पण त्यातही गंमत आहे, आनंद आहे, कधीही न संपणारी झिंग आहे.. ही झिंगच मैदानावरच्या आमच्या ‘अस्तित्वाचा’ ड्रायव्हिंग फोर्स आहे..
नाशिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सचं वातावरण आहे, आंतरराष्टÑीय दर्जाचे खेळाडू इथे तयार होतात म्हणून राज्यातले आणि राज्याबाहेरचेही अनेक खेळाडू विपरीत परिस्थितीत, आर्थिक संकटांशी संघर्ष करीत नाशिकमध्ये येऊन राहताहेत. अगदी एकेका खोलीत चार-चार, पाच-पाच मुलं एकत्र राहून सोबतीनं मैदानावर आणि मैदानाबाहेरचंही आयुष्य हिमतीनं जगताहेत..
महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरयाणा, झारखंड.. यांसारख्या राज्यांतले खेळाडू काही वर्षांपासून नाशिकमध्ये स्थायिक झाले आहेत, नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर प्रशिक्षण घेतात आणि आपलं राज्य सोडून नाशिकचं, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात.
अर्थातच या साºयांत नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी गावपाड्यांतल्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. पण इथे प्रशिक्षण घेणाºया सर्वच खेळाडूंत एक समान सूत्र दिसतं, ते म्हणजे जवळपास सगळेच ‘सारखे’ आहेत. आर्थिक विपन्नावस्थेतून आलेले आणि परिस्थितीशी संघर्ष करीत असलेले.. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांत नाव गाजवत असतानाही अनेकांचे आईवडील आजही रोजंदारीवर मोलमजुरी करतात. हे खेळाडूही पै, पैसा वाचवून, कधी स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसांवर, तर कधी कुठे कामधाम करून आपल्या स्वप्नांच्या दिशेनं धावत राहतात. बक्षिसाचे पैसे घरी आई-वडिलांना पाठवून आपल्या घरालाही हातभार लावतात. त्यांची गरिबी, त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द.. हाच कदाचित त्यांच्यातला ड्रायव्हिंग फोर्स असावा..
सगळेच गरीब घरातले. कष्टाचं ‘कौतुक’ त्यांना कधीच नव्हतं, नाही. कष्ट घरीही करायचे आणि इथेही करायचे. घरी राहिलो तर आयुष्यभर मोलमजुरीच करावी लागेल, त्यापेक्षा मैदानावर कष्ट घेतले, इथे राबलो, घाम गाळला तर किमान भविष्य तरी उज्ज्वल होईल, स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळेल, मोलमजुरी करून जगणाºया आपल्या घराला, कुटुंबाला त्यातून बाहेर काढता येईल.. ही आस प्रत्येकाच्याच मनात दिसते.. त्यामुळेच अगदी दहावीतच कविता राऊतनं रेल्वेत टीसीची नोकरी पकडली होती. मोनिका आथरे एलआयसीत नोकरी करतेय. रणजीत पटेलनं दीड-दोन महिन्यांपूर्वीच रेल्वेची नोकरी धरली आहे, तर संजीवनीनेही नोकरीसाठी नुकताच अर्ज केलाय. आणखीही काही खेळाडूंनी अगोदरच नोकरी धरली आहे. नोकरी, मैदान, घर.. सांभाळून ते सरावही करतात!

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्याची आणखी काही कारणं नाशिकच्या मातीत दिसतात. नाशिकमध्ये भोसलाच्या मैदानावर गेलं की सकाळ-संध्याकाळ खेळाडूंची गर्दी दिसते. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सारेच खेळाडू रोज, एकाच ठिकाणी, एकाच मैदानावर, एकाच कोचच्या मार्गदर्शनाखाली आणि एकमेकांसोबत सराव करतानाचं दृश्य तसं विरळाच. त्यांचे आदर्श प्रत्यक्ष त्यांच्या समोर, सोबत आहेत, देशातले सर्वोत्तम स्पर्धक रोज सोबत घाम गाळतात. प्रत्येकाला एक-दुसºयापासून प्रेरणा मिळते, आपल्यातल्या चुका सुधारण्याची संधी मिळते आणि आपल्यातलं

‘सर्वोत्तम’ बाहेर काढण्याची जिद्दही त्यातूनच त्यांच्यात निर्माण होते..
रोज सोबत खेळणारे हे मित्रच एकमेकांचे स्पर्धकही आहेत; पण त्यांच्यात उत्तम असा ‘भाईचारा’ही आहे. त्यांची स्पर्धा एकमेकांशी नाही, तर स्वत:शी आणि टायमिंगशी आहे. त्यासाठीच प्रत्येकाची चढाओढ आणि धडपड. त्यामुळे कोणीही पहिला, दुसरा आला तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. हा याराना, ही दोस्ती तशीच कायम राहते.
