जर्मनी आणि जिंकण्याचा ‘तरुण’ जल्लोष

By admin | Published: July 18, 2014 12:03 PM2014-07-18T12:03:41+5:302014-07-18T12:03:41+5:30

पराभूत मानसिकता सोसलेल्या जर्मन माणसाला फक्त फुटबॉलमधलाच नाही तर कुठलाही विजय ही फार मोठी गोष्ट वाटते. - असं का? एकजुटीनं काम करण्याचं हे टीम स्पिरीट जर्मन तारुण्यात नक्की भरतं कोण?

Germany and 'Tarun' to win the rally | जर्मनी आणि जिंकण्याचा ‘तरुण’ जल्लोष

जर्मनी आणि जिंकण्याचा ‘तरुण’ जल्लोष

Next
जगातल्या कुठल्याही देशापेक्षा, कुठल्याही देशाच्या संघापेक्षा जर्मनमाणसाचं टीम स्पिरीट वेगळंच आहे. त्यांच्या टीम स्पिरीटचं कौतुक करावं, इतकं ते जगापेक्षा सरस आहे.
त्याचं खरंतर एक कारण आहे तो म्हणजे त्यांचा रक्तरंजी इतिहास.
एकतर युरोप खंड केवढा लहान. त्यात जर्मनी हा एकटा पडत गेलेला देश. युरोपची मूळ भूमी छोटीच. त्यात खूप सार्‍या वंशाच्या लोकांची गर्दी. त्यांच्याकडे खनिज संपत्ती कमी, शेतीसाठी जमीन कमी. आपल्या माणसांचं भरणपोषण व्हावं म्हणून नवीन भूभाग संपादन करणं ही प्रत्येक युरोपियन देशासाठी महत्त्वाची गोष्ट ठरत होती. १७ व्या-१८व्या शतकात डच, पोर्तुगिज, इंग्रज यांनी बाहेर वसाहती केल्या. त्यांना कमी पडत असलेली खनिजं, अन्नधान्य, त्यांनी व्यापार करून मिळवली. जर्मनीने मात्र अशा वसाहती मिळवलेल्या नाहीत. त्यामुळे आहे त्याच देशात त्यांना एकत्र, एकदिलानं, एकजुटीनं काम करणं भाग होतं. 
त्यात भौगोलिकदृट्याही जर्मनी हा  चार दिशांनी कोंडला गेलेला देश आहे.
त्यामुळे त्यांच्या इतिहासानंच त्यांना एकत्र काम करत त्या कामात अँक्युरसी प्राप्त करणं शिकवलं. तंत्रकुशलता शिकवली. अनेकांनी मिळून एक काम करणं शिकवलं. जर्मनीववर ज्या प्रशियन विचारांचा पगडा होता तो विचारही जर्मन लोकांनी एकजूट राहण्याचाच आग्रह धरत होता.
मग हिटलर आला. त्यानं जर्मन माणसासाठी लाजीरवाणा असलेला एक रक्तरंजित इतिहास घडवला आणि जर्मनी युरोपातच नाही तर जगात एकाकी पडली.
जर्मन तरुणांच्या मानेवरचं भूतकाळाचं ओझं एवढं मोठं का आहे?
हिटलर, त्याने केलेला ज्यूंचा अनन्वित छळ, दुसर्‍या महायुद्धानंतरची नामुष्की हा सारा जर्मनीचा लाजीरवाणा इतिहास. दुसर्‍या महायुद्धानंतर जन्मलेली जर्मनीची पिढी, ज्याला पोस्ट वॉर जनरेशन म्हणतात ही मुलं मोठी होऊ लागली. परदेशात शिक्षण, व्यापार, नोकरीसाठी जाऊ लागली. आणि मग त्यांच्या लक्षात यायला लागलं की, जगाच्या मंचावर जर्मन म्हणून आपली छिथू होते. हेच ते क्रूरकर्मे, ज्यांनी ज्यूंना मारलं असं म्हणत आपल्याकडे पाहिलं जातं हे त्या तरुण मुलांच्या लक्षात यायला लागलं. मग त्यांनी चिडून प्रश्न विचारायला सुरुवात केली. 
