युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणार्‍या नवनाथ गोरेच्या कुडाच्या घरात उगलडणारी ‘फेसाटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 03:00 AM2018-07-12T03:00:00+5:302018-07-12T03:00:00+5:30

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या दुष्काळी ठोंबरे वस्तीवरला नवनाथ गोरे. कुडाच्या छपरात राहणारा एक तरुण. त्याच्या फेसाटी या पुस्तकाला नुकताच अत्यंत प्रतिष्ठेचा ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला. त्याचं जगणं शोधत थेट ठोंबरे वस्तीवर घेऊन जाणारा हा खास लेख!

Navnath Gore's ‘Fesati’, novel on farmers’ troubles, wins Yuva Sahitya Akademi award- a report from his drought affected villeage | युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणार्‍या नवनाथ गोरेच्या कुडाच्या घरात उगलडणारी ‘फेसाटी’

युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणार्‍या नवनाथ गोरेच्या कुडाच्या घरात उगलडणारी ‘फेसाटी’

Next
ठळक मुद्देनवनाथला बी.ए.ला फस्र्ट क्लास मिळाला होता. कोल्हापुरात शिकायला गेला; पण राहण्या-खाण्याची पंचाईत. मग कधी एटीएम सेंटरवर सिक्युरिटी गार्ड म्हणून, तर कधी गवंडय़ाच्या हाताखाली बिगारी म्हणून काम सुरू केलं. मुक्काम मित्रांच्या रूमवर. गावाकडं कित्येकदा उपाशी झगावी मोठा भाऊ अपंग. सहा विवाहित बहिणी. साडेचार एकर जमीन. पण त्यात काही पिकणं कठीणच. आई-बाप दुसर्‍याच्या शेतात मजुरीला जायचे. तिथं इतर बायकांच्या पोरांनी शिकून नोकर्‍या मिळवल्याचं आईनं ऐकलं. मग तिनं लकडा लावला, शिक बाबा, शिकलास तरच नोकरी मिळलं. आता एव

- श्रीनिवास नागे

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्याचा रखरखीत पूर्वभाग. दुष्काळी माळरानाचा पट्टा. पावसाच्या दिवसात जरा हिरवं दिसतं; एरव्ही खुरटलेली, वाळलेली झुडपं आणि काटेरी बाभळी. इथल्या माणसांच्या आयुष्यासारखी ! भयाण वारा सुटलेला. वर बघावं तर नुसतेच पांढुरक्या ढगांचे पुंजके. वार्‍यानं बेफाम पळणारे. जतपासून पन्नास किलोमीटरवरच्या उमदीपासून दक्षिणेकडं जाताना गाव सोडल्या सोडल्या उजव्या हाताला अमोघसिद्धाचं देऊळ लागतं. त्याला वळसा घालून कच्ची वाट पकडायची. वाटेवर दोन्ही बाजूला अंग ओरबाडणार्‍या बाभळी. दारूच्या भट्टय़ांतून धूर येणारे बारके-बारके लमाणतांडे दिसतात. तिथून तीन किलोमीटरवर ठोंबरे वस्ती. वस्तीवर एक कुडाचं छप्पर. त्याला चिकटूनच पत्र्याचं शेड.. ‘फेसाटी’ कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झालेल्या नवनाथ गोरेचं हे घर. कुडाच्या छपरापुढं कोंबडय़ांचं खुराडं. लिंबाच्या झाडाजवळ दुसर्‍या बाजूला मेंढक्याला धनगरी कुत्रं बांधलेलं. अंगणात दोन चेपलेली पातेली, डेरा. एका मोठय़ा पातेल्यात पाणी. काठीच्या टोकाला अडकवलेला बल्ब. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दहा-बारा दिवसांनी नवनाथ घराकडं आलाय. अंगणात काहीतरी खुरपतोय. माणसं बघून थांबतो. अदबीनं ‘याùù सर’ म्हणतो. छपरातली जमीन शेणानं सारवलेली. बसायला घोंगडं टाकलेलं. शेजारीच पाण्यासाठी बॅरेल ठेवलेला. वरच्या दोरीवर लुगडय़ाची दारकांडं आणि मळकटलेली कापडं. दोन दिवसांपासून या छपरात वर्दळ वाढलीय. त्यात नवनाथला भेटायला, सत्कार करायला येणारी मंडळीच जादा असतात. वस्तीवर त्याचं एकटय़ाचंच घर. दोनेकशे मीटरवरच्या सूळ वस्तीवर त्याच्या मामाचं घर. तिथलेही पै-पाहुणे आलेले.
पाण्याचा तांब्या द्यायला पन्नाशीतला फाटका गडी येतो. हातातल्या काठीवर लंगडत-लंगडत. अंगात सदरा आणि खाली टॉवेल गुंडाळलेला. कानाभोवती रूमाल बांधलेला. दाढीचे खुंट वाढलेले. कसंनुसं हसतो. हा नवनाथचा भाऊ. मातकटलेली बंडी आणि फाटक्या धोतरातले वडील येतात. डोक्याला मफलर गुंडाळलेला. पायाला जखमेमुळं पट्टय़ा बांधलेल्या. ठिगळं लावलेल्या लुगडय़ातली आईही येते. माउलीच्या चेहर्‍यावर अप्रूप. आपल्या नाथाला भेटायला आलेल्यांचं..

