फक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 07:00 AM2018-09-13T07:00:00+5:302018-09-13T07:00:00+5:30

पुण्यात वाहतूक पोलिसांनी एक प्रयोग केला, एका कर्मचार्‍यानं नियम पाळून 11 किलोमीटर प्रवास केला, दुसर्‍यानं बेफाम, नियम तोडून..

just 4 minutes?- en experiment by Pune traffic police | फक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का?

फक्त 4 मिनिटांसाठी जीव धोक्यात घालणार का?

googlenewsNext
ठळक मुद्देघाईनं गाडी चालवून काही मिनिटे जीव धोक्यात घालण्याइतकी व्यर्थ आहेत का हा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे.

- नम्रता फडणीस 

आपल्याच  ‘तीर्थरूपां’चा रस्ता असल्यासारखं मन मानेल तशी भरधाव वेगात गाडी चालविणं हा जणू एक अभिमानाचाच विषय झाला आहे. वाहतुकीचे उल्लंघन करणार्‍यांसाठी कितीही जाचक नियम करा, त्याची कितीही कडक अंमलबजावणी करा पण सामान्यांच्या मानसिकतेत मात्र मिनिटाचाही तसूभर फरक पडत नाही.
-असा निराशाजनक अनुभव. 
मात्र या सार्‍यावर उत्तर शोधत, तेही कृतीतून आणि थेट देत पुणे वाहतूक पोलिसांनी एक नवीन प्रयोग केला. पुण्याच्या वाहतूक विभागाच्या उपायुक्तपदाचा नुकताच कार्यभार हाती घेतलेल्या तेजस्वी सातपुते यांनी एक अभिनव शक्कल लढविली. वाहतुकीचे नियम पाळूनही आपल्याला इच्छित स्थळी पोहोचण्यास (कितीही घाई असली तरीही) साधारण निर्धारितच वेळ लागतो, फारतर किरकोळ काही मिनिटांचा फरक पडतो हे त्यांनी प्रयोगानिशी सिद्ध करून दाखवलं.  
    वाहतूक शाखेच्या चार कर्मचार्‍यांच्या मदतीनं त्यांनी हा प्रयोग  कात्रज चौक, भाजी मंडई ते शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकार्पयत केला. कात्रज ते सिमला ऑफिस चौक हे अंतर 10 किलोमीटर व 100 मीटरचं आह़े या अंतरात तब्बल 11 सिग्नल आहेत़ साध्या वेशातील कर्मचारी सकाळी 10़30 वाजता कात्रज येथून निघाले. त्यापैकी एका कर्मचार्‍यानं नियम पालन करायचं ठरवलं. दुचाकी चालवताना हॉर्न  न वाजवणं, सिग्नल न तोडणं या नियमाचं तंतोतंत पालन केलं. तर दुसर्‍या दुचाकीवरील कर्मचार्‍यानं वाहतुकीचे कोणतेही नियम पाळले नाहीत. 
दोघंही निर्धारित स्थळी पोहचले. नियम न पाळणारा कर्मचारी आधी पोहचला तर नियम पाळणारा नंतर? पण पहिला कर्मचारी नियम पाळणार्‍या कर्मचार्‍यापेक्षा किती आधी पोहचला? फक्त 4 मिनिटं!
नियम न पाळणार्‍या कर्मचार्‍याला हे अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटं लागली  तर सर्व नियम पाळणार्‍या कर्मचार्‍याला 28 मिनिटं लागली.  याचा अर्थ दोन्ही वाहनचालकांमध्ये फरक होता तो केवळ 4 मिनिटांचा . त्यामुळे नियम तोडून कशाही पद्धतीने वाहन चालवलं तरी केवळ चार ते पाचच मिनिटं फार तर आधी पोहचता येतं, पण वाहतूक शिस्त बिघडते. रॅश ड्रायव्हिंग करत जिवाला धोका वाढतो. या उलट नियम पाळल्यास सुरक्षित आणि वेळेतही निश्चित स्थळी पोहोचू शकतो, याचा जणू एक धडाच मिळाला. 

