मुंबईतली मजबूर गर्ल्स हॉस्टेल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:53 PM2017-08-10T13:53:33+5:302017-08-10T13:56:30+5:30

मुंबईच्या लेडीज हॉस्टेल्समधून आणि खासगी पेइंग गेस्ट म्हणवणाऱ्या हॉस्टेल्समधून एक चक्कर टाकली तर दिसतं मजबुरीचं एक भयाण चित्र.

Forced Girls Hostel in Mumbai | मुंबईतली मजबूर गर्ल्स हॉस्टेल्स

मुंबईतली मजबूर गर्ल्स हॉस्टेल्स

Next
ठळक मुद्देमुंबईच्या लेडीज हॉस्टेल्समधून आणि खासगी पेइंग गेस्ट म्हणवणाऱ्या हॉस्टेल्समधून एक चक्कर टाकली तर दिसतं मजबुरीचं एक भयाण चित्र. आताशा मुलीही येतात देशभरातून मुंबईत. डोळ्यात स्वप्न असतात. महत्त्वाकांक्षा असतात. आणि शिक्षण पूर्ण करायचं, करिअर करायचं, नोकरी हवी म्हणून मुंबईत येतात आणि मग सुरू होते एक नवीन जंग.. या शहरात जगण्याची, टिकून राहण्याची जंग.

- मनीषा म्हात्रे

मुंबईत खाणंपिणं स्वस्त, पण राहण्याची सोय? ती अवघड. आणि आता तर जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतीत, टेरेसवर पत्रे टाकून, पार्टीशनला पार्टीशन जोडून गल्लीबोळात पेइंग गेस्टच्या नावाखाली लेडीज हॉस्टेल सुरू झालेत. ८ बाय १० च्या कोंडवाड्यात इथं १५-१७ मुली राहतात. त्या जागेत स्वत:ला कोंबावंच लागतं, कारण घरभाडं परवडत नाही. आणि त्याचाच फायदा घेत घरमालकांसह अन्य व्यवस्थाही भयावह अवस्थेत राहणाऱ्या  मुलींच्या निवारा प्रश्नाकडे सर्रास दुर्लक्ष करतात..

