झिरो ते हीरो बनण्याचा बंडखोर प्रवास करणारे रॅपर्स कोण असतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:45 AM2019-03-07T06:45:00+5:302019-03-07T06:45:02+5:30

कमी कपडय़ातील मुली, चकाचक गाडय़ा, दारूच्या बाटल्या म्हणजे रॅप नव्हे! रॅप म्हणजे झिरो ते हीरो बनण्याचा प्रवास, संघर्षाचा आणि जिंकण्याचा बंडखोर आवाज.

meets rapers and share their world of joy & rebel. | झिरो ते हीरो बनण्याचा बंडखोर प्रवास करणारे रॅपर्स कोण असतात?

झिरो ते हीरो बनण्याचा बंडखोर प्रवास करणारे रॅपर्स कोण असतात?

googlenewsNext
ठळक मुद्दे* भारतातही आता रॅप आणि हिपहॉप तरुण मुलांना आवडू लागलं आहे, हा बदलही महत्त्वाचा आहे.

- अमित इंगोले

अपना टाइम आएगा.. 
स्ट्रगल करणार्‍या किंवा करावा लागलेल्या प्रत्येकाला ही ओळ आपली वाटतेय. ज्यांच्या मनात खूप काही साचलेलं असतं किंवा ज्यांना काही वेगळं करायचं, ज्यांच्या आत काहीतरी सतत पेटत असतं, ज्यांना लगेच संधी मिळत नाही ते सारेच ‘राइट टाइम’ येण्याची वाट पाहत असतात. ज्यांच्यात काहीतरी क्रिएटिव्ह सतत धडका देत असतं, त्यांना तर वाटतंच की, अपना टाइम आएगा.
सध्या तेच झालंय रॅप संगीताचं. गल्ली बॉय सिनेमानंतर सोशल मीडिया आणि गूगलवर अनेकजण गूगलून पाहू लागलेत की, हे ‘रॅप’ काय आहे? रॅप  आधीही बॉलिवूडमध्ये होताच. पण त्याचं फारच विलासी आणि भडक रूप आपल्यासमोर आतार्पयत आलंय. या सिनेमातला मुराद मात्र एक वेगळी गोष्ट सांगताना दिसला. त्यातून समोर आलं रॅपचं खरं रूप. रॅपची रिअ‍ॅलिटी. 
रॅप.
भारतीय संगीत विश्वात संगीताला वेगळ्या पद्धतीने सादर करण्याची पद्धत आपण पाश्चिमात्य देशांकडून अंगीकारली. तेसुद्धा फार पूर्वीपासून. त्यात रॅपिंग हासुद्धा एक प्रकार आहे. रॅपिंग किंवा हिपहॉप डोक्यावर घेऊन फिरणारी एक मोठी पिढी भारतात आहे. पण रॅपिंगचं जे रूप आतार्पयत बॉलिवूडमधून समोर आलं ते फारच बीभत्स आणि खोटं आहे. कमी कपडय़ातील मुली, लक्झरी कार्स, दारू, फॅशन हेच हनी सिंह आणि बादशाहच्या रॅपमधील मुद्दे आहेत. पण खरा रॅप म्हणजे ते नाही. रॅपिंगचा मूळ उद्देश किंवा वापर हा एखादी गोष्ट, कविता किंवा जीवनातील घटनांना मोकळी वाट करून देण्यासाठी केला जातो. रॅपिंगची सुरुवात पाहिलं तर अफ्रो-अमेरिकन आणि अल्पसंख्याकांवर होणारे अन्याय हे सारं बेधडक सांगण्याची रॅपचा वापर केला गेला. एकॉन, केन वेस्ट ही त्याची उदाहरणं.
दुर्लक्षित, प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या लोकांच्या माध्यमातूनच रॅपची सुरुवात झाली. कृष्णवर्णीय लोकांचा असमानतेविरोधातील आवाज ठरला तो हा रॅप. केवळ आपली कला दाखवायची म्हणून किंवा कलाकार म्हणून पुढे जायचं म्हणून रॅपर तयार झाले नाहीत. ज्यांना समाजाची झळ पोहोचली, यातना सहन कराव्या लागल्या, समाजानं नाकारलं, कमी लेखलं त्यातून रॅपर झाले.
रॅपरचं जगणं, त्यांचं व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणं हे सारं रॅपच्या माध्यमातून झालं. जसजसा काळ पुढे सरकत गेला, लोकांची मानसिकता आणि विचारधारा बदलली. तेव्हा रॅपर्सनीसुद्धा नव्या गोष्टी आत्मसात केल्या. रॅपर्सनी त्यांचा झिरो ते हीरो बनण्याचा प्रवास, त्यात येणार्‍या अडचणी आणि हसत हसत त्या अडचणींशी दोन हात करणं, जीवनातील एकदा निघून गेलेली वेळ परत येणार नाही हे सांगणं, भविष्याची स्वप्न  हे सारं या रॅपमध्ये उतरत गेलं.
न हरता लढा हेच सांगतात रॅपर्स. मग परिस्थिती कोणतीही असो. रॅप म्युझिकही तेच सांगतं. आणि तरुणांच्या  संघर्षाचा आणि जिंकण्याचा आवाज बनतं.
ती त्या संगीताची ताकद आहे आणि जादूही !

***
* सत्तरच्या दशकातील जमैकाच्या संगीतात  हिपहॉप संगीताच्या उत्पत्तीची माहिती मिळते. हिपहॉप किंवा त्याचाच प्रकार असलेला रॅप राजकीय, आर्थिक, सामाजिक अवहेलना आणि गुलामीला वाचा फोडण्यासाठी समोर आला.
* रॅप हा संगीतप्रकार हा कृष्णवर्णीय संगीताच्या इतिहासाचा भाग आहे. अत्याचार, असमानता या विरोधात उठणारा तो आवाज म्हणजे रॅप. त्याची भाषा तितकीच धारदार आहे. हे परिवर्तनाकडे टाकलं जाणारं पाऊल आहे. 
* मुळात त्याची सुरुवातच अमेरिका आणि आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांकडून झाली. कारण त्यांनी यातूनच त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला होता. त्यांच्यावर झालेले अत्याचार यातूनच त्यांनी समोर आणले होते, त्यांचं जगणं अधोरेखित केलं होतं. 
* रॅप केवळ संगीत नसून क्र ांतीचं, मनातील घालमेल, अत्याचार व्यक्त करण्याचं ते एक शस्र आहे.
 

 

Web Title: meets rapers and share their world of joy & rebel.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.