ये कहलो की, बस फोनभर की दास्ता है, और क्या है जिंदगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:14 PM2017-08-05T15:14:42+5:302017-08-05T15:15:57+5:30

मनापासून हाका मारणारे दोस्तांचे काही कट्टे असतात. पण आयुष्यभर कसे पुरावेत हे कट्टे? त्या कट्टयांवरचे जुने चेहरे जातात, नवे येतात. आपले कट्टे आपल्यालाच जुने, परके वाटायला लागतात. पण ‘शेअरिंग’ची गरज तर काही बदलत नाही.

A friends is just a phone away | ये कहलो की, बस फोनभर की दास्ता है, और क्या है जिंदगी?

ये कहलो की, बस फोनभर की दास्ता है, और क्या है जिंदगी?

Next
ठळक मुद्देभले माझे सगळे मित्र उंचच उंच पुलावरून त्या अथांग डोहात उडी मारणार असतील, पण मी मारणार नाही. मी त्या डोहाच्या तळाशी जाऊन उभा राहीन, त्यांना झेलण्यासाठी!

- चिन्मय लेले

‘जाने तू..’ नावाचा सिनेमा पाहिलात? त्यात एक प्रसंग आहे. सिनेमाची नायिका डोळ्यात पाणी आणून नायकाच्या आईला सहज सांगते, ‘कॉलेज के पाच साल कहाँ चले गऐ, पता ही नही चला..!’ नायकाची आई शांतपणे म्हणते, ‘फोन पें बेटा फोन पें!’ - काय खोटंय त्यात? तरूण म्हणवणार्‍या कुणालाही भेटा. तासन्तास फोन सुरु. आता तर दिवसभर व्हॉट्सअ‍ॅपवर टुकटुक सुरुच. काय बोलतात एवढे? - माहित नाही! का बोलतात? - या प्रश्नाला तर काहीच लॉजिकल उत्तर नाही! फोन बंद पडेर्पयत बोलुनही जे बोलायचं तेच राहून गेलं अशी भावना फोन बंद होताच छळायला लागते. 

मस्त गप्पा रंगल्या आहेत. छान हलकं-हलकं मस्त वाटतंय, असं कितीदा होतं? - तसं नेहमीच! पण चुकार क्षणी कशी कोण जाणे बोलता बोलता चिडचिडच व्हायला लागते.

आणि भांडण? - ते तर हमखास होतं! होतंच! शब्दाने शब्द वाढतो, कारण म्हणायचं वेगळचं असतं, शब्द वेगळचं म्हणतात!

हे सारं सरावानं असंच होतं होत राहतं.

दिन-महिने-रात गुजरते जाते है. फोनची बिलं वाढत राहतात.

कानाला नव्यानं फुटलेल्या फोन नावाच्या अवयवाशिवाय जगता येतं याचाच विसर पडतो. हॅण्ड्स-फ्रीच्या माळा गळ्यात घातल्या की अवतीभोवतीच्या जगाचं अस्तित्वच नाहीसं होतं आणि आपण ज्याच्याशी बोलतोय त्या आवाजापलीकडे काहीच ऐकु येत नाही. समजत नाही.

दुरुन कुठून तरी येणारा तो आवाज त्यातून होणारा संवाद.

म्हटलं तर बिनचेहर्‍याचाच.

पण हा संवाद कसा कोण जाणे मनाची कवाडं उघडत थेट मैत्रीच्या केंद्रात जाऊन पोहोचतो. बोलता बोलता मैत्री होते. बोलणं ही गरज बनत जाते. हळूहळू गरजेचं रूपांतर ‘सवयीत’ होतं आणि सवयीतून पुन्हा मैत्रीची डोर आणखी मजबूत होते.