‘ऐ दिल है मुश्किल जिना यहां, जरा हटके जरा बचके ये हे बॉम्बे मेरी जान..’
- हे गाणं नेमकं काय सांगतं हे त्यालाच कळत असावं, जो मुंबईत डोक्यावर छत शोधत फिरतो. मिळेल तसा मिळेल तिथं राहतो आणि आपली स्वप्नं मुठीतून निसटून जाऊ नयेत म्हणून राबतो नुस्ता. ही कुणा सुपरस्टारची कहाणीच कशाला असायला पाहिजे. आताशा मुलीही येतात देशभरातून मुंबईत. डोळ्यात स्वप्न असतात. महत्त्वाकांक्षा असतात. आणि शिक्षण पूर्ण करायचं, करिअर करायचं, नोकरी हवी म्हणून मुंबईत येतात आणि मग सुरू होते एक नवीन जंग.. या शहरात जगण्याची, टिकून राहण्याची जंग.
   या मुली राहतात कशा, त्यांना सुविधा काय, पेइंग गेस्ट म्हणून कशा राहतात हे सारं शोधत अलीकडेच मुंबईत फिरले तेव्हा जे चित्र दिसलं ते अस्वस्थ करणारं होतं. पहिली गोष्ट दिसते म्हणजे लग्न न झालेल्या, एकेकट्या राहणाऱ्या मुलींना अनेक सोसायट्यात ‘नो एण्ट्री’च असते. एकेकट्या मुलींना जागा नाहीच देत सोसायटीवाले. अनेक सोसायट्यांत तसा नियमच दिसतो.
   मग राहायचं कुठं, नोकरी करणाऱ्या मुलींसाठी एकूणच वसतिगृहांची बोंब. त्यात तिथं जागा मिळावी म्हणून पाठपुरावा करा. तिथले नियम कडक. खासगी नोकरी करणाºयांच्या वेळा विचित्र. म्हणून मग अनेकजणी खासगी ठिकाणांचा आसरा शोधतात. याचाच फायदा घेत आता मुंबईत दगडी चाळी, जुन्या इमारती यांना गर्ल्स हॉस्टेलचं स्वरूप येताना दिसत आहे. यातील रहिवासी, दलाल, गुंड, भूमाफिया, राजकारणी, पोलीस यांनी चक्क पेइंग गेस्टच्या नावाखाली घरातच गर्ल्स हॉस्टेल सुरू केली आहेत. आणि अत्यंत कमी जागेत, कशाबशा स्वत:ला कोंबत या मुली अशाच जागांमध्ये राहतात हे अलीकडे लोकमतने केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आलं आहे.
   मुंबईत एकूण ४३ गर्ल्स हॉस्टेल्स आहेत. त्यात विद्यापीठे आणि सरकारी वसतिगृहांचा समावेश आहे. मुंबईतील वसतिगृहांत काय चित्र दिसतं हे शोधायचं म्हणून सुरुवातीलाच तिथं जागा मिळवून देणाऱ्या दलालांना गाठलं. तेव्हा इमारतीच्या बंद खोलीतील हे अनोखे अवैध गर्ल्स हॉस्टेल उघडकीस आले. इमारतीचा चहावाला, पानटपरीवाला या हॉस्टेलचे पीआर होते. भाड्याने खोली मिळेल का याची चौकशी करताच त्यांच्याकडून अनेक गर्ल्स हॉस्टेल्सची माहिती मिळते. येथे येणाऱ्या तरुणीही अशाच पद्धतीने या घरमालकांपर्यंत पोहचतात. अवघ्या ७ हजार रुपयांपासून १३ ते २५ हजार रुपयांपर्यंत या हॉस्टेलमधील रूम भाड्याने देण्यात येत आहेत. जसा परिसर तसे खोल्यांचे रेटकार्डही वाढत जातात. आणि मग अनेक मुली पेइंग गेस्ट म्हणून या खोल्यांमध्ये राहतात. तिथंच जायचं ठरवलं.
   पोहचले एका जीर्ण जुनाट इमारतीत. मुळात बाहेरून एखाद्या घराप्रमाणे वाटणारं ते एक हॉस्टेलच होतं. मुंबईत पालिका मुख्यालयापासून काही अंतरावरच असलेल्या जमुना इमारतीत प्रवेश केला. चौथ्या मजल्यावरील या हॉस्टेलची माहिती मिळाली. बरीच चौकशी झाल्यावर आत प्रवेश मिळाला. आणि मग बोलणं सुरू झालं. कुणी माहिती दिली वगैरे प्रश्न झाले. मग कळलं एका खोलीचं भाडं १३ हजार रुपये. तिथं एका खोलीत १७ मुली राहतात. लोकेशन भारी आहे म्हणून जास्त पैसे असंही कळलं. पण एवढं होऊन तिथं जागा नव्हतीच, तीन महिने वाट पाहा असं कळलं!
