मुलगा-मुलगा मुलगी-मुलगी यांच्यात ‘तसलं’ काही?- एवढं काय त्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 03:02 PM2019-01-10T15:02:05+5:302019-01-10T15:03:03+5:30

अरे बापरे! असे धक्के तरुण मुलामुलींना हल्ली बसत नाहीत. ते म्हणतात, असेल तसं, त्यात काय?

LGBT- so what? | मुलगा-मुलगा मुलगी-मुलगी यांच्यात ‘तसलं’ काही?- एवढं काय त्यात?

मुलगा-मुलगा मुलगी-मुलगी यांच्यात ‘तसलं’ काही?- एवढं काय त्यात?

Next
ठळक मुद्देतो-तो, ती-ती आणि ते लैंगिक कलाचा स्वच्छ स्वीकार

प्राची  पाठक 

तुमचं आमचं सेम असतं.
 अशी प्रेमाची कविता. प्रेम म्हणजे प्रेम असतं, सगळ्यांचं सेम असतं ही भावना आपल्याला आवडते. तसं म्हणायलाही आवडत असतं.
पण ते ‘सेम’ असणं इतकं सहज सोप्पं नसतं. 
ते प्रेम भिन्न लिंगी असेल, म्हणजे एक मुलगा-एक मुलगी यांची लव्हस्टोरी असेल तरच प्रेम सेम सेम आहे  असं वाटतं. तशी गाणी, कविता, कथा ‘नॉर्मल’ वाटतात. 
एक मुलगा आणि एक मुलगी, दोनो हैं दिवाने. हे एकदम नॉर्मल. मग त्यांच्या दीवानगीच्या कितीही कविता लोक पाडत राहातात. पण हेच प्रेम एका मुलाचं दुसर्‍या मुलावर असू शकतं. एका मुलीचं दुसर्‍या मुलीवर प्रेम असू शकतं, कोणाचं बाय सेक्शुअल असू शकतं हे जाणवतं का आपल्याला? 
हे असं ‘प्रेम’ प्रेमाच्या ‘सेम सेम’ वगैरे व्याख्येत चटकन बसवत नाही आपण. ते सगळं काहीतरी विकृत आहे, नॉर्मल नाही अशीच धारणा असते समाजाची. तृतीयपंथी आयडेन्टीला तर खिल्ली उडवण्यापासून ते वाळीत टाकण्यार्पयत अनेक चॅलेंजेसचा सामना सतत करत राहावा लागला आहे. अजूनही करावा लागतो आहे. त्यात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारचं शोषणसुद्धा होत असतं. या लैंगिकतेच्या सर्व पैलूंबद्दल आता कुठे जगभर स्वीकार वाढत चाललेला दिसतो आहे. हे नैसर्गिक आहे की नाही, याच्या चर्चा जोरजोरात घडवून आणल्या जातात. मेडिकल सायन्स, मानसतज्ज्ञ या आयडेन्टिटीला एकवेळ नॉर्मल मानत असतीलसुद्धा; पण समाजात अजूनही खूप मोठा कर्मठ वर्ग आहे, जो अशा लोकांना चिरडून टाकायला, बदलायला, जबरदस्तीने ट्रीटमेन्ट वगैरे घ्यायला भाग पाडायला अगदीच उतावळा आहे. 
आपली सेक्शुअल आयडेन्टिटी म्हणजे काही साचेबद्ध कप्पा नसतो. अमुक म्हणजे एकदम कडक भिन्न लिंगी आणि तमुक म्हणजे एकदम पक्का समलिंगी, ऐसा नहीं होता दोस्तो! लैंगिकतासुद्धा एका स्पेक्ट्रमवर समजून घेतली जाते. ‘पुरु षासारखा पुरु ष तू’ किंवा ‘मुलगी म्हणजे काचेचं भांडं!’ या तमाम टिपिकल वाक्यांमध्ये जे जे कोंबलेलं असतं, ते ते सगळं तसंच्या तसंच खरं नसतं. त्यातही विविध शेड्स असतात. या शेड्सना मारून, मुटकून बदलायची गरज नसते. लपूनछपून अशी ओळख जपत कुढत बसायची आवश्यकता नसते. मात्र त्यांना आजवर तसं जगावं लागलं आहे.
खरं तर समाजात आपली वेगळी लैंगिकता जपणे ही वाट अत्यंत खडतर असते. इतरांशीच काय आपल्याआतही आपल्या लैंगिक कलासंदर्भात एक स्पष्टतेची लढाई आधी लढावी लागते. आपला कल आपला आपल्याला स्पष्ट झाला की मग आपल्या कुटुंबाची साथ मिळायला लागते. त्यानंतर येतो तो समाजातला स्वीकार. 
खरं सांगा, सुखासुखी कोण कशाला इतक्या खडतर वाटेने चालायला लागेल? 
त्यामुळे आपला कल वेगळा आहे असं कुणी म्हणत असेल तर ‘ही काय नसती थेरं’, ‘कसा स्वैराचार बोकाळला आहे’, ‘आमच्या वेळी नव्हतं बाबा असलं काही’, ‘विकृतीच आहे ही’ असली शेरेबाजी करण्यात काही शौर्य नाही. जे हे सारं सहन करतात, त्यांचा कल तसाच असणार हे आपण मान्य करायला हवं. त्यात विकृत, अ‍ॅबनॉर्मल असं काही नसतं. एखाद्याच्या केसांचा रंग काळा आहे, एखाद्याचा केसांचा रंग सोनेरी आहे हे किती सहज असतं. तसंच हे लै¨गक प्राधान्यक्रम आणि कल यासंदर्भातही म्हणता येईल.
एखाद्या तळ्याच्या किनारी दोन तरु ण शेजारी बसलेत किंवा दोन मैत्रिणी गप्पा मारताना सहजच दिसल्या, त्यांच्यात ‘तसं’ काही आहे असं वाटलं तर ते प्रेम आहे, ते परस्परांच्या प्रेमात असतील असं मान्य करायला काहीच हरकत नाही. ती भावना समजून घेण्याइतपत प्रगल्भताच आपल्याला माणूसपणाकडे नेणार असते. कोणतीच कट्टरता फार काळ कुरवाळत बसता येणार नाही, हेही कळत जातं. 
‘होमो-होमो’वाल्या प्राइड परेड्सचं वातावरणसुद्धा कालांतराने निवळत जाईल. त्यांच्याविरुद्ध होत असलेल्या अन्यायी, अमानवीय वर्तणुकीची कट्टरताही कमी कमी होत जाईल. या सर्व सामाजिक बदलांमध्ये महत्त्वाचा रोल असेल तो ‘खुल्या दिमागवाल्या’ आजच्या समंजस तारुण्याचाच.

