लेक्चरबाजी

By Admin | Published: February 1, 2017 03:58 PM2017-02-01T15:58:49+5:302017-02-01T15:58:49+5:30

कंटाळलेले प्राध्यापक, त्यांचं रटाळ शिकवणं, पिवळ्या पडलेल्या जुनाट नोट्स, पुस्तकी भाषणं आणि प्रॅक्टिकलचा अभाव.. असल्या वातावरणात कॉलेजात जाऊन ‘शिकावं’ असं कुणाला वाटेल?

Lecturer | लेक्चरबाजी

लेक्चरबाजी

googlenewsNext


कॉलेजातले प्राध्यापक आम्हाला ‘खिळवून’ ठेवू शकत नाहीत, असं मुलं का म्हणतात?


लेक्चर्स होतात, पण शिक्षक इतके रटाळ शिकवतात की वर्गात बसावंसं वाटत नाही. शिक्षक पिवळे पडलेले वर्षानुवर्षाचे कागद घेऊन येतात आणि ते वाचून विचारतात, ‘समजलं का?’
काहीजण तर हायटेक, ते आता वर्गात डायरेक्ट पीपीटीच आणतात, आणि बेसूर रटाळ भाषेत काहीतरी सांगत राहतात.
काही ठिकाणी तर वर्गात फिरकतच नाहीत शिक्षक.
कुठं दोन-तीन वर्षे सिनिअर असलेले तरुण मुलं-मुलीच येतात डायरेक्ट शिक्षक म्हणून शिकवायला. त्यांनाच मुळात काही विषय समजलेला नसतो, ते काय शिकवणार?
कुठं प्रयोगशाळा नावाची गोष्टच नाही, कुठं प्रॅक्टिकल ट्रेनिंगच नाही.. तर कुणीकुणी शिक्षकांच्या पार्सलिटीचा आणि धाक-दडपशाहीचा बळी..
अशा किती कहाण्या, किती तक्रारी राज्यातील कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलामुलींनी आॅक्सिजनला लिहून कळवल्या. मेल केल्या.
आॅक्सिजनने दि. १६ डिसेंबर २०१६ रोजी एक लेख प्रसिद्ध केला होता. आॅक्सफर्ड विद्यापीठाच्या एका माजी विद्यार्थ्यानं एक मिलियन पाउण्डचा दावा ठोकत विद्यापीठाला चक्क न्यायालयात खेचलं अशा आशयाचा तो लेख. आणि मुख्य म्हणजे तो विद्यार्थी भारतीय वंशाचा आहे.
फैज सिद्दीकी त्याचं नाव. आॅक्सफर्ड विद्यापीठांतर्गत ब्रासनोज कॉलेजमध्ये तो मॉडर्न हिस्ट्री विषय शिकत होता, तेही १६ वर्षांपूर्वी. त्याचं असं म्हणणं आहे की, तो ज्या काळात कॉलेजात शिकत होता, त्या काळात त्याला चांगलं शिक्षण मिळालं नाही. जे मिळालं ते अत्यंत वाईट आणि ‘बोअरिंग’ होतं. आणि त्यामुळे त्याला जी रॅँक मिळायला पाहिजे होती त्या तुलनेत कमी मार्क, कमी रॅँक मिळाली. त्यामुळे इंटरनॅशनल कमर्शिअल लॉयर म्हणून त्याला काम करता आलं नाही. आणि त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. आता या संदर्भात वाद सुरू आहेत. कोर्टात केस उभी राहते आहे. मात्र सिद्दीकी ही केस जिंकलाच तर अशी शेकडो मुलं पुढे येऊन कोर्टात अर्ज करतील, अशी ब्रिटिश मीडियात चर्चा आहे.
त्या घटनेच्या निमित्तानं ‘आॅक्सिजन’ने राज्यभरातल्या तरुण विद्यार्थ्यांना विचारलं होतं की, तुमच्या संदर्भात असं काही होतं का? तुम्हाला लेक्चर बोअर होतात का? त्यातून आपलं काही नुकसान होतं आहे, असं तुम्हालाही वाटतं का?
या एका प्रश्नावर उत्तर म्हणून राज्यभरातील मुलामुलींनी जे लिहून पाठवलं ते अस्वस्थ करणारं आहे..
एका मुद्द्यावर साऱ्यांचं एकमत आहे. मुलं म्हणतात, ‘आम्हाला लेक्चर्स नुस्ती बोअर होत नाहीत, तर रटाळ शिकवण्यानं आमचा अभ्यासातला रस उडतो आणि मार्कांवर परिणाम होतो. नोकरीच्या बाजारात आम्हाला कुणी उभं करत नाही. त्यामुळे शिक्षकांनी किमान आम्हाला समजेल आणि विषयाची आवड निर्माण होईल इतपत तरी बरं शिकवावं.’
तरुण मुलांनीच लेक्चर बोअर होण्याची, अभ्यासात रस न वाटण्याची काही कारणंही सांगितली. मान्यही केलं की, आम्हीही वर्गात टवाळक्या करतो, कमेण्ट्स करतो, बंक मारतो, रट्टा मारून वेळ मारून नेतो पण या साऱ्यात आमच्या करिअरचा मात्र विचका होतो, असं बहुसंख्य मुलं सांगतात.
शिक्षणपद्धतीला केवळ दोष देऊन या प्रश्नातून सुटका होणार नाही हे सांगणारं हे एक वास्तवचित्र आहे.

 

 

Web Title: Lecturer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.