चार दिवसातला संकोच कोण झुगारणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:00 AM2019-01-24T06:00:00+5:302019-01-24T06:00:06+5:30

त्या विषयाचं बोलणंच कोडवर्डमध्ये! त्यातही वडील-मुलीचा संवाद? अशक्यच ! पण हा विषय दैनंदिन मालिकाच मोकळेपणानं बोलते तेव्हा.

menstrual cycle- its better to talk | चार दिवसातला संकोच कोण झुगारणार?

चार दिवसातला संकोच कोण झुगारणार?

Next
ठळक मुद्देचार दिवसांचा संकोच यापुढे कमी होईल आणि आरोग्याचा, सुविधांचा विचार अधिक होईल, अशी आशा तरी करता येईल!

भक्ती सोमण

टीव्ही सिरिअल हे प्रकरण तरुणांना बोअरच होतं. पण अलीकडेच एका सिरिअलनं एक भलताच विषय दाखवला आणि त्याची मोठी चर्चा झाली. वयात येणार्‍या मुलीला पहिल्यांदाच पाळी येते आणि घरात कुणीच बाईमाणूस त्यावेळी नसल्यानं वडील त्याविषयावर तिच्याशी बोलतात. तिला स्वतर्‍ सॅनिटरी नॅपकिन आणून देतात, असा साधारण हा विषय. त्या एपिसोडची सोशल मीडियातही प्रचंड चर्चा झाली. 
मुळात पाळी येणं हाच अनेक घरात न बोलण्याचा विषय. त्यात वडिलांनी बोलायचं म्हणजे काहीतरीच, असा समज असलेल्या समाजात दैनंदिन दळण दळणार्‍या मालिकांनी हा विषय घ्यावा, म्हणजे एक मोठा धक्काच होता.
म्हटलं तर याविषयात सगळ्यांना सगळंच माहिती असतं आणि कुणाला काहीच माहिती नसतं, अशी स्थिती आहे. बाजूला बसणं, शिवायचं नाही, चार दिवस पूजा नाही, कावळा शिवला, अडचण आहे असे अनेक कोडवर्ड सांगून हा विषय आजही घरात बोलला जातो. त्यात घरात वडिलांशी या विषयावर बोलणं मुलींना अशक्यच. भावाशीच काय बहिणीशी- आई-आजीशी बोलणंही सगळं सांकेतिक. 
म्हणायला आजकाल तरुण मुलामुलींमध्ये मोकळेपणा आला आहे. ते एकमेकांचे दोस्त आहेत; पण हा विषय, त्याकाळातलं दुखणंखुपणं अडचणी हे सारं आज तरुण मुलंमुली तरी परस्परांशी मोकळेपणानं बोलू शकतात का? 
अजूनही त्या दिवसांतलं चालत नाही, बाजूला बसणं हे काही ठिकाणी आहेच. लगA ठरवतानासुद्धा अनेकजण सांगतात की, आमच्या घरी त्या दिवसांतलं चालत नाही. एकेकडे आधुनिक जीवनशैली, दुसरीकडे विटाळ अशा भलत्याच त्रांगडय़ात अजूनही आपला समाज अडकलेला आहे. तरुण मुलंही त्याला अपवाद नाही. आजही अनेक उच्चशिक्षित मुलं लग्न ठरवताना स्पष्टच सांगतात, ते चार दिवसांचं सगळं पाळावं लागेल. त्यादिवसात तुझ्या हातचं खाणार नाही, असं सांगणारे बहाद्दर अजूनही आहेत.
मात्र आशा एवढीच की, बदल होत आहेत. हे पूर्वीचं सारं कुठंतरी चुकतंय, त्यात वाईट-वंगाळ-विटाळ असं काही नाही, इतपत जाणीव तरी तरुणांमध्ये होऊ लागली आहे.
म्हटलं तर हेही काही कमी नाही. 
आजची नवी जनरेशन या विषयात तुलनेनं बरंच मोकळी आहे. इंटरनेटवरच्या माहितीमुळे त्यांच्या ज्ञानात चांगली भर पडते. मैत्रिणीशी, बहिणीशी त्याविषयी बोलण्याचा मोकळेपणा येतो आहे.
पीआर क्षेत्रात काम करणारा तुषार भामरे म्हणाला, बायको अनुजा आणि मी पॅड्सची खरेदी एकत्रच करतो. त्यात लपवण्यासारखे काहीही नाही. मी तर ऑफिसमध्येही सहकारी मैत्रिणींशी याबाबत मोकळेपणा ठेवला आहे. जोर्पयत मुली मोकळेपणाने सहकार्‍यांशी संवाद साधत नाहीत तोवर पुरुष सहकार्‍यांना तिच्या मनातली त्या दिवसांतली घालमेल कळणार नाही!’ 
नेत्रा ताजने म्हणाली,  सासरी बाजूला बसण्याची रीत. सुरेशशी, माझ्या नवर्‍याशी मी बोलले. त्यानं इंटरनेटवर मासिक धर्माविषयी पूर्ण माहिती घेतली. महिलांमध्ये होणारे बदल समजून घेतले आणि स्वतर्‍ पुढाकार घेत घरच्यांशी संवाद साधून बाजूला बसण्याची प्रथा बंद करून टाकली.’
अभि गद्रे म्हणाला की, मासिक धर्म हे वरदान आहे. आयुष्याच्या पुढल्या टप्प्यांत स्री जात असते. नैसर्गिक गोष्ट आहे. त्याविषयी बोलण्यात काय संकोच. मी माझ्या मुलीशीही योग्य वेळी हे बोलणार आहे. 
ही उदाहरणं प्रातिनिधिक असली तरी चार दिवसांचा संकोच यापुढे कमी होईल आणि आरोग्याचा, सुविधांचा विचार अधिक होईल, अशी आशा तरी करता येईल!

*****

अवघड विषय मांडताना...

मला दोन्ही मुलगेच. त्यामुळे घरात हा विषय मीही कधी बोललो नव्हतो. मालिकेत अभिनय करायचा तरी टेन्शन आलं होतं. टेन्शनचं कारण म्हणजे पाळी हा कधीच मोकळेपणानं न बोललेला विषय. टीव्हीवर विषय मांडतानाही तो पाहणार्‍याला कुठंही गलिच्छ, किळसवाणा वाटणार नाही याची काळजी घ्यावी लागणार होती. मी तर लहान मुलींशी कधीच या विषयावर बोललो नव्हतो. ते पूर्वीशी (सिरिअलमधील मुलगी) बोलायचं होते. जेव्हा त्याचं शूटिंग सुरू होतं तेव्हा सेटवर आम्ही सगळे पुरुष होतो. पूर्वीची खरी आजी आणि हेअर ड्रेसर अशा दोघीच बायका चेंजिग रूममध्ये बसल्या होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष सेटवर पूर्वी एकटीच मुलगी होती. तेव्हा सुरुवातीला सीन शुट करताना ऑकवर्ड वाटलं. ते कमी करायचं म्हणून मग मीच पुढाकार घेऊन पूर्वीला तू या पाळीच्या अनुभवातून गेली आहेस का ते विचारलं. तिने हो सांगितलं. मग तिने त्या दरम्यानचे बदल माझ्याशी खूप मोकळेपणाने शेअर केले. एका मुलीचा बाबा म्हणून मी ते समजून घेऊ शकलो. त्यातूनच जे घडलं. ते कमालीचं सुखावणारं ठरलं. अनेकांनी तो अख्खा एपिसोड सोशल मीडियावर खूप शेअर केला. सेटवरच्या लोकांनी एपिसोड टेलिकास्ट झाल्यावर दुसर्‍या दिवशी टाळ्या वाजवून दाद दिली. या सगळ्यातून मला जाणवणारी गोष्ट म्हणजे महिलांनी मोकळेपणाने आणि शांतपणे घरी याविषयावर बोललं पाहिजे. त्यानं हा अवघड विषय सोपा होईल.
सचिन देशपांडे,  (अभिनेता)

 


(लेखिका लोकमतच्या मुंबई  आवृत्ती उपसंपादक आहेत.) 

Web Title: menstrual cycle- its better to talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.