परदेशी भाषा कशी शिकाल?

By Admin | Published: December 11, 2014 08:35 PM2014-12-11T20:35:34+5:302014-12-11T20:35:34+5:30

कुठची परदेशी भाषा शिकायची, हे कसं ठरवायचं? मुळात तुम्हाला परदेशी भाषा का शिकायची आहे

How do you learn a foreign language? | परदेशी भाषा कशी शिकाल?

परदेशी भाषा कशी शिकाल?

googlenewsNext
>कुठची परदेशी भाषा शिकायची, हे कसं ठरवायचं? मुळात तुम्हाला परदेशी भाषा का शिकायची आहे, तर त्या भाषा शिक्षणातून आपल्याला त्या भाषेशी, देशाशी संबंधित काही व्यवसाय संधी मिळाव्यात म्हणून; हा  जर तुमचा स्पष्ट हेतू असेल, तर थोडा जगाच्या अर्थकारणाचा, बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेणं गरजेचं आहे. भाषेची निवड ही सजगपणेच करायला हवी. जगात आता नव्यानं विकास कुठं होतो आहे, कुठल्या भागातला विकास थांबला किंवा गोठला आहे याचा विचार करायला हवा. चीन, रशिया, भारत, ब्राझील या देशांत आता विकासाला वेग येतो आहे. जगभरातले लोक तिथे गुंतवणूक करत आहेत किंवा हे देश बाहेरच्या जगात गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूक आणि व्यवसायवाढीचे हे चित्र नेमकं काय असेल याचा जरा आढावा घेऊन मग या देशांपैकी कुठल्या देशाची भाषा आपण शिकली तर आपल्या फायद्याचं ठरेल हे त्यातून ठरवता येईल. 
जगाचं बदलतं अर्थकारण आणि भाषा यांचा संबंध असतो का?
अर्थात असतो. जगाचे सर्वाधिक आर्थिक व्यवहार कुठला देश किंवा खंड यांच्याशी निगडित आहेत, यावर त्या देशाच्या, खंडाच्या भाषेला महत्त्व येणार हे समीकरण असतं. उदाहरणार्थ चीन. जगाची सर्वांत मोठी बाजारपेठ तर चीन आहेच, त्याचसोबत त्यांचे वस्तू उत्पादनही मोठे आहे. चीनला जेव्हा जगभर आपल्या व्यवसायाचे पंख पसरायचे होते तेव्हा त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली. पण यापुढच्या काळात चीनला जगाची नाही, तर जगाला व्यवसाय-उद्योगासाठी चीनची गरज भासेल. जगभरातली माणसं चीनमधे व्यवसाय करण्यासाठी येतील. त्यावेळी चिनी माणसं असं म्हणू शकतात की, तुम्हाला जर आमची गरज आहे तर तुम्ही आमची भाषा शिका. आमच्या भाषेत बोला. अर्थव्यवहारामुळे आणि बाजारपेठांमुळे बदलणारी ही समीकरणं ओळखून विदेशी भाषेची निवड करायला हवी. मॅँडरीन ही चीनची भाषा ज्यांना येते, अशा लोकांना भविष्यात जास्त व्यवसायसंधी असतील हे उघड आहे.
विदेशी भाषा शिकायची हे खरं, पण ती शिकताना नेमकं काय शिकायला हवं, ती भाषा आपल्याला येते, असं केव्हा म्हणायचं?
आपल्याकडे भाषा शिक्षणाविषयी एक ‘चलता है’ अँटिट्यूड असतो. तसंही तोडक्यामोडक्या तीन भाषेत आपल्या देशात अनेकांना बोलता येतं. मातृभाषा, हिंदी आणि इंग्रजी ‘तुटीफुटी’ बोलून वेळ मारून नेण्याची आपल्याला सवय असते. आणि तसं बोलून का होईना आपण वेळ मारून नेली याचं अनेकांना कौतुकही वाटतं. 
मात्र विदेशी भाषा शिकताना हा असा अँटिट्यूड ठेवू नये. जी विदेशी भाषा आपण शिकू त्या भाषेचे उच्चार आणि व्याकरण आपल्याला उत्तम यायलाच हवं. आणि छंद म्हणून नाही, तर व्यवसायासाठी म्हणून जर तुम्ही विदेशी भाषा शिकणार असाल, तर त्या भाषेच्या किमान तीन लेव्हल्स तरी तुम्ही पूर्ण केलेल्या असाव्यात. त्या भाषेत उत्तम संवाद साधता यायला हवा. परकीय भाषेत तीच भाषा बोलणार्‍यांशी संवाद साधताना त्या लोकांनी आपलं गांभीर्यानं घ्यावं असं वाटत असेल, तर ती भाषा पुरेशा गांभीर्यानं लिहिता बोलता वाचता यायला हवी. 
विदेशी भाषा शिकतानाही बोलीभाषा आणि व्यावसायिक संवादाची भाषा असा फरक करून त्यातले बारकावे शिकायला हवेत, पण ते कसे?
नव्या संदर्भात बोलीभाषा-व्यवहारभाषा आणि एसएमएस-इंटरनेटची भाषा असाच भेद समजून घ्यायला हवा. व्यवसाय हेतूनं जर आपण एखादी भाषा शिकणार असू, तर त्या भाषेतलं ‘बिझनेस कम्युनिकेशन’ आवर्जून शिकायला हवं. व्यवसाय संवादकौशल्य हे एक स्किल आहे. व्यावहारिक देवाणघेवाणीची भाषा शिकताना त्या भाषेबरोबरच स्थानिक संस्कृतीची माहिती, तिथले टेलिफोन मॅनर्स, अन्य शिष्टाचार, व्यवहार करताना पाळले जाणारे संकेत हे सारं शिकणं अपेक्षित आहे. प्रत्येक देशाप्रमाणे हे शिष्टाचार-संकेत वेगळे असतात. ते शिकणं भाषा शिकण्याइतकंच महत्त्वाचं असतं.