विरलेला टी-शर्ट आणि काळपट पॅण्टीतला नवनाथ पुढं होऊन पाहुण्यांना घोंगडय़ांवर बसवतो. तो उण्यापुर्‍या तिशीतला. वर्ण सावळा. कपाळावरचे केस दोन्ही बाजूंनी कमी होत गेलेले; पण अंगापिंडानं मजबूत आणि काटक. डोळ्यात विलक्षण चमक. परिस्थितीशी झगडून आलेला आत्मविश्वास त्यात असतो! बारीक आवाज आणि त्यात कमालीची मार्दवता. नम्रता तर इतकी की फुटकळ पुरस्कारानंही हवेत चालणार्‍यांच्या थोबाडीत मारणारी! कोणताही आव नाही की अभिनिवेश नाही. सरळ, साधा एकदम.. 
छपराच्या आतल्या खोलीच्या कुडाच्या भिंती पार मोडून पडलेल्या म्हणून नवनाथनं आताच नव्या पत्र्याची पानं आणून मारलीत. तिथं चुलीवरच्या काळपटलेल्या पातेल्यातला गुळमट चहा त्याच्या आईनं गाळला आणि कप पुढं केले.


‘या वस्तीवर पन्नास-साठ वर्षापासून आमचं कुटुंब राहतंय. माझं प्राथमिक शिक्षण इथल्याच निगडी बुद्रुकला, तर माध्यमिक ते बी.ए.र्पयतचं शिक्षण उमदीत झालं..’ - नवनाथ सांगू लागला. ‘फेसाटी’ची भाषाशैली त्याच्या गावाकडंची; पण ती बोलीभाषा आता त्याच्या बोलण्यातून कमी झालीय. लहेजा तोच असला तरी सहा-सात र्वष कोल्हापुरात विद्यापीठाच्या परिसरात राहिल्यानं जिभेवर प्रमाणभाषा रुळायला लागलीय.
‘मोठा भाऊ अपंग. त्याचं लग्न झालेलं नाही. सहा विवाहित बहिणी. त्यानंतर मी. शेंडेफळ असल्यानं लाडात वाढलो. आम्हाला साडेचार एकर जमीन. पण, त्यात काही पिकणं कठीणच. आई-बाप दुसर्‍याच्या शेतात मजुरीला जायचे. तिथं इतर बायकांच्या पोरांनी शिकून नोकर्‍या मिळवल्याचं आईनं ऐकलं. मग तिनं लकडा लावला, शिक बाबा, शिकलास तरच नोकरी मिळंल म्हणून. तीच माझी ऊर्जा. आई-बापानं शिकायला लावलं. त्याचवेळी दुष्काळाशी दोन हात करणार्‍या आजूबाजूच्या लोकांचं जगणं टिपत होतो. बी.ए.नंतर प्रा. डॉ. दिनकर कुटे आणि राजाराम पाटील यांनी शिवाजी विद्यापीठात एम.ए. मराठीसाठी अ‍ॅडमिशन घ्यायला लावलं. त्यांच्याकडून आणि इकडून-तिकडून पैसे गोळा केले. तिकडं गेलो..’ सरांच्या आठवणींनी टचकन डोळ्यात पाणी येतं.
नवनाथला बी.ए.ला फस्र्ट क्लास मिळाला होता. कोल्हापुरात गेला; पण राहण्या-खाण्याची पंचाईत. मग कधी एटीएम सेंटरवर सिक्युरिटी गार्ड म्हणून, तर कधी गवंडय़ाच्या हाताखाली बिगारी म्हणून काम सुरू केलं. मुक्काम मित्रांच्या रूमवर. गावाकडं कित्येकदा उपाशी झोपायला लागायचं, तर कोल्हापुरात वडापाव पोटाला दिवसभर आधार द्यायचा. पुढं एम.ए.लाही फस्र्ट क्लास मिळाला.   
नवनाथ तसा एकलकोंडा. बुजरा. चारचौघात गप्पा मारायचं म्हटलं तरी जीव घाबरा व्हायचा. धाडस यावं म्हणून मग बी.एड.ला अ‍ॅडमिशन घेतलं. मित्रांच्या नोट्सवर अभ्यास केला. कारण दिवसा कामावर गेल्यामुळं कॉलेजला नियमित जात येत नव्हतं. तिथल्या ‘मायक्रो टीचिंग’मुळं आत्मविश्वास आला.
सरांचं आणि मित्रांचं ऋण नवनाथ प्रांजळपणानं कथन करतो. एम.ए.ला असताना विष्णू पावले या मित्रामुळं लिहायला लागलो. तो कविता करायचा; पण मला कविता नाही आवडत. विष्णू म्हणायचा, ‘तुझं अनुभवविश्व मोठंय. ते लिहीत जा.’ लिहू लागलो. ‘काळ’ नावाची कथा ‘मुराळी’मध्ये छापून आली. आणखी कथा लिहिल्या. आतला आवाज ऐकू येत होता. हाकारे देत होता. जे भोगलं ते व्यक्त करावं वाटलं. तेही आपल्या भाषेत. गावाकडंच्या. त्या मातीतल्या बोलीत. मग दीर्घ लिहावं, असं वाटू लागलं. कादंबरीसारखी मांडणी करावी वाटली. पण वाचन नव्हतं. वाचनाचा आळस. आता अलीकडं भरपूर वाचायला लागलोय. पण तेव्हा वाचन नसल्यानं कसं लिहावं कळत नव्हतं. मग लहानपणापासून जे अनुभवलं, ते लिहीत गेलो. आठ-नऊ महिन्यांत दोनशे पानं झाली. वीस-तीस पाने झाली की, विष्णूला दाखवायचो. तो प्रोत्साहन द्यायचा. पण खरं बळ दिलं, विद्यापीठाच्या मराठी विभागातले प्राध्यापक डॉ. रणधीर शिंदे यांनी. त्यांच्याकडं हस्तलिखित दिलं आणि एका दिवसात त्यांनी वाचून परत केलं. सूचना केल्या. पशुपालक समाजाचा जीवनपट सुंबरानच्या आख्यानरूपात गुंफायला त्यांनीच सांगितलं.’
‘शिंदे सरांच्या सूचना होत्या, त्यानुसार गावाकडं पशुपालक-धनगर समाज जशा ओव्या म्हणतो, तशा ओव्या रचत गेलो. त्या सगळ्या कादंबरीभर पेरल्यात. सरांनी अनेक बदल सुचवले. पहिल्या पानावरच्या ओवीत सगळं कुटुंब गुंफलं. जमेल तसं लिहीत गेलो. रंजकता नको, तर शिक्षण प्रवासासोबत कुटुंब आणि समाजातले पेचही त्यात यायला हवेत, हे सरांनीच मनावर बिंबवलं..’ तो सांगत होता.
‘फेसाटी’ तयार झाली. प्रा. डॉ. शिंदे आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची जाहिरात पाहिली आणि कादंबरी पाठवायला सांगितली. साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेतूनच ती प्रकाशित झाली. जवळ पैसे नसल्यानं कोणत्याही सोहळ्याशिवाय 25 ऑगस्ट 2017 ला प्रकाशन झालं. तिला आतार्पयत 14 पुरस्कार मिळालेत आणि आता तर साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालाय. तिची दुसरी आवृत्ती आठवडाभरात येतेय, अक्षर वा्मय प्रकाशनाकडून.
सहा वर्षापासून नवनाथ झपाटल्यासारखा लिहितोय. ‘फेसाटी’नंतर त्यानं आणखी दोन कादंबर्‍या लिहिल्यात. जे साठलं होतं, ते बाहेर आलंय. तो मोकळा झालाय. व्यक्त झालाय, तळापासून. मुळापासून. तो म्हणतो, ‘मी लिहिण्याचा आनंद घेतोय. छापण्याचा विचार कधीच मनात येत नाही. अर्थात छापण्यासाठी लागणारी आर्थिक परिस्थिती तरी कुठाय?’ 
नवनाथवर प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांचा मोठा प्रभाव. त्यांनी त्याला पाठबळ दिलंय. शिकवलंय. तो तीन वर्षापूर्वी ढासळला असता, पण प्रा. शिंदे यांनी सावरलं. तो आता त्यांच्या कुटुंबातलाच सदस्य बनलाय. ‘माउस’ही धरायला न येणार्‍या नवनाथला सरांनी स्वतर्‍ संगणकावर मजकूर कम्पोज करायला शिकवलं. तो आता गतीनं कम्पोज करतोय. असं असलं तरी हस्तलिखित तयार करून नंतरच ते संगणकावर कम्पोज करायला तो पसंती देतो. लिहिलेलं जपून ठेवायची त्याला भारी आवड. पण मधल्या काळात कुडाचं घर जळालं आणि त्यात त्यानं लिहून ठेवलेलं काहीबाही जळून खाक झालं!