   धक्कादायक बाब म्हणजे, टेरेसवर हे हॉस्टेल उभारलेलं होतं. पीओपीचे सीलिंग, त्याला प्लॅस्टिक दरवाजांचे कम्पार्टमेण्ट. अशात एक बेड मावेल एवढीच जागा. त्यातही अशा जवळपास १८ ते २० खोल्या काढण्यात आलेल्या. एखादी दुर्घटना घडल्यास बाहेर पडणं मुश्किल. तरीदेखील या मुली पर्यायी व्यवस्थाच नसल्यानं तिथं राहताना दिसल्या. इमारतीचे जागामालक सोहेल वझिफदार यांच्या म्हणण्यानुसार, इथं भाडेतत्त्वावर मुली राहतात. आणि ते टेरेसवर असले तरी त्यासंबंधीची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर संबंधित वॉर्ड अधिकाºयानं सांगितलं की, ते गर्ल्स हॉस्टेल नसून पेइंग गेस्ट सोय आहे. फक्त ते अधिकृत कितपत हे इमारत विभागच सांगू शकेन, असे सांगून जणू हात झटकले.
   याच इमारतीलगत काही अंतरावर एका निवृत्त पोलीस अधिकाºयाच्या घरातही अशाच पद्धतीने गर्ल्स हॉस्टेल सुरू असताना दिसलं. अशाच पद्धतीने मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी सीएसटी, काळबादेवी, गिरगाव, दादर, घाटकोपर, मुलुंड परिसरातील अनेक धोकादायक गर्ल्स हॉस्टेलमधून घरमालक लाखोंची कमाई करतात. कुठं पेइंग गेस्टच्या नावाखाली सुरू असलेले गर्ल्स हॉस्टेल, तर कुठे शेअरिंगमध्ये चाळीतल्या खोल्यांपासून उच्च्चभ्रू इमारतीत राहणाºया या मुली. दोन वेळच्या जेवणापेक्षा निवाराच याच शहरात जास्त महाग असल्यानं त्या मिळेल तसं राहतात, दिवस काढतात.
   या मुलींशी बोललं तर काय दिसतं.
   हरियाणाची नेहा. मुंबईच्या नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतेय. आईवडिलांचा विरोध न जुमानता शिक्षणासाठी मुंबईत आली. कॉलेजात प्रवेश मिळाला. सुरुवातीचे काही दिवस लॉज, हॉटेलमध्ये काढले. मात्र तेथील खर्चाबरोबर हौसमौज, कॉलेजच्या वातावरणात स्वत:ची लाइफस्टाइल कमी पैशात सांभाळणं अवघड होतं. कॉलेजमध्ये तिच्या काही मैत्रिणी झाल्या. या मैत्रिणीच्या घरी ती काही दिवस राहिली. पण त्यांच्याकडे किती दिवस राहणार. कॉलेजबाहेरील सॅँडविचवाल्यासमोर तिने मैत्रिणीकड़े राहण्याची कुठे सोय होईल का, याची विचारपूस सुरू केली. मग त्यानंच सांगितलं की, यहाँ पे एक पॉश गर्ल्स हॉस्टल है आप वहां देखिये. आणि तिला या गर्ल्स हॉस्टेलची माहिती मिळाली.
   कॉलेजपासून काही अंतरावरच असलेल्या जुन्या इमारतीतील गर्ल्स हॉस्टलमध्ये ती पोहचली. तिने येथील कर्मचाºयांशी संपर्क साधून राहण्याबाबत विचारणा केली. मात्र तेथील भाडंही तितकंच महाग. एका जीर्ण इमारतीच्या कोपºयात ८ बाय ८ ची ती खोली. आणि या एका खोलीत स्वतंत्र राहण्यासाठी महिना १५ हजार रुपये भाडे. फक्त हॉस्टेलच्या आतील प्रशस्त अ‍ॅरेंजमेंटला भुलून तिला येथे राहावेसे वाटले. मात्र एखादी दुर्घटना घडल्यास त्याबाबत काहीच सुखसोयी इथे नाहीत. ये मुंबई है, यहाँ अडजस्टमेंट जरुरी है, असं नेहा सांगते. दिवसा कॉलेज आणि रात्री टेलिकॉलिंगमध्ये ती काम करतेय. येणाºया पगारातून कॉलेज आणि स्वत:चा, राहण्याचा खर्च भागवतेय.