म्हणजे नुस्ती भाषा आणि व्याकरण नाही, तर ती भाषा जे लोक बोलतात, त्यांची संस्कृतीही समजून-शिकून घ्यायला हवी ना.?
अर्थात. कुठलीही परदेशी भाषा तिच्या संस्कृतीचा हात सोडून शिकण्यात काहीच हाशिल नाही. संस्कृतीचं अस्तर न शिकता नुस्ती भाषा शिकली तर त्या भाषेतून  अपेक्षित संवाद होऊच शकत नाही. एक उदाहरण सांगते, आपल्याकडे जर एखाद्या इंजिनिअरच्या लक्षात आलं की, आपला प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होऊ शकत नाही, तर हळूच बॉसच्या केबिनमधे जाईल, इकडचं तिकडचं बोलेन, मग फिरवून फिरवून सांगेल की आपण डेडलाइन गाठू शकत नाही, मला थोडा वेळ, आणखी मनुष्यबळ द्या. बॉसही म्हणेल, कशाला, आहे त्यात भागव. थोडं मागेपुढे झालं तर बघून घेईल. हेच जर र्जमनीत झालं तर तिथला इंजिनिअर बॉसच्या केबिनचं दार नॉक करून आत जाईल. थेट सांगेल की, काम वेळेत पूर्ण होत नाहीये, मला अजून चार माणसं पाहिजेत, तरच वेळेत काम पूर्ण होईल. मग तो इंजिनिअर डाटा दाखवेल की, आपण या वेगात, अशारीतीनं काम केलं, तरी नाही जमत. त्याच्या बॉसला हे पटलं तर तो तत्काल जास्तीचं मनुष्यबळ देऊन टाकेल. सात-साडेसात मिनिटांत विषय संपला. र्जमन माणसांच्या दृष्टीनं कामाची निर्धारित वेळ पाळणं याहून महत्त्वाचं दुसरं काही नाही. 
आपापली कामं करण्याची, त्याविषयी बोलण्याची या दोन्ही देशातल्या माणसांची ही ढोबळ रीत आहे.
आता समजा, एखादा भारतीय इंजिनिअर आणि र्जमन बॉस असेल तर काय होईल. भारतीय इंजिनिअरला थेट काही सांगण्याची, आपलं म्हणणं अभ्यास-डाटासोबत घेऊन मांडण्याची सवयच नाही. इकडम-तिकडम आडून आडून बोलून मग त्याच्या आडून सूचक बोलण्याची सवय. तसंच तो इंजिनिअर जर र्जमन बॉसशी बोलत राहिला तर एकतर त्याला कळणारच नाही, इतकं बोलणं ऐकून घेण्याचा त्याचा पेशन्सच नसतो. त्यात म्हणण्याला आधार म्हणून हा इंजिनिअर काही तपशीलच देत नाही. त्यामुळे त्या दोघांचं काही ठोस बोलणंच होऊ शकणार नाही.
माणसांची बोलण्याची, विचार करण्याची, निर्णय घेण्याची रीत अर्थात संस्कृती शिकून घेतली नाही तर नुस्ती विदेशी भाषा शिकून उपयोग काही होणार नाही.
त्यामुळे भाषा शिक्षणाला संस्कृतीचं अस्तर हवंच.
या व्यावसायिक फायद्यां पलीकडेही विदेशी किंवा परकीय भाषा शिक्षणाचे काही व्यक्तिगत फायदे होतात का, आपल्या व्यक्तिमत्त्वात त्यामुळे काही बदल होतात का?
कुठलीही भाषा ज्या संस्कृतीसह शिकवली जाते, त्या विचारांचा, संस्कृतीचा आपल्यावर फार परिणाम होतो. आपली शिक्षणपद्धती स्वतंत्रपणे विचार करण्याची काही मुभाच देत नाही. चिकित्सक पद्धतीनं विचार करून आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य देत नाही. याउलट ज्या देशात, ज्या भाषांमधे हे स्वातंत्र्य आहे, ती भाषा जेव्हा आपली मुलं शिकतात तेव्हा त्यांना वस्तुनिष्ठपणे विचार करण्याची, त्यानुरूप आपली मतं मांडण्याची सवय लागते. स्वत:चे विचार मांडायची, आपले विचार आपल्या शब्दांत व्यक्त करण्याची सवय लागते. ती सवय लागली की आपल्या कामाचं प्रेझेंटेशन करताना अनेक मुलं उमलताना, मोकळी होताना दिसतात. श्रोत्यांच्या मेंदूला शिण न आणता, आपलं म्हणणं उत्तम मांडायला शिकतात. अनेकांचा न्यूनगंड कमी होता, स्वत:कडेही परखडपणे पाहण्याची नजर मिळते. ज्या भाषेत, संस्कृतीत ‘नाही’ म्हणण्याकडे उद्धटपणा म्हणून पाहिलं जात नाही त्या भाषेत विचार करता यायला लागल्यावर अनेकजण नम्रपणे ‘नाही’ म्हणायला, नकार द्यायलाही शिकतात. त्यातून अनेकांना सुटका झाल्यासारखं वाटतं. कम्युनिकेशन स्किल मुलं त्यातून शिकत जातात. परदेशी भाषा शिक्षणाबरोबर हे सॉफ्ट स्किल्सही शिकवतात. हे संवादकौशल्यही नव्या काळात फार महत्त्वाचं ठरणार आहे.
विशेष संवाद
- वैशाली करमरकर
मुलाखत आणि शब्दांकन
-ऑक्सिजन टीम

Web Title: How do you learn a foreign language?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.