तो बोलत असतो. त्याच्या घरात छपरातल्या खुंटीला नवनाथचा नवा पांढरा शर्ट आणि पॅण्ट अडकवलेली दिसते. जवळच नवं घडय़ाळ ठेवलेलं. सत्कारात मिळालंय. पंधरवडाभर तो सत्कार सोहळ्यांत गुंतून गेलाय. एम. ए., बी. एड.नंतर त्यानं गावातल्या विनाअनुदानित महाविद्यालयात तासिका तत्त्वावर नोकरी केली. त्यातून मिळायचे केवळ चार हजार! नंतर प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘प्रोजेक्ट फेलो’ म्हणून घेतलं. गेल्या तीन वर्षापासून तो ‘बौद्ध तत्त्वज्ञानाचा मराठी संत कवितेवर प्रभाव’ या विषयावर संशोधन करतोय. त्याला आता विद्यावेतन मिळतंय. चौदा हजार आणि घरभाडं. त्यातनं त्यानं कोल्हापुरातला स्वतर्‍चा खर्च भागवत साडेतीन-चार लाखाचं कर्ज फेडलंय. शेतात पाइपलाइन केलीय. गावाकडचा खर्च सांभाळतोय. ‘प्रोजेक्ट’चं हे कामही आता महिन्याभरात संपतंय. कायमची नोकरी नाही, कामधंदा नाही. मग पुढं काय, हा प्रश्न पुन्हा  खायला उठलाय..
एकसारखी बाळंतपणं कुढत झेलणारी आणि पोटाला कापड बांधून राब राब राबणारी नवनाथची आई चूल फुंकत होती. पाहुणे येणार म्हणून शेतातलं काम सोडून आलेली. ती आता सत्तरीत आहे. ‘आमच्या नाथानं नाव काढलं’, एवढीच तिची प्रतिक्रिया. 
आई नाथाला सतत म्हणत आली, ‘अजून काय शिकायचं राहिलं असंल तर शिकून घे बाबा..’ शिकण्यापेक्षा काम कर आणि पैसे मिळवून दे, असं या माउलीनं कधीही त्याला सांगितलं नाही. वयाची ऐंशी र्वष ओलांडलेल्या बापानं नवनाथच्या शिक्षणासाठी हाडाची काडं केलीत, पण बापाच्या आजारपणानं अलीकडं नकोसं करून सोडलंय. शरीर थकलंय. ऐकायला कमी येतंय, त्यात विजापूरला गेला असताना गाडीची धडक बसली. पाय मोडला. तो अजून सरळ व्हायचाय. नवनाथचं कौतुक तो टकामका बघत राहतो फक्त! नवनाथवर त्याच्या बहिणींचं जिवापाड प्रेम. त्याला घासातला घास काढून दिलेला. मुकिंदा सूळ हा त्याचा मामा, त्याचा तर मोठा आधार. त्याच्या मुलालाच नवनाथची बहीण दिलीय.
 तिशीत गेलेल्या नवनाथला घरातून लग्नाचा लकडा लागला नसता तरच नवल! तीन वर्षापासून घरच्यांना तो गप्प बसवत आलाय..
 ‘इथं भाकरीचा पत्ता नाही. कसंबसं पोट भरतोय. कुडाचं घर. मग लग्न करून काय करू?’ हा त्याचा सवाल काळजाला घरं पाडत जातो..
नवनाथनं स्वतर्‍च्या जल्माची ही चित्तरकथा आणि वाडय़ावस्त्यांवरल्या झगडय़ाची व्याधिकथा असलेल्या या कादंबरीला शीर्षक दिलं, ‘फेसाटी’. नवनाथ सांगतो, ‘राब राब राबून तोंडाला येणारा फेस म्हणजे फेसाटी. आयुष्यभर खस्ता खाताना होणारी परवड म्हणजे फेसाटी आणि बाभळीच्या फेस येणार्‍या शेंगांसोबत काटेरी काटक्यांचा रचून ठेवलेला बिंडा म्हणजे फेसाटीच ना! कारण तो शेवटी चुलीतच जाणार असतो!!’ 
तेवढय़ात बारा-तेरा वर्षाची दोन पोरं येतात. हे नवनाथचे भाचे. नवनाथनं त्यांना शिकवायचं, मोठं करायचं ठरवलंय. आता त्यांची जबाबदारी उचललीय. शिक्षणाची गंगा दारात येऊनही परिस्थितीनं ज्यांच्या घशास कोरड पडली, त्यांच्या जल्माची ‘फेसाटी’ होऊ नये म्हणून..

 

फेसाटी जगण्याची गोष्ट

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातला हा परिसर दुष्काळ आणि दारिद्रय़ानं गांजलेला. कर्जाच्या जोखडाखाली अडकलेला. गावं एकमेकांपासून लांब. गावं कसली वाडय़ावस्त्याच त्या. कर्नाटकच्या सीमेवर असल्यानं कानडीबहुल. शेतीचा भरोसा पावसाच्या पाण्यावरच. कधी जुंधळं, कधी तूर-मूग तर कधी हुलगं. रोजगाराचं साधन नाही. दोनवेळच्या भाकरीची ददात. तरणी पोरं शिक्षण अर्धवट सोडून वैफल्यानं ग्रासलेली. तीस-चाळीस एकर रान असूनही दुसर्‍याच्या रानात राबायला जाणारी कजर्बाजारी झालेली बाया-माणसं इथं पावला पावलावर भेटतात. जमिनीच्या तुकडय़ापासून, घरादारार्पयत सगळ्या मालमत्तेवर कजर्. कधी सोसायटीचं तर कधी सावकारांचं. चक्रवाढ व्याजानं त्याचा बोजा दरवर्षी वाढत चाललेला. नवनाथ याच भोवतालात वाढलाय. अस्मानी संकटाशी दोन हात करता  करता ज्यांची उभी हयात मातीमोल झाली, त्या पिढीचा प्रतिनिधी. अल्पभूधारक आणि पशुपालक कुटुंबानं खस्ता खात वाढवलेल्या आश्वासक लेकरांचाही प्रतिनिधी ! त्यानं आपलाच टोकदार संघर्ष ‘फेसाटी’ या पुस्तकात मांडलाय. महाविद्यालयीन काळार्पयतचा काटाकुटय़ातला शिक्षणप्रवास या पुस्तकात चितारलाय. दारिद्रय़ाचं उदात्तीकरण न करता. सगळं जळजळीत वास्तव. थेटपणानं मांडलेलं. अस्सल देशीपण जपत त्यानं जगणं मांडलंय..


(लेखक लोकमतच्या सांगली आवृत्तीचे प्रमुख आहेत)

 
 

Web Title: Navnath Gore's ‘Fesati’, novel on farmers’ troubles, wins Yuva Sahitya Akademi award- a report from his drought affected villeage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.