‘व्हच्यरुअल मैत्री’ असा एक गोंडस शब्द सध्या प्रचलित आहे. मैत्रीच पण अत्याधुनिक उपकरणांनी बांधलेली. मोबाइल-लॅण्डलाइन, नाहीतर व्हॉट्सअ‍ॅपवरचं चॅटिंग. या उपकरणांच्या साक्षीनेच फुलणारी-बहरणारी-भांडणारी-रुसणारी आणि हसणारीही!

मुद्दा असा आहे की, ही मैत्री व्हच्यरुअल आहे की फॅक्च्युअल असा शब्दाचा कीस कशाला पाडायचा?

मैत्रीचे फायदे-तोटे तराजूत मोजत वाटय़ाला काय आलं याचा हिशेब कशाला घेऊन बसायचं समोर?

सोपंय ना, दोन व्यक्ती भेटतात. एकदा-दोनदा भेटतात. त्यांच्या वाटा भिन्न असतात, प्रवास भिन्न असतात आणि दिशाही. पण त्या भेटीत डोक्यात काय केमिकल लोचा होतो माहित नाही.

काही केल्या परस्परांशी बोलायचे विषय संपत नाही. (मुख्य म्हणजे विश्वासानं बोलावंसं वाटतं, ही सगळ्यात महत्त्वाची पायरी!) ओळख होते, ती वाढते, परस्पर आवडींइतक्याच नावडत्या विषयांच्या चर्चाही सुरु होतात. होत राहतात. पण थेट भेटायला वेळ असतो कुणाला?

मग फोन आणि इंटरनेट येतात बिचारे मदतीला धावून!

सुरुवातीला पाच मिनिटांत संपणारे फोन तासतासभर सुरुचअसतात. हे समजेर्पयत परस्पर ‘शेअरिंग’ इतकं वाढत गेलेलं असतं की ‘आता पुरे’ असं हज्जारदा ठरवूनही फोन काही बंद होत नाही! जे फोनचं तेच व्हॉट्सअ‍ॅपवरचं!

 सतत ऑनलाईन असणारे अनेकजण तर समोरासमोर असावेत तसे एकमेकांशी बोलत असतात. चेष्टा-टाइमपासपासून अत्यंत गंभीर विषयावरही चर्चा ऑनलाईन चालतात. कीबोर्डवरची बोटं सरावानं धडाधड चालतात, त्या बोलण्याची भाषा बदलते, भावना व्यक्त करण्यासाठीची एक स्वतंत्र चॅट लिपीही तयार होते.

बोलण्यासारखं असतं म्हणून बोलत राहण्याची माध्यमं शोधली जातात. परस्परांबरोबर राहण्याचा आनंद हा असा कमावलाच जातो.

ही अशी मैत्री ज्या दोघांत किंवा एकाच वेळी अनेकांत असते त्यांच्यात कुठलाच भेट अडसर ठरत नाही. अशी मैत्री असणार्‍या दोन व्यक्ती म्हणजे ‘स्त्री-पुरूष’ असा झापडबंद विचारही या टप्प्यावर गळून पडतो. अशी मैत्री ‘तो-ती’ यांच्यात जशी असते तशी ‘ती-ती’ किंवा ‘तो-तो’ मध्येही असू शकते. असतेच! दिवसाकाठी कधीतरी होणारा तो एक फोन दिवसभराच्या कटकटींचा, वैतागाचा सारा भार उचलून फेकून देतो. ताजंतवानं वाटतं, उमेद वाढते आणि मुख्य म्हणजे आपली परस्पर भेटीची आणि शेअरिंगची गरज तो फोन भागवतो. अनेकदा तर केवळ बोलूनच आपल्याला छान वाटतं!

माध्यम बदललं इतकंच, दोस्ती तशीच आहे.

 एक फोन फिरवला तर पलीकडे आपली हक्काची जागा आहे, माणुस आहे हे वाटणं किती श्रीमंत करणारं आहे!

ये कहलो की,

बस फोनभर की दास्ता है..

और क्या है जिंदगी

जो सुलझती-उलझती रहती है।

Web Title: A friends is just a phone away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.