तरुण मुलं सहज म्हणतात,
होता है यार!

1. लैंगिक अग्रक्रम आणि कल यांनाच विकृती ठरवायला निघालेल्या कर्मठ वातावरणात एजीबीटीक्यू या लैंगिकतेच्या विविध शेड्सना सहजच समजून घेणारे कोणी असतील, तर ते आहेत आजचे तरु ण.  प्रेम हे प्रेम असतं आणि ते कुणाचंही कुणावरही असू शकतं, हे त्यांना फार सहजच कळतं. 
2.‘करून करून प्रेमच तर करतात ना यार, त्यात काय वाईट आहे!’ हा खुला दिमाग आज तरुणाईत सहज दिसून येतो. एखाद्याबद्दल आत्मीयता वाटणं, संमतीने असलेली शारीरिक जवळीक आणि त्यातली नजाकत यात त्यांना काहीही ‘आक्षेपार्ह’ वाटत नाही. ‘प्यार तो प्यार होता है’ हे एरवीचं घिसपिटं विधान कोणाला सर्वात जास्त क्लिक होत असतील, तर ते या जनरेशनलाच! 
3.सुदैवानं आता कायदा बदलला आहे. कायद्यानं आता तृतीयपंथी लैंगिक ओळखीसह त्याप्रकारच्या संबंधांनाही गुन्हा ठरवणं बंद झालं. हा बदल एकीकडे आणि दुसरीकडे अशा सर्व दबलेल्या, वाळीत टाकलेल्या समाजघटकांना एक मोकळं वातावरण देणं, त्यांचा प्रेमळ स्वीकार करणं आजच्या तारुण्यानंही सुरू केलं आहे. 
4. कुणाचंही वेगळं सेक्शुअल ओरिएन्टेशन, वेगळा कल पाहून ‘अरे बाप रे’  असे धक्के त्यांना बसत नाहीत. ‘होता है यार’ असा सहज स्वीकार त्यांच्या वर्तनात दिसतो आहे. 

Web Title: LGBT- so what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.