प्रो- कबड्डीत कोटींची बोली कमावणारा कोण हा कोल्हापूरकर तरुण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:34 PM2019-04-19T13:34:50+5:302019-04-19T13:37:08+5:30

हुंदळेवाडी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या चाळीस उंबर्‍यांच्या लहानशा गावातला सिद्धार्थ. प्रो-कबड्डीत त्याच्यावर 1.45 कोटींची बोली लावत तेलगू टायटन्सने त्याला संघात घेतलं. कोण हा सिद्धार्थ?

Kolhapurkar sidharth desai, young man who earns crores rupees bids for pro-kabaddi. | प्रो- कबड्डीत कोटींची बोली कमावणारा कोण हा कोल्हापूरकर तरुण?

प्रो- कबड्डीत कोटींची बोली कमावणारा कोण हा कोल्हापूरकर तरुण?

Next
ठळक मुद्देविशेष म्हणजे यंदा ‘तेलगू टायटन्स’ संघानेच 10 लाख रुपयांची बोली लावत सूरजलाही आपल्या संघात घेतलं आहे.

- सचिन भोसले

महाराष्ट्र राज्याचा दक्षिणेकडील शेवटचा तालुका म्हणून चंदगडकडे पाहिलं जातं. याच तालुक्यातील 40 उंबर्‍यांचं हुंदळेवाडी हे छोटेसं गाव. याच गावातले सूरज आणि सिद्धार्थ देसाई हे दोन भाऊ. लाल मातीत तयार झालेल्या सिद्धार्थची प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वात तेलगू टायटन्स संघात निवड झाली. तेलगू टायटन्सने तब्बल एक कोटी 45 लाख रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. कबड्डी खेळणार्‍या सिद्धार्थचं हे कोटींचं उड्डाण सार्‍यांना समजलं आणि कोण हा तरुण म्हणून त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली.
हुंदळेवाडी या गावात घरटी एक कबड्डीपटू आहे. त्यातील अनेकांनी राज्यस्तरार्पयत मजल मारली आहे. देसाई कुटुंबातही कबड्डीत परंपरा आहे. सिद्धार्थचे वडील शिरीष हे जाणते कबड्डीपटू; पण त्यांना परिस्थितीअभावी हा खेळ पुढे नेता आला नाही. तेही आख्ख्या पंचक्रोशीत नावाजलेले रेडर होते. वडिलांच्या खेळाचा वारसा मुलांनाही लाभला आणि मुलं कबड्डी खेळू लागले. शेतात राबणारा मोठा मुलगा सूरज,  तो आधी कबड्डीतला नावाजलेला खेळाडू म्हणून उदयास आला. त्यानं जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचं बोट धरून सिद्धार्थही कबड्डीत आला. वयाच्या सातव्या वर्षी त्यानं कबड्डी खेळायला सुरुवात केली ती सूरजचा हात धरूनच. ही आवड त्यानं शाळेतही जोपासली. महाविद्यालयीन जीवनातही कबड्डी सोडली नाही.  गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयातून त्यानं विज्ञान शाखेतून पदवीही प्राप्त केली. दरम्यान, आक्रमक ‘रेडर’ म्हणून त्याची ख्याती महाराष्ट्रभर पसरली होती. त्यामुळे पुण्याच्या तेजस बाणेर संघानं त्याला करारबद्ध केलं. तेथील खेळाच्या जोरावर त्याची ‘एअर इंडिया’ संघात निवड झाली. यशाची कमान चढतीच राहिली. महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधित्व करत त्यानं राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं. 


प्रो-कबड्डीच्या गेल्या हंगामात ‘यू मुंबा’ संघानं त्याला 36 लाखांची बोली लावत आपल्या संघाकडे खेचलं होतं. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी व प्रामाणिक सराव या जोरावर तो व्यावसायिक कबड्डीमधील संघांच्या कारभार्‍यांच्या गळ्यातील ताईत बनला. ‘एअर इंडिया’कडून दोन वर्षे खेळताना त्याला प्रशिक्षक अशोक शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं. त्यांच्यासह आप्पासाहेब दळवी, पांडुरंग मोहनगेकर, बाबूराव चांदे यांचं त्याला मार्गदर्शन लाभलं.
केवळ आर्थिक भरारी मोठी म्हणून नव्हे तर त्याच्या खेळाचा दबदबा आता देशभर निर्माण होतोय हीदेखील या यशात आनंदाची गोष्ट आहे.

**
 

एकाच संघात सूरज आणि सिद्धार्थ

विशेष म्हणजे यंदा ‘तेलगू टायटन्स’ संघानेच 10 लाख रुपयांची बोली लावत सूरजलाही आपल्या संघात घेतलं आहे. सूरजची प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात जयपूर संघात निवड झाली होती. सिद्धार्थचा कबड्डीतील आदर्श त्याचा भाऊ सूरज आहे, हे विशेष आहे. सूरज सांगतो, सिद्धार्थ हा नियमित उत्कृष्ट खेळ करत आहे. तो मागील वर्षाप्रमाणे यंदाही उत्कृष्ट कामगिरी करेन, अशी मला खातरी आहे.

मेहनत आणि श्रद्धेचं फळ-- सिद्धार्थ देसाई

कबड्डीत खेळाडूंनी एक रुपया खर्च केला तर त्यांना कबड्डी दहा रुपये देते. त्यामुळे सराव करताना जिद्द, प्रामाणिकपणा, सचोटी ठेवली तरच यश आणि पैसाही मिळतो. देशी खेळांतही इतकी भरारी मारता येते ही गोष्ट आता सिद्ध झाली आहे. मात्र खेळावर पूर्ण श्रद्धा आणि मेहनत मात्र मनापासून करायला हवी. 

कबड्डीला चांगले दिवस-- दीपक पाटील,  राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, शिरोली (पुलाची) 

कोल्हापुरात कबड्डीचं मोठं टॅलण्ट आहे. ऋतुराज कोरवी (शिरोली), गुरुनाथ मोरे (सध्या पुणेरी फलटण, मूळचा लाकूडवाडी, आजरा), अक्षय जाधव (राधानगरी), महेश मगदूम, तुषार पाटील (दोघेही शाहू-सडोली), आनंद पाटील, सूरज देसाई यांच्यासह सिद्धार्थनेही बाजी मारत अल्पावधीत खेळाच्या जोरावर ‘रेडर’ अर्थात चढाईपटू म्हणून सर्वत्र ख्याती मिळवली आहे. हाच आदर्श घेऊन अन्य कबड्डीपटूंनाही व्यावसायिक संघांची दारे खुली झाली आहेत. कबड्डीकडे आशेनं पहावेत असे दिवस आहेत.


(सचिन लोकमच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहे.)

Web Title: Kolhapurkar sidharth desai, young man who earns crores rupees bids for pro-kabaddi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.