4 रुपये किलोने विकली केळी, निसर्गाची जादुई खेळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 07:00 AM2019-03-14T07:00:00+5:302019-03-14T07:00:08+5:30

दुधाचा व्यवसाय पण मला धार काढता येत नव्हती, एकदा मात्र केलीच हिंमत आणि तिथं जे शिकलो त्यानं शेतीत टिकलो.

Lessons taught to the new farmer | 4 रुपये किलोने विकली केळी, निसर्गाची जादुई खेळी!

4 रुपये किलोने विकली केळी, निसर्गाची जादुई खेळी!

Next
ठळक मुद्देज्या मूल्यांचा विचार करून शेतीत शिरलो होतो, त्यांच्याशी तडजोड करायची नाही हा विचारही आणखी दृढ झाला.

सुबोध पाटणकर

दुभती गाय कशाला म्हणतात हे माहिती नसलेला मी, एक दिवस शेती करायची म्हणून मुंबईहून थेट गावात आलो. एक शहरी माणूस शेती करायला आला आहे हे कळल्यावर अनेकांनी माझा फायदा घ्यायचाही प्रयत्न केला. कारण शेतीतलं मला काहीच फारसं माहिती नव्हतं. एक दिवस कामगार अचानक सोडून गेले. घरी दूध देणार्‍या गायी होत्या. दुभत्या गायचं दूध नाही काढलं तर तिला त्नास होतो. मात्र धार काढायला कुणी नाही. करणार काय? बरं नेहमीचं धार काढणारं माणूस नसेल तर गायी अशा वेळी लाथा मारतात हे मी ऐकून होतो. मला भयंकर टेन्शन आलं की, करायचं काय? शेवटी ठरवलं की आपण काढू धार. पण गायनं मला मान वळवून असा एक ‘लूक’ दिला की काय सांगू? एकाच वेळी घाबरत आणि लाजत मी दूध काढायला लागलो; पण आश्चर्य म्हणजे त्या गायनं शांतपणे मला दूध काढून दिलं. त्या दिवशी मी प्रथमच एका प्राण्याला मिठी मारली. माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि वाटलं जमेल आपल्याला.  त्याक्षणी मनात एक दुर्दम्य आत्मविश्वास जन्माला आला होता.

आज ‘पाटणकर फार्म प्रॉडक्ट्स’ ची मध, जायफळ, मिरी, तूप, सुंठ इ. उत्पादनं आम्ही बाजारात नेतो. पण आता या टप्प्यावर पोहोचेपर्यंत मी अनेकदा खड्डय़ात पडलो आहे. शेतकर्‍याची हतबलता स्वतः अनुभवली आहे.

एकेवर्षी मी दोन एकर जागेवर केळी लावली. 8-10 महिने जिवापाड  काळजी घेतली. पीक हाताशी आलं. उत्पादनही चांगलं आलं. मी ऐकलं  होतं की केळी कच्ची असतानाच विकली तर सहज खपतात; पण हेदेखील ऐकलं होतं  की व्यापारी किंवा  विक्रेते त्यांना चुना किंवा तत्सम लावून कृत्रिमरीत्या पिकवतात. जे खाणार्‍यांसाठी चांगलं नसतं. लहान मुलंही केळी खातात. म्हणून असं ठरवलं की आपण केळी  जवळपास पिकली की मगच विकायची. काही व्यापारी पिकलेली केळी घ्यायला तयारही झाले; पण वेळ आल्यावर फिरले. नाही म्हणाले. आमचा ट्रक जेव्हा मार्केटमध्ये गेला तेव्हा एका व्यापार्‍याने 4 रुपये किलोचा भाव लावला. बाकीचा कुठचाही व्यापारी त्यापेक्षा जास्त भाव द्यायला तयार झाला नाही.

ती केळी रस्त्यात फेकून देण्यापेक्षा जे चार पैसे मिळाले ते घेऊन गप्प बसलो. मी असं ऐकून आहे की बरेचदा केळीच्या झाडाच्या खोडामध्ये जंतुनाशकाचं इंजक्शन दिलं जातं. मी त्यावर विचारही नाही केला. विकतानादेखील हुशारी नाही दाखवली. प्रामाणिकपणाच्या हव्यासापोटी खूप नुकसान झालं असंही वाटलं. त्या दिवसापासून नाशवंत पिकांचं (उदा. भाज्या, काही फळे) उत्पादन करायचं नाही असं ठरवलं. ज्या मूल्यांचा विचार करून शेतीत शिरलो होतो, त्यांच्याशी तडजोड करायची नाही हा विचारही आणखी दृढ झाला.

नंतर मी मध, आलं, मिरी, जायफळ, दालचिनी इ. उत्पादने घ्यायला लागलो. एकीकडे माझी आणि निसर्गाची गट्टीही वाढत होती. मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात, एका संध्याकाळी घरात बल्ब लावले आणि कैकहजारोंच्या संख्येने बारीक किडे त्या बल्ब भोवती जमले. एवढे की जवळपास दिसेनासं झालं. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यातले बरेच किडे तिकडेच मरून पडले होते. थोडय़ा वेळात पाऊस सुरू झाला. नंतर कळलं की हे किडे पावसाची चाहूल घेऊन येतात. ते दिसले म्हणजे लवकरच पाऊस येणार असं समजायचं. हे असं सारं माझं शिक्षणही सुरू झालं. एकीकडे, दुर्लक्षित असलेला शेती व्यवसाय कसा वृद्धिंगत होईल यासाठी माझे निसर्गावर प्रयोग चालू होते आणि  त्याच वेळी निसर्ग माझ्यासारख्या  नास्तिकाला परमेश्वराचे अनेक वेगवेगळे खेळ व जादू दाखवत होता. त्याचेही माझ्यावर प्रयोग चालू होते.

हे प्रयोग कसले होते, किती फसले याबद्दल पुढच्या भागात बोलू.

Web Title: Lessons taught to the new farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी