कबर्‍या, असं कुठं असतंय व्हय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 07:00 AM2019-07-04T07:00:00+5:302019-07-04T07:00:02+5:30

कबीर. म्हणजे कबर्‍या हो. तरण्या पोरांना वाटतं, लई सुपरहिरो हाय हा गडी; पण त्याच्यासारखं वागणं कुठं खरं असतंय हो?

Kabir Singh: Idea of Romance Gets Toxic? is it true Romance? | कबर्‍या, असं कुठं असतंय व्हय?

कबर्‍या, असं कुठं असतंय व्हय?

Next
ठळक मुद्देप्रेम उत्स्फूर्त असतंय हे मान्य. पण एवढं? पण असं कुठं असतंय व्हय?

- श्रेणीक नरदे

कबीर सिंग हा चांगल्या घरातला पोरगा हाय. आईबाप श्रीमंत असून, कशाचीसुद्धा कमी नही. आईबाबा चांगल्या स्वभावाचे हायीत, कसलंबी टेन्शन नही, कबर्‍याच्या (म्हणजे कबीर हो) दोस्तीत एकबी गडी दारूडा नही. या गडय़ाला कसलंच टेन्शन नही, तरी बघील तवा याची बाटली आणि सिगरेट तयार. चिक्कार दारू पितो. साखर कारखान्याच्या बॉयलरसारखं सिगरेट कायमच पेटलेली, एकदाबी जेवताना-खाताना दिसत नही. निदान दारूबरोबर तर चखना घ्यायचा तर ते बी काय खात नही, कोरी दारू हाणत असतो. 
एवढं करून बॉडी एकदम टाइट. 
दारू सिग्रेट कायम वढूनही हा टॉपर असतो, डॉक्टर होतो, तिथंबी जाऊन दारू पिऊनच पेशंट कातरायला घेतो. दारूडे जाणकार सांगतात की, क्वाटर दारू पिली तर नाकाम्होरं चालता येत नही, तिथं हे गडी टारटारटार फाडून ऑपरेशन सक्सेसफुल करत असतो. कबर्‍याचं नशीब लिवताना देवाच्या पेनात काय शाईऐवजी रेड वाइन भरलीती का काय माहिती? 
 इथं सगळ्या कॉलेजात डाक्टरलोक किती अभ्यास करत असतात ते डॉक्टरांना माहिती. त्यात हे असं एवढय़ा लाइटली कुणी सर्जन तज्ज्ञ होऊ शकत नाही. 
 ती मैत्रीण दिसली कि घे कवळ्यात, दिसली कि घे कवळ्यात असं पिसाळल्यागत करत असतो. तिला आणून बॉइज हॉस्टेलवर स्वतर्‍च्या रूमवर ठेवतो. तिथले मास्तर लोक काय वल्र्डकप बघायला गेलेले असत्यात का? 
 हे सगळं होतंय, त्या नटीचं लग्न होतंय, हे भिकंला लागतंय, फेल गेलेलं असतंय, परत भेटत्या तर काय दिवाळीचा बोनसच. तिच्या पोटातलं लेकरूपण याच गडय़ाचं असतंय.
हा सगळा असतो सिनेमा. तरणी पोरं जी या प्रसंगी थेटरातून शिट्टय़ा घुमवत असतात ते बिचारे स्वतर्‍त कबर्‍याला बघत नसतात. बापलेकाने जर एकत्न बसून हा शिनमा बघितला तर बाप घरात येऊन लेकरू जरी सरळमार्गी असलं तरी चारदोन कानाखाली ठेवून देईल.
 शिनमा शिनमा असतो, तो एवढा सिरीयस्ली घ्यायचा नसतो हे आम्हालापण माहिती हाय; पण हा शिनमा बघून एवढंच म्हणू वाटतंय, ‘असं कुठं असतंय व्हय?’
तरुण पोरं सिनेमा पहायला जातात. त्यात शोधत असतात का कुणी नायक. आपल्याला एखादी गोष्ट जमत नसली आणि दुसरा ती करत असला तर त्याबद्दल एक सहानुभूती असते. कधी कधी भारीही वाटतं. इथं कबर्‍या ज्या काही गोष्टी करत असतो ते काय कोणत्याच तरण्या पोराला करणं शक्य नाही. मग कबर्‍या हा अशा पोरांचा स्पायडरमॅन, बॅटमॅन असा सुपरहिरो असतो.
त्यामुळंच कीकाय कुणास ठाऊक; पण फेसबुकवर तर ही पोरं कबर्‍या यांचा लंगोटीयार असावा असं बोलताहेत. म्हणजे कबीर असाच आहे. तो हुशार आहे, मेरीटात येतो. हे जणू कबीरच्या वर्गात त्याच्याच बेंचवर बसून मोठ्ठे झालेत. प्रेम हे असंच उत्स्फूर्त असतंय असं सांगू लागलेत.
प्रेम उत्स्फूर्त असतंय हे मान्य. पण एवढं? पण असं कुठं असतंय व्हय?
 याच दरम्यान मी एकदा यष्टीतून प्रवास करत असताना दोन कॉलेजकन्या माझ्या मागच्या सीटवर बसल्या होत्या. चर्चेचा विषय कबीर होता. या दोघी कबीर -2 चा विचार करत होत्या. लग्नानंतर त्यांना मूल होतं, मग तो दारू सोडतो. असं एकीनं मत सांगितलं. 
तर दुसरी म्हटली, मला कबीरसारखा बॉयफ्रेण्ड मिळाला तर मी त्याला सुधरवेन. पण आपल्याकडं अशी पिढारी पोरंचं नसत्यात.
 ऐकून पुन्हा तेच वाटलं, ‘असं कुठं असतंय व्हय?’
आशिकी 2, कबीर सिंग, संजू अशी जी काही शिनमं आली, गाजली त्यांच्यात एक समान धागा दिसतो ते म्हणजे हिरो दारू बक्कळ पितो. हिरो दारू पिलेला असला की पिच्चर गाजलाच हे आता इथून पुढं गच्च झालंय.
फक्त आपल्यासारख्या तिकीट काढून महागाचं पॉपकॉर्न खाणार्‍या तरुण जनतेनं तसं वागून चालत नसतंय. आपणच आपल्याला सांगायचं, ‘असं कुठं असतंय व्हय?’
ते वेळीच कळलेलं बरं, नाहीतर लै मारत्यात!

Web Title: Kabir Singh: Idea of Romance Gets Toxic? is it true Romance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.