   संगमेश्वरची प्राप्ती. मुंबईत आईसोबत मामाकडे राहायची. मात्र काही वेळाने मामाचीही कुरकुर सुरू झाली. सिंगल मदर असल्याने मुलीचा सांभाळ, तिचे शिक्षण पूर्ण करणे आईला कठीण झाले. अन्य नातेवाईकही नाही. आईने तिला वयाच्या १२ व्या वर्षी शासनाच्या वसतिगृहात दाखल केले. तेव्हापासून वसतिगृहाच्या नियमांच्या चौकटीत राहून ती जगत होती. संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांत ती भाग घेई. वयाची १८ वर्षे पूर्ण झाली. ती सज्ञान झाली. संस्था सोडावी लागली. सोबत एक तिथलीच मैत्रीण होती. पोलीस व्हायचं म्हणून तिचं शिक्षण सुरूच आहे. म्हणून मग प्राप्तीने राहण्यासाठी वरळी येथील शासनाच्या वसतिगृहासाठी पाठपुरावा सुरू केला. त्याच्या पाठपुराव्यानंतर कागदोपत्री ओढाताण. ती सांगते, ‘आपण कसे अनाथ, निराधार आहोत, याची खरं तर मी कागदपत्र गोळा करत होते. माझ्याकडे जात प्रमाणपत्र आहे. किती चकरा मारल्या मंत्रालयात. त्यात सोबतची मैत्रीण खुल्या प्रवर्गातील. तिनं आपल्याला शासकीय निवारा मिळेल याचे होप्स सोडले होते. मी कसेबसे कागदपत्रं जुळवले. आणि एकदाचा मला फक्त सहा महिन्यांसाठी वरळीच्या वसतिगृहात प्रवेश मिळाला. राहण्याची मोफत सोय. शिवाय महिना ९०० रुपये मिळत होते. त्याच दरम्यान मी अभ्यास वाढवला. मॉल, विविध फूड्सच्या दुकानात नोकरी केली. पुढे संस्थेशी संलग्न होत त्यांच्यासाठी काम सुरू केलं. सामजिक सेवेच्या अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेतलं. डोक्यावर छत, हातात पैसा नसेल तर तुमचं जगणं कठीणच. अशात सध्या एका संस्थेत नोकरी मिळाली. तेथीलच कामावरील मुलीने तिच्या घरी आधार दिला. ती मुंबईत एकटीच राहते. तिच्याच घरी महिना ५ हजार रुपये देऊन माझ्यासह आणखीन दोघी पेइंग गेस्ट म्हणून राहतो.
   कुडाळची अनिता. तिला एम.ए. करायचं होतं. पण लॉ ला अ‍ॅडमिशन घेतली. त्यासाठी कुडाळ ते कणकवली प्रवास सुरू केला. मात्र पुढे तो प्रवास त्यात मनाविरुद्ध पर्यायी म्हणून निवडलेल्या विधी अभ्यासक्रमात रस लागेना. मग तीही मुंबईत आली. मुंबईत फक्त एका मैत्रिणीच्या ओळखीवर तिच्यासह अन्य दोघींनी धाडस केलं. भांडुपच्या १० बाय १० च्या खोलीत एका मैत्रिणीच्या ओळखीने भाड्याने खोली मिळाली. त्यामध्ये आधीपासूनच दोघी राहायच्या. त्यात अनिताने तिथेच आपलीही जागा बनवली. आसरा मिळाला पण नोकरीचे काय? रोज सकाळी उठून नोकरी शोधकाम सुरू. मग भांडुपमध्येच साडेपाच हजार रुपये पगारावर डीटीपी ऑपरेटरची नोकरी मिळाली.


   शेअरिंगमध्ये अडीच हजार रुपये भाडे, उरलेले पैसे अन्य खर्चात. काटकसरीच्या प्रवासात एमएचं स्वप्न मागेच पडलं. कसेबसे दोन वर्षं सरले. तिला दादरमध्ये एका कंपनीत नोकरी लागली. त्याचदरम्यान आई गेली. ज्यासाठी गाव सोडलं ते स्वप्न तