तोंड काळं करणारे पेंटर, गावखेड्यातल्या तरुण मुलांची डेंजर लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 04:22 PM2018-02-07T16:22:55+5:302018-02-08T08:46:43+5:30

खेड्यापाड्यात लव्ह होण्याचं प्रमाण बक्कळ. लव्हमॅरेज होण्याचं प्रमाण कमी. कारण आर्थिक वातावरण. पोरी पोराची जात पाहतातच; पण त्याची ऐपतही पाहतात. समानतेच्या गप्पा मारतील; पण कमवायची जबाबदारी पोराचीच. त्यात पुढं पळून गेलो तरी पोलिसासमोर पोरगी कबलंल का, तिच्या घरचे आपला खून तर करणार नाही याची काळजी पोरालाच. एवढं जमलं तर करतो एखादा जिगरबाज इंटरकास्ट लव्हमॅरेज !

lovestory in village | तोंड काळं करणारे पेंटर, गावखेड्यातल्या तरुण मुलांची डेंजर लव्हस्टोरी

तोंड काळं करणारे पेंटर, गावखेड्यातल्या तरुण मुलांची डेंजर लव्हस्टोरी

googlenewsNext


- श्रेणिक नरदे

आपण किती काय आणि कायपण असलो तरी आजूबाजूची परिस्थिती, समाज, भवताल, वातावरण या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होतच असतो.
किंवा ते वातावरणच आपल्याला नाचवत किंवा वागवत असतं.
अलीकडं व्हॉट्सप विद्यापीठातील तज्ज्ञ लोकांनी तयार केलेले मेसेज हे आपण फॉरवर्डत असतो.
त्यातलाच हा एक नमुना :
लोक काय म्हणतील? यापेक्षा आपण काय म्हणतो हे लोक ऐकतील, अशी परिस्थिती निर्माण करा..!
व्हॉट्सप विद्यापीठातून येणाºया या मेसेजचा किंवा सुविचाराचा निर्माता कोण हे नदीचं मूळ आणि ॠषीचं कुळ हुडकण्यापेक्षा अवघड काम. साधारणपणे एक सुविचार किंवा लेख मला तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांच्या नावानं येतो. प्रसिद्ध अभिनेता, प्रसिद्ध अधिकारी किंवा प्रसिद्ध समाजसेवक अशा तीनही लोकांच्या संयुक्त विद्यमाने हे मेसेज मिळतात. आपण काय करू शकतो, वाचतोय बिचारे.. नि करतोय फॉरवर्ड.
पण लोक काय म्हणतील याचा विचार न करणारा मनुष्यप्राणी मिळणं तसं कठीण काम. तरुण पोरं तर त्याहून कठीण. चालीरीती, धर्मजात, परंपरा वगैरे मोडकळीत निघत चाललंय ही जरी गोष्ट खरी असली तरी मागासलेली खेडी या चालीरीती, धर्मपरंपरा नि अनेक मागासलेल्या परंपरा टिकवून ठेवतात. धार्मिक-जातीय कट्टरता ही मेट्रो सिटीच्या तुलनेत आमच्या खेड्यात जास्त असल्याचं मान्य केलंच पाहिजे.
आणि आजच्या तारखेचा हा समाज प्रेमीयुगुल लोकांसाठी एवढा धोकादायक झालाय की निम्म्या आत्महत्या, हत्या याच समाजाने केल्या. नुसतं धार्मिक, जातीय नव्हं तर आर्थिक वातावरणपण प्रेमाला पोषक नाही. एक बºयापैकी वयस्क मित्र सांगत होता की, आता लव्ह होण्याचं प्रमाण बक्कळ; पण लव्हम्यारेज होण्याचं प्रमाण कमी. कारण आर्थिक वातावरण. आजही एखाद्या जोडप्यानं पळून जाऊन प्रेमविवाह केला तर (पळून जाऊन, हे मला कधीच कळालं नही, कारण माझी एक वर्गमैत्रीण भरपूर जाडी होती, तिनंपण पळून जाऊन लग्न केलं..) काय होईल?
एक तर आज सहजासहजी संसार सेट होईल अशी काय स्थिती नाही, दोघंही घर सोडणार असले तरी नैतिक जबाबदारी ही पोराकडे असतेच. घर उभारणी करणं (बांधनं नव्हं) राहणं, खाणं, पिणं या ज्या काही गरजा असतात त्या आता स्वतंत्रपणे आईबापाच्या आधाराशिवाय भागणं आजरोजी शक्य नाहीत. निम्म्या प्रेमकहाण्यांचा अंत इथंच होतो. एकवेळ समाजाला झुगारून देऊ शकतो; पण गरजांचं काय? आणि आतापर्यंत भोगलेलं सुखी जीवन सहजासहजी कुणी सोडायला तयार नसतो. त्यातून ९० टक्के प्रेमकहाण्या विचार करून सामंजस्यानं संपवून टाकल्या जातात. करेल ती मुलगी/होईल तो नवरा म्हणून संसार सुरू होतात. आणि मग नंतर दहा-वीस वर्षानं ‘ती सध्या काय करते?’ वगैरे टाइपचा उत्सव सुरू होतो.
खेड्याचं वर्णन जरी मायाळू माणसं, जिवंत खेडी असं होतं असलं तरी जातिधर्म-रूढी-परंपरांच्या बाबतीत खेडी कालही निर्घृण होती, आजही परिस्थिती बदललेली नाही. मुळात मानवी जीवनात अशी काही व्यवस्था नाही की मुलाकडं जातीच्याच मुली अ‍ॅट्रॅक्ट व्हाव्यात. त्यामुळं प्रेम कुणावरही होतं, ते व्हायला वेळ लागत नाही. पण लग्नाची वेळ आली की पोरं बधीर होतात. अलीकडे पोरांना तरी घरची साथ मिळते; पण पोरींच्या घरी नसतंय तसं. आमची पोरीची बाजू वगैरे म्हणत रडारड चालू होते. साधारणपणे आंतरजातीय लग्न करतो म्हणणारे पोरगा-पोरगी लगेच दोन्ही समाजाच्या दृष्टीने ‘पेंटर’ होतात. घरच्यांचं तोंड काळं करण्याचं, थोबाड रंगवण्याचं वगैरे कॉण्ट्रेक्ट घेतल्यागत. यामध्ये मुलगा फिकट काळा (ग्रे किंवा राखाडी) करतो तर मुलगी गडद काळं (काळंकुट्ट) करते.
सध्या लिंगगुणोत्तराच्या प्रमाणानं आंतरजातीय लग्न करणाऱ्या पोरांच्या आईबापाला सहिष्णू तर पोरीच्या आईबापाला असहिष्णू बनवलंय. बहुतांश ऑनर किलिंगच्या घटनेत मुलीकडच्याच लोकांचा सहभाग असतो. त्याउलट पोरांचे आईबाप समाजाचा विरोध पत्करून जबाबदारी घेण्याचं धाडस करू लागलेत ही गोष्ट तशी चांगलीच म्हणावी लागेल.
सांगायला काय जातं की पोरापोरीनं रजिस्टर लग्न करावं. पण रजिस्टर लग्नात साधारण एक महिना कालावधी लागतो. परत ते लग्न नोटीस बोर्डावर जातं. हरकत मागवतात. त्यातून ती गोष्ट जर घरच्यांच्या कानावर गेली तर लग्न मोडण्याचीच शक्यता अधिक असते. त्यापेक्षा पळून जाणं बरं. पण ते केलं की लगेच मग मिसिंगची कम्प्लेंट. मग पोलीस स्टेशनला हजर होणं. मग दोन्ही पार्ट्या आमने-सामने. दोघांना इमोशनल ब्लॅकमेल, धाक वगैरे. मग मुलीचा ताबा. मग मुलगी काय म्हणते हा मोठाच प्रश्न. ती काही उलटं बोलली तर गडी आत. सरळ बोलली तर संसार सेट. हे जे मानसिकटेन्शन असतं ते गड्याला झेलायला लागतंय. त्यात मध्ये पोलीस मामा-मामी लुडबुड करतात. सध्याला पोलिसांमुळे सुरक्षित वाटण्यापेक्षा भीतीच अधिक वाटतेय प्रेम करणाºयांना.
हे असलं प्रकरण म्हणजे लै खतरनाक असतं. प्रत्येक जण टपलेला असतो. कधी एकदा या जोडप्याची वाट लावून ताटातूट करतो असं त्यांना वाटत असतं. त्यांना तोडून लोकांना कुठलं समाधान मिळतं काय माहिती?
त्यात आता मुलीपण मूर्ख नाहीत. हिकडची-तिकडची परिस्थिती, पोराची क्षमता वगैरे सगळं पारखूनच चालू असतं त्यांचं. ते बरं असलं तरी समाज त्यांचं भलं होऊ देत नाही. या अशा टोकाच्या जातीय धार्मिक कट्टरतेतून दोन घरांचं नुकसान होतं. आणि तिथून पुढं ज्याच्याशी लग्न होईल त्याचंही नुकसान होतंच. या जातिधर्माच्या आडमुठ्या हट्टापोटी अखंड घरं बरबाद झाली.
आज स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा कितीही असल्या तरीही फूस लावणारा, आमिष दाखवणारा पोरगा वगैरे टाइपच्या बातम्या आपण वाचतो ना पेपरात. जेव्हा दोघं पळतात तेव्हा मुलगाच दोषी असतो. कधीही मुलीनं फूस लावून मुलाला पळविलं वगैरे बातम्या येत नाहीत. साहजिकच मुलाची जबाबदारी कधीही मुलीपेक्षा अधिकच असते. त्याला शंभरपट विचार करावा लागतो. कोण काय म्हणेल? आपलं काय होईल? आपला खून कोण करेल? अशा अनंत अडचणींचा सामना पोरांना करावा लागतो. भलेही तो समाजाच्या इतर पॅरामिटरमध्ये चांगला असला तरीही धर्मजातीच्या पट्ट्या त्याचा गळा कापतात. यासाºयाला भिऊन गप्प बसावं तर हिंमत नसल्याची बोलणी खावी लागतात. या सगळ्या तणावातून आत्महत्या करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय.
पण म्हणून तरुण काही हिंमत हारत नाहीत म्हणा.. गेल्या काही दिवसांत कंजारभाट समाजातील अनिष्ट कौमार्य चाचणी प्रथेविरुद्ध एकवटलेला तरुण वर्ग बघता येणारे दिवस जुनाट रीतरिवाज तोडून टाकणारे असतील हे मात्र नक्की ! तोवर मात्र गावोगावचे पेंटर पळत राहणारच बिचारे..


(श्रेणिक जयसिंगपूरला राहतो, शेती करतो.)

Web Title: lovestory in village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.