एक प्रयोग,
तेच ट्रॅफिकचं उत्तर!


तेजस्वी सातपुते सीआयडीमध्ये (टेक्निकल)  एसपी आणि ग्रामीण विभागात अ‍ॅडिशनल एसपी म्हणून पुण्यात दोन वर्षापासून कार्यरत आहे. नुकताच वाहतूक चार्ज हाती घेतला आहे. त्यांनाही पुण्याच्या वाहतुकीची स्टोरी माहीत होती.  त्या सांगतात,  प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार दरवर्षी अडीच लाख वाहनं पुण्यात वाढत आहेत. अडीच लाख ही खूप मोठी संख्या आहे. म्हणजे मी दोन वर्षापूर्वी आले तेव्हाची आणि आताची स्थिती यात खूप फरक आहे. तेव्हा आजच्या इतकं ट्रॅफिक जॅम होत नव्हतं; पण दोन वर्षात पाच लाख वाहनं वाढल्यावर दोन वर्षानी परिस्थिती प्रचंड भयानक होण्याची अधिक भीती वाटते. पावसाळ्यात मी चार्ज घेतला होता. तेव्हा खड्डे, त्यामध्ये भरलेलं पाणी त्यामुळे ट्रॅफिक खूप स्लो व्हायची.  जिथं पाणी साठतं तिथं लोकांना अंदाज येत नाही. याव्यतिरिक्त नो पार्किग झोनमध्ये वाहने उभी असली की आणखीनच अडचण. रस्ता रुंद असला आणि एखादी गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क झाली असेल तर त्याठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी व्हायला वेळ लागत नाही. या व्यतिरिक्त छोटय़ा गाडय़ा दिसेल त्या मार्गाने गाडय़ा काढतात, लोक आडवे तिडवे घुसतात. यासाठी जर थोडक्यात सांगायचे झाले तर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेशन आणि वाहनचालकांत शिस्तीचा अभाव, या गोष्टी कारणीभूत आहेत. या दोन्हींमध्ये जर तोडगा काढायचा असेल तर शिस्त लावण्यासाठी आपण तातडीने प्रयत्न करू शकतो. म्हणून मी हा प्रयोग करून पाहिला.
    आज तरुणाईची मुळातच  वाहनचालकांमध्येच संख्या जास्त आहे. 100 माणसांपैकी 60 तरुण असतील तर नियम तोडणार्‍यांत तेच जास्त असणार.  त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक गाडी चालवावी. नियम पाळावेत. ट्रॅफिकची शिस्त पाळावी ही अपेक्षा आहेच. त्यांच्यासमोर मी हे उदाहरण ठेवलंय की, घाईनं गाडी चालवून काही मिनिटे जीव धोक्यात घालण्याइतकी व्यर्थ आहेत का हा विचार सर्वानीच करण्याची गरज आहे. हा गैरसमज आहे की नियम तोडले तर लवकर पोहोचू. तो गैरसमज या प्रयोगातून दूर झाला असेल अशी अपेक्षा. सगळ्यांनी नियम पाळले तर सर्वाचाच वेळ आणि वेग वाढेल. कुणीतरी आडवा घुसतो, कुणीतरी चुकीचे पार्किग करतो आणि बाकीच्यांना उशीर होतो. त्यामुळे याबाबत प्रबोधन होणं गरजेचं आहे. यापुढील काळातही जसं सुचतील तसे प्रयोग करत राहणार आहे.  हा प्रयोग इतक्या लोकांर्पयत पोहोचेल याची अपेक्षा नव्हती. मी जर म्हणलं असतं की टेक्सासमध्ये हा प्रयोग केला तर लोकांना ते अपील झालं नसतं. त्यामुळे पुणेकरांना ते पटावे यासाठी हा प्रयोग मुद्दाम पुण्यात केला. 
 

Web Title: just 4 minutes?- en experiment by Pune traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.