मी स्वतंत्र झालो!-मात्र...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 07:00 AM2018-09-13T07:00:00+5:302018-09-13T07:00:00+5:30

कलम 377 मधून एलजीबीटी समूहाला वगळण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा स्वतंत्र श्वास घेणार्‍या एका मित्राचं मनोगत

I am free now... but.. | मी स्वतंत्र झालो!-मात्र...

मी स्वतंत्र झालो!-मात्र...

googlenewsNext
ठळक मुद्दे कधी नव्हे ते कसलंतरी मणामणाचं ओझं मानेवरून उतरल्यासारखं वाटतंय. पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही आलीच. त्या जबाबदारीचं भान एलजीबीटी समूहाने बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला समाज साथ देईल, तो सुदिन!

- संदेश कुडतरकर

सर्वोच्च न्यायालयाने दंडविधान कलम 377 मधून एलजीबीटी समूहाला वगळण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वार्थाने ऐतिहासिक म्हणावा लागेल. माझ्या घरच्यांना माझ्या वेगळ्या लैंगिक कलेविषयी मी सांगितलं, त्याला आता सुमारे आठ र्वष उलटून गेलीत. या एवढय़ा मोठय़ा काळात आमच्या घरात प्रचंड उलथापालथ झाली. ही एक फेज आहे असं मला स्वतर्‍ला वाटण्यापासून सुरुवात झाली होती; पण मग मी स्वतर्‍बद्दल हळूहळू सजग होत गेलो आणि त्यासोबत बंडखोरही. अधूनमधून डिप्रेशन असायचंच. माझा कल बदलण्यासाठी मुलीशी लग्न करणंच कसं योग्य आहे, हे पटवून सांगणारे डॉक्टर्स आणि मानसोपचारतज्ज्ञ करून झाले. पण त्यामुळे काहीही फरक पडला नाही. अजूनही मी कधीतरी लग्न करेन आणि  तेही एखाद्या मुलीशीच, या आशेवर ते आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लागलेले होतेच आणि मानवतेला न्याय देणारा निकाल लागला आणि खूप आनंदलो. कधी नव्हे ते कसलंतरी मणामणाचं ओझं मानेवरून उतरल्यासारखं वाटतंय.
कॉलेजमध्ये मास्लोचा पिरॅमिड होता अभ्यासाला. माणसाच्या भौतिक आणि सुरक्षेच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर स्वतर्‍ची प्रगती साधण्यासाठी त्याला गरज भासते ती समूहाचा भाग बनण्याची. या कायद्याने एका अल्पसंख्य गटाला आजवर गुन्हेगार ठरवून या गरजेपासून वंचित तर ठेवलंच, पण त्या अनुषंगाने पुढच्या पायर्‍यांपासूनही मागे खेचत स्वतर्‍चा शोध घेण्यापासून थांबवलं. आजच्या या निर्णयामुळे या समूहातील वंचित घटक निदान आधी स्वतर्‍चा स्वीकार करायला लागतील, स्वतर्‍कडे गुन्हेगार म्हणून न पाहता. बदलाची ही नांदी मोठी नसली तरी दुर्लक्ष करण्यासारखी तरी नक्कीच नाही. विशेषतर्‍ समलिंगी संबंध समाज मान्य करीत नाही आणि त्याला कायद्याचंही संरक्षण नाही, या पाश्र्वभूमीवर लोक आत्महत्या करीत असल्याच्या घटना घडत असताना तर हा निर्णय स्वागतार्हच आहे. व्यक्त होण्यासाठी एलजीबीटी समूहाला आजवर फेक फेसबुक अकाउंट वगैरेचा आधार घ्यावा लागला आहे किंवा मनातलं काहीही व्यक्त न करता तसंच सगळं कोंडून ठेवून मनाविरुद्ध जगावं लागलं आहे. आजच्या या निर्णयाने निदान हे मुखवटे तरी फेकण्याचं बळ त्यांच्यात येईल अशी आशा ठेवायला हरकत नाही.
आयुष्याचा साथीदार शोधताना आधी ऑकरुट, मग फेसबुक अशा प्रवासात खरं तर मनासारखं आजवर मला कुणी भेटलेलं नाही. काही वर्षापूर्वी पुण्यात असताना एक वाईट अनुभव मात्र आला. दोन जणांनी या गोष्टीवरून मला ब्लॅकमेल केलं होतं. पैसे उकळले होते. पैसे दे, नाहीतर तू समलिंगी आहेस, हे आम्ही सगळीकडे पसरवू, पोलिसांना सांगू, अशा धमक्या देत ते पैसे लुटत होते. बाबांनी मध्ये पडून ते प्रकरण सोडवलं. हा जुलमी कायदा नसता, तर त्यावेळी मला अशा कुणालाही घाबरण्याची गरज पडली नसती; मात्र या गोष्टीचा उलटा परिणाम असा झाला की हे जग एलजीबीटी समूहासाठी सुरक्षित नाही, असा माझ्या पालकांचा ग्रह झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा धोशा लावला. त्यानुसार काही स्थळंही पाहून झाली. सुदैवाने मला कुठेही तोंड उघडण्याची गरज पडली नाही; पण ते दिवस आठवले की अंगावर सर्रकन काटा येतो. इच्छा नसताना मी जसा नाही, तसं असल्याचं दाखवत त्या मुलींसमोर बसताना प्राण कंठाशी येत असत. कधीकधी तर त्या भेटींचा इतका ताण मनावर यायचा की नंतर अगदी जवळच्या मित्रांना फोन करून मी ढसाढसा रडत असे. आज हा निर्णय न्यायालयाने दिलाय म्हणजे उद्यापासून सगळं चित्र बदलेल असं मी म्हणत नाही. पण निदान त्या बदलांना सुरु वात तरी होईल, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे.