यासाठीदेखील कविता राऊत हीच त्यांची आदर्श आहे.
कविता राऊत आणि प्रीजा श्रीधरन या दोन समकालीन भारतीय खेळाडू. दोघींचा इव्हेन्ट एकच, दोघीही एकमेकींच्या ‘कट्टर स्पर्धक’, दोघीही एकाच स्पर्धेत धावणाºया आणि दोघीही त्यांच्या गटात देशातल्या सर्वोत्तम धावपटू.. कविता राऊत सांगते, ‘आम्ही किती स्पर्धा सोबत धावल्या याची गणतीच नाही, देशांतल्या बहुतेक स्पर्धांत आमच्यापैकीच कोणीतरी पहिलं-दुसरं असायचं, आम्हीच एकमेकींच्या ‘स्पर्धक’ होतो; पण स्पर्धकांमधली ती ईर्षा, ती असूया आमच्यात कधीच नव्हती. आम्ही कायम स्पर्धा केली ती वेळेशी. सर्वोत्तम वेळेशी. त्यामुळे कोणीही जिंकलं तरी आम्हाला तेवढाच आनंद व्हायचा, कारण शेवटी दोन्ही पदकं ‘आमचीच’ असायची!’
त्यामुळेच वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय शिबिरांमध्येच नव्हे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या वेळीही या दोघीच कित्येक वर्षं एकमेकींच्या रूम पार्टनर होत्या, दोघीही सोबतीनंच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रवास करीत होत्या आणि कोणीही जिंकलं तरी तितक्याच आनंदानं एकमेकींना मिठ्या मारत एकमेकींचं कौतुक करीत होत्या.. हा अनोखा प्रसंग प्रत्येक स्पर्धेच्या वेळी सर्वांनाच पाहायला मिळाला आणि अचंबितही करून गेला!
हाच याराना, हीच दोस्ती नाशिकमधल्या खेळाडूंमध्येही पाहायला मिळते.
नाशिकच्या खेळाडूंसाठी आणखी एक जमेची बाब म्हणजे हे सारेच खेळाडू तरुण आहेत आणि जवळपास प्रत्येकाच्या हातात अजून किमान आठ-दहा वर्षं तरी शिल्लक आहेत.. अनेक आॅलिम्पिकपटू नाशिकमधून घडू शकतात, याचं हेदेखील मुख्य कारण आहे.
कविता सांगते, ज्यावेळी मी सुरुवात केली, त्यावेळी पी. टी. उषा माझी आदर्श असली तरी नाशिकचे खेळाडू हेच माझी प्रेरणा होते. मिनी सुवर्णा, राधिका गणोरकर, सुप्रिया आदक, नेहा पालेकर, निकिता अग्रवाल, गणेश सिंग, शैलेंद्र ठाकूर.. यांसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत मीदेखील भोसलाच्या मैदानावर सराव करीत होते. आज मैदानावर सारेच खेळाडू अगदी गरीब घरचे म्हणता येतील असे असले तरी त्यावेळी मात्र मी सोडता इतर सारेच खेळाडू चांगल्या घरातले होते. कारण ‘खेळ’ ही परवडणारी गोष्ट तेव्हाही नव्हती, आजही नाही. पण या साºयांचं वैशिष्ट्य म्हणजे यातल्या एकानंही माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव मला कधी होऊ दिली नाही. सगळ्यांनीच अत्यंत मित्रत्वानं मैदानावरचा जिव्हाळा जपला. केवळ खेळाडूंमध्येच नव्हे, नाशिकच्या लोकांमध्येही खेळाडूंप्रति जो जिव्हाळा दिसतो, तो मला आजवर इतर कुठेच आढळला नाही.
त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे खेळाडूंच्या मदतीला कायम तत्पर असलेले नाशिकचे नागरिक. नाशिकमध्ये अनेक डॉक्टर तर असे आहेत, जे आजही कोणत्याच खेळाडूकडून पाच पैशाचीही फी घेत नाहीत. नाशिकच्या खेळाडूंची कामगिरी पाहून अनेक स्पॉन्सर्सही स्वत:हून पुढे येताहेत. महिन्द्रा, बॉश, गेल इंडिया, वॉलस्पॅन, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार.. खेळाडूंच्या खर्चाला हातभार लागतो आहे.
नाशिकमध्ये आजवर सारे खेळाडू सराव करीत होते, ते मातीवर किंवा रस्त्यावर. मात्र मॅरेथॉन वगळता सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा सिन्थेटिक ट्रॅकवरच होतात. ही एक मोठी कमतरता नाशिकमध्ये होती; पण दोन वर्षांपूर्वीपासून सिन्थेटिक ट्रॅकची सुविधाही नाशिकमध्ये उपलब्ध झाली आहे. त्याचा मोठा फायदा खेळाडूंना होतो. हा ट्रॅक तुलनेनं फास्ट असतो, कारण तो अनइव्हन नसतो. खड्डे, खाचखळगे, त्यामुळे होणाºया दुखापतींपासून खेळाडूंना संरक्षण मिळतं. त्यामुळे खेळाडूंचा परफॉर्मन्स सुधारतो आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढतो. शिवाय भर पावसातही या ट्रॅकवर सराव करणं शक्य होतं..
साºया अडथळ्यांवर आणि परिस्थितीवर मात करीत नाशिकचे खेळाडू पुढे जाताहेत. तुटपुंज्या साधनसामुग्रीवर, मात्र दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्वप्नांच्या दिशेनं त्यांचा प्रवास सुरू आहे.
आगामी काळात अनेक राष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यातूनच कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धांचं सिलेक्शन होईल. सारेच खेळाडू त्यात आपल्याला सर्वोत्तम कसं देता येईल यात व्यस्त आहेत.
कोच विजेंद्रसिंग यांच्याशी बोलत होतो. ते सांगत होते, आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करतो. कमी आयुधांनिशी आंतरराष्ट्रीय स्तरावर झुंजतो. विजय मिळवतो. परदेशात एका अ‍ॅथलिटमागे जवळपास पाच जणांची टीम असते. कोच, फिजिओ, सायकॉलॉजिस्ट, मेंटल ट्रेनर, मसाजर.. इथे कोचच सर्वकाही असतो. मोक्याच्या क्षणी तर तोच कोच, तोच फिजिओ, तोच सायकॉलॉजिस्ट, तोच केअर टेकर..
बोलता बोलताच मैदानावरच्या काही खेळाडूंची नावं त्यांनी पुकारली. एक स्पर्धा जवळ आलीय. त्याचे फॉर्म भरायचे होते. स्पर्धेची फी कॅटेगरीनुसार साडेसातशे आणि पंधराशे रुपये.. सगळ्यांचे मिळून साधारण पाच-दहा हजार रुपये भरावे लागणार होते. एन्ट्रीचा आज शेवटचा दिवस. जवळपास कोणाकडेच पैसे नव्हते. आंतरराष्ट्रीय खेळाडूही त्यात आहेत. नुकतीच मिळालेली बक्षिासाची सारीच रक्कम त्यांनी घरी पाठवून दिलीय. हाती काहीच नाही. पाठपुरावा केल्यानंतर स्पॉन्सरर्सकडून नुकताच एक चेक आलाय; पण अजून बॅँकेत खातंच उघडलेलं नाही!.. आता हे सारे पैसे कोच विजेंद्रसिंग खिशातून भरतील हे गृहीत आहे!..
काल पुन्हा मैदानावर गेलो. संध्याकाळचे साडेसात वाजले होते. सराव संपल्यानं सारे आपापलं किट आवरत होते. तिथे खाली जमिनीवरच मोनिका आथरे आपल्या पायांना आईसमसाज करीत होती. गेले काही दिवस झाले, तिची जुनी दुखापत पुन्हा उफाळून आलीय.
सकाळी तिला दिल्लीला रवाना व्हायचंय. दिल्ली मॅरेथॉनसाठी. बोलता बोलता ती म्हणाली, ‘आज बाम सर असते तर फार बरं झालं असतं. प्रत्येक वेळी, विशेषत: अशा प्रसंगी त्यांची अनुपस्थिती फार जाणवते..’
ज्येष्ठ क्रीडामानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांचं गेल्या वर्षीच निधन झालं. कविता राऊत, मोनिका, संजीवनीपासून देशातल्या आणि नाशिकमधल्या साºयाच खेळाडूंना त्यांचा फार मोठा सहारा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर लागणारा मेन्टल टफनेस त्यांच्याकडूनच त्यांनी मिळवला होता. सरकारदरबारी आणि उच्च स्तरावर ओळख असल्यानं त्यांच्याच पुढाकारानं आणि मदतीनं अनेक गोष्टी सुकर होत होत्या.. त्यांच्याविना क्रीडाक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झालीय. त्यावरही मात करण्याचा प्रयत्न खेळाडू करताहेत.
२५ फेब्रुवारी. मोनिका दिल्लीत पोहोचलीय. ४२ किलोमीटरची फूल मॅरेथॉन. याच स्पर्धेतल्या कामगिरीतून कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्ससाठीचं सिलेक्शन होणार आहे.
‘विजेंद्र’सिंग!
नाशिकमध्ये आज इतके आंतरराष्टÑीय दर्जाचे खेळाडू घडताहेत; पण हे सारं एका रात्रीत घडलेलं नाही. ‘साई’चे कोच म्हणून १९९१मध्ये विजेंद्रसिंग पहिल्यांदा नाशिकला आले. त्यावेळी नाव घ्यावं असा कोणताच अ‍ॅथलेटिक्स खेळाडू नाशिकमध्ये नव्हता. हळूहळू मिनी सुवर्णा, राधिका गणोरकर, सुप्रिया आदक, नेहा पालेकर, निकिता अग्रवाल, गणेश सिंग, शैलेंद्र ठाकूर.. यांसारखे खेळाडू तयार झाले. राष्टÑीय स्तरापर्यंत पोहोचले. काहींनी पदकंही पटकावली. सुप्रिया आदक चालण्याच्या स्पर्धांत भाग घ्यायची, तर शैलेंद्र ठाकूर थाळीफेक करायचा..
छोटी कविताही त्यांच्यासोबत आणि त्यांचाच आदर्श ठेवून मैदानावर पळत होती. कवितासह सारेच जण त्यावेळी स्प्रिंटमध्ये म्हणजे कमी अंतराच्या स्पर्धांत धावत होते.
याचवेळी कोच विजेंद्रसिंग यांच्या लक्षात आलं, स्प्रिंट, शॉर्ट डिस्टन्समध्ये आपल्याला फार भवितव्य नाही. आपल्या खेळाडूंची शारीरिक ठेवण, उंची तर स्प्रिंटसाठी अनुकूल नाहीच; पण त्यासाठीच्या नैसर्गिक गुणवत्तेतही आपण कमी पडतो. विजेंद्रसिंग यांनी त्यानंतर साºयाच खेळाडूंना मिडल आणि लॉँग डिस्टन्ससाठी तयार करायला सुरुवात केली. कविताही मग स्प्रिंटकडून लॉँग डिस्टन्सकडे वळली आणि ‘रिझल्ट’ मिळायला सुरुवात झाली! विजेंद्रसिंगही पाड्यापाड्यांवर जाऊन खेळाडूंना हुडकू लागले. त्यांना नाशिकला आणून त्यांच्यावर पैलू पाडू लागले. खेळाडूंच्या अगदी व्यक्तिगत आणि कौटुंबिक समस्याही सोडवू लागले. बºयाचदा स्वत:च्या खिशांत हात घालून!
मैदानावरचे सारेच खेळाडू सांगतात, सरांची दोन रूपं आहेत, मैदानावर अत्यंत कडक शिस्तीचा प्रशिक्षक आणि मैदानाबाहेर वडिलकीच्या प्रेमानं काळजी घेणारा पिता!
महाराष्टÑ शासनानं शिवछत्रपती पुरस्कार देऊन विजेद्रसिंग यांचा सन्मान केला. आज ते निवृत्तीच्या टप्प्यावर आहेत. जवळपास तीस वर्षं झाली, खेळाडू घडवण्याचं त्यांचं काम अव्याहत सुरूच आहे.. ते म्हणतात, वय होत आलं म्हणून काय झालं, रिटायरमेण्ट नोकरीला असते, कामाला नाही!..

खेळाडू घडवणारी ‘भोसला’ची माती!
आंतरराष्टÑीय स्तरावरचे खेळाडू घडवणारी ‘फॅक्टरी’ म्हणून नाशिकच्या मातीचं आज भारतभरात नाव आहे; पण त्यात खेळाडूंचा आणि प्रशिक्षकाचा जितका वाटा आहे तितकाच किंवा त्यापेक्षा कांकणभर जास्त वाटा नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचा आहे.
गेली कित्येक वर्षं भोसलानं आपलं मैदानच केवळ या खेळाडूंसाठी खुलं करून दिलं नाही, तर त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या राहण्या-खाण्यापिण्याचीही जबाबदारी उचलली. खेड्यापाड्यांतून आलेले अनेक खेळाडू आजही भोसलात शिक्षण घेतात, तिथेच होस्टेलवर राहतात, तिथल्याच मेसमध्ये जेवतात. भोसलानं अनेक खेळाडूंना नाममात्र दरात किंवा अगदी मोफत ही व्यवस्था करून दिली आहे.
विजेंद्रसिंग यांनीही खेड्यांपाड्यांतले खेळाडू उचलून इथे आणले तेही केवळ एकाच भरवशावर. भोसला मिलिटरी स्कूल! साºयांनाच त्याची कृतज्ञ जाणीवही आहे. सारेच खेळाडू सांगतात, आमच्या यशात भोसला मिलिटरी स्कूलनं केलेल्या मदतीचा वाटा खूपच मोठा आहे. ही मदत जर नसती, तर आम्ही इथवर पोहोचूच शकलो नसतो!

(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्त संपादक आहेत.)
 

Web Title: 'Olympic' factory! From the heart of the nasal grounds of insinuation to get a medal in the Olympics ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.