जेव्हा आपल्या देशात हत्त्याकांडं घडत होती तेव्हा तुम्ही काय करत होतात असे प्रश्न त्यांनी आईवडिलांना, शिक्षक-प्राध्यापकांना विचारायला सुरुवात केली. हे असं सारं घडत असताना तुम्ही गप्प का बसलात हा त्यांचा प्रश्न होता. मग त्याचा उद्रेकच झाला. त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला म्हणजेच कुटुंब, विद्यापीठं, राजकारण सगळ्यालाच नाकारलं. आहे ती व्यवस्था मोडीत काढून त्यांनी नवीन व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हापासून जर्मन माणसाच्या मनात राष्ट्रवाद, त्याची प्रतीकं हे सारं लाजीरवाणं ठरू लागलं. जर्मन माणसाला राष्ट्रवाद हा शब्दच अपमानास्पद वाटू लागला.
१९५२ चा फुटबॉल वर्ल्डकप, रेडिओवरची कॉमेण्ट्री आणि चिडीचूप जर्मनी
महायुद्धानंतर १९५२ साली र्जमनीनं पहिल्यांदा आपला संघ फुटबॉल वर्ल्डकपसाठी पाठवला होता. तेव्हाची गोष्ट माझा एक जर्मन मित्र सांगतो. आज तो सत्तरीत आहे. तेव्हा जेमतेम ५-६ वर्षांचा असेल. युद्धानंतर देश पूर्ण नामोहरम झाला होता. माणसंही हरलेल्याच मनस्थितीत होती. त्याकाळी टीव्ही नव्हतेच. रेडिओवर कॉमेण्ट्री सुरू होती. जर्मन संघ फायनल मॅच खेळत होता. सगळा देश एकदम चिडीचूप झाला. गावोगावी लोकांनी दारं-खिडक्या बंद करून घेतले. स्वत:ला घरात कोंडत जो तो रेडिओवर कॉमेण्ट्री ऐकत होता. आणि मग र्जमनी जिंकल्यावर सगळी माणसं रस्त्यावर उतरली. दुसर्‍या महायुद्धानंतर पहिल्यांदा माणसांनी असा खुलेआम आनंद साजरा केला. इतकी वर्षं जगासमोर शरमेनं मान खाली घालून काळाठिक्कर पडलेला जर्मन देश पहिल्यांदा जल्लोष करत होता. आपण आहोत, इतकेही काही पराभूत नाही झालो की परत जिंकूच शकत नाही, असं वाटून जर्मन माणसांनी तो जल्लोष तेव्हा झपाटल्यासारखा जगला.
पण तरीही जर्मन माणसाच्या मनातला राष्ट्रवादाविषयीचा संताप मात्र कमी झाला नाही.
जर्मन न्यूनगंड वितळवून टाकणारी २00६ ची सेमी फायनल
जर्मन संघासाठी फुटबॉल ही कायमच युद्धसदृश परिस्थिती राहिली आहे. त्यांना जिंकायचं असतंच. पण तरीही जर्मन  माणसं आपला राष्ट्रवाद किंवा अती भावुकपणा त्या जिंकण्याच्या आड येऊ देत नाहीत. त्यांना लाजीरवाणाच वाटतो तो भूतकाळ. आपण राष्ट्रवादी नाही, देशभक्त नाही हे सांगण्याचाच त्यांचा अट्टहास असतो. चुकूनही कधी जर्मन घरांवर, दुकानांवर जर्मन राष्ट्रवादाची प्रतीकं दिसत नसत. पण २00६ मध्ये जर्मन संघ सेमीफायनलला पोहचला तेव्हा मात्र जर्मनीच्या अनेक शहरांत पहिल्यांदा खिडक्यांवर, दुकानांवर, घरांच्या दारांवर जर्मन झेंडे दिसले.
जर्मन तरुणांनी पहिल्यांदाच हे स्वीकारल्यासारखं वाटलं की, जे भूतकाळात घडलं तो माझ्या देशाचा भूतकाळ आहे. त्याच्याविषयी आज अपमानास्पद भावना घेऊन जगण्याचं कारण नाही ही तडजोड त्यांनी स्वीकारली. आणि युरोपात जगात पुन्हा जर्मन झेंडे अभिमानानं फडकावत आपल्या मनात असलेल्या न्यूनगंडाला बाजूला ठेवलं.
आणि २0१४. जर्मनी चॅम्पियन !
आज तर जर्मनीनं आपल्या टीम स्पिरीटनं जगात एक वेगळंच यश मिळवून दाखवलं आहे. जो फुटबॉल त्यांना युद्ध वाटतो, खेळायचं ते जिंकण्यासाठीच असं मानून जो खेळ ते खेळतात. पराभूत मानसिकता सोसलेल्या जर्मन माणसाला फक्त फुटबॉलमधलाच नाही तर कुठलाही विजय ही फार मोठी गोष्ट वाटते. म्हणून चॅम्पियन बनल्यावर जर्मन असण्याची नवी ओळख सांगणारी एक नवीन तरुण पिढी आज जर्मनीत आनंद साजरा करते आहे.
जर्मन एकीचं चिरतरुण रहस्य?
जर्मनीचा आजवरचा हा प्रवास समजून घेतला तर लक्षात येतं की, काही अत्यंत दुर्मिळ गुण जर्मन माणसाकडे आहेत. एकतर फुटबॉल हा जर्मनीचा राष्ट्रीय खेळ आहे. त्यात जर्मन माणसाच्या आजवरच्या पिढय़ांनी इतकी अस्थिरता पाहिली, अनुभवली आहे की, अस्थिरता हा शब्द, त्याची शक्यताही त्यांना सहन होत नाही. काम कुठलंही असो, ते प्रचंड नियोजन करतात. 
प्लानिंग.प्लानिंग.प्लानिंग. जर्मन माणसासारखं अत्यंत अॅक्युरेट प्लानिंग कुणीच करू शकत नाही. ते सर्व शक्यता तपासतात, काय अडथळे येतील याचा खूप विचार करतात.  प्रत्येक गोष्ट ते एकदिलानं आणि तंत्रशुद्धच करतात. ती तशीच असावी हा त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. प्रत्येक प्रकल्पात त्यांचा हा आग्रह दिसतोच.
त्यात त्यांनी इतकं सोसलंय की, जर्मन माणूस आपल्या भावना अत्यंत उत्तम सांभाळू शकतो. प्रसंगी बाजूला ठेवू शकतो. इमोशन्स बॅलन्स आणि कण्ट्रोल ही जर्मन माणसाची वैशिष्ट्यच. प्रश्न कुठलाही असो, तो सोडवताना ते भावुक होत नाहीत. भावना बाजूला ठेवून अत्यंत स्थिर बुद्धीनं, विवेकवादानंच ते विचार करतात. तसा निर्णय करतात आणि अंमलबजावणीही करतात. तो त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईण्ट आहे.
फुटबॉलमध्ये जर्मन टीम चॅम्पियन झाली, तरुण मुलं त्या टीममध्ये खेळताना अत्यंत संयत आणि अचूक खेळली त्याचं कारण हेच. प्रचंड मेहनत, अत्यंत उत्तम प्लानिंग, तंत्रशुद्धता आणि भावना बाजूला ठेवण्याचं स्वत:वरचं नियंत्रण.
आपण जिंकू शकतो, हे जगाला दाखवण्याची संधी जर्मन माणूस कधीच हातची घालवत नाही.
 
- वैशाली करमरकर जर्मन भाषा-संस्कृती आणि समाजाचा सूक्ष्म अभ्यास असलेल्या आंतर-सांस्कृतिक अभ्यासक
(शब्दांकन - ऑक्सिजन टीम)

 

Web Title: Germany and 'Tarun' to win the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.