इथे आम्ही लढाई जिंकली असं म्हणता येणार नाही. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. न्यायालयाने निर्णय दिला तरी तो पचवण्याची अजूनही आपल्या समाजाची मानसिकता नाही. ती तयार व्हायला अजून काही काळ जावा लागेल. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर थोडय़ाच वेळात आमच्या शाळेच्या मित्रांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ज्या पद्धतीचे विनोद फॉरवर्ड केले जात होते, त्यावरून आपला समाज अजूनही याबाबतीत किती मागासलेला आहे, याचीच प्रचिती येत होती. या सर्व गोष्टींना अनुकूल समाजमन तयार होणं ही फक्त एलजीबीटी समूहाचीच नाही तर माध्यमांचीही जबाबदारी आहे. प्रेक्षकांचं या समूहाबद्दल चुकीचं मत बनवण्यात गल्लाभरू चित्रपटांनी कसलाही कसूर सोडलेला नाही. आता मात्र उपरतीची वेळ येऊन ठेपली आहे. शिवाय केवळ अशा संबंधांना मान्यता देऊन या समूहाचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी एक व्यवस्था उभी करावी लागेल. मालमत्तेचे हक्क, परस्परांमधील वाद यावर तोडगा काढण्यासाठी नवीन कायदे अमलात आणावे लागतील आणि हे करताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. थोडक्यात एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना न्यायालयाने  पँडोराज बॉक्स उघडला आहे. नवीन प्रश्न काय आहेत हे जाणून घेतल्यावरच पुढची वाटचाल न्यायव्यवस्थेला करता येईल.
कॉलेज संपल्यानंतर माझ्या कॉर्पोरेट आयुष्याची सुरु वात इन्फोसिसने झाली आणि आता अ‍ॅक्सेंचर कंपनीत मी टीम लीड म्हणून कार्यरत आहे. या दोन्ही कंपन्या लैंगिक छळवणुकीच्या आणि लैंगिक कलामुळे भेदभाव करण्याच्या विरोधात आहेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी मला कधीच माझ्या वेगळ्या लैंगिक कलामुळे अपमानजनक वागणूक मिळाली नसली तरी लोकांचं मत काय असेल हे आपल्या हातात नसतं. माझ्याच पिढीचे काही तरु ण जेव्हा समलिंगी संबंध म्हणजे गुन्हाच आहे, चूकच आहे अशी भाषा करतात, तेव्हा मला खरंच काय बोलायचं ते कळत नाही. अशावेळी कोणालाच दोष देता येत नाही. कितीतरी चुकीच्या गोष्टी पूर्वापार आपल्या मनावर ठसत गेल्यानं माणसाची विचार करण्याची क्षमताच खुंटून जाते की काय, असं वाटू लागतं.   
असं असूनही माझ्या असंख्य मित्र-मैत्रिणींनी आज मला शुभेच्छा दिल्या. त्यातल्या काहींना तर कलम 377 विषयी माहीत नसूनही त्यांचा मला नेहमीच पूर्ण पाठिंबा राहिला आहे. अनुराग बासूच्या बर्फी चित्रपटात एक दृश्य आहे. आपली आयुष्यभराची जोडीदार निवडण्याची बर्फीची एक वेगळीच कसोटी असते. विजेचा खांब अर्धवट कापून तो त्या मुलीचा हात धरून त्या खांबाजवळ उभा राहतो. जी मुलगी हात सोडून पळून जाणार नाही, तीच आपली साथीदार, असा त्याचा साधा हिशेब. झिलमिल त्याचा हात सोडत नाही. माझ्या आजवरच्या प्रवासात मला कधीही जज न करता असा घट्ट हात धरून राहिलेल्या मित्र-मैत्रिणींमुळेच मी तगून आहे. 
पण स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही आलीच. त्या जबाबदारीचं भान एलजीबीटी समूहाने बाळगणं अतिशय महत्त्वाचं आहे. बेताल वागणं सोडून आपल्या वर्तनामुळे नशिबाने मिळालेला माणसाचा जन्म एखाद्या दुर्धर रोगाने वाया जाणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रश्न केवळ स्वतर्‍पुरते न सोडवता ग्रामीण भागातल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना जिथे या विषयाबद्दल कमालीचं अज्ञान आहे, त्यांना आपल्या परीने मदत करणं, दिलासा आणि बळ देणं गरजेचं आहे. तरच आजचा दिवस सार्थकी लागला, असं म्हणता येईल.


 

Web Title: I am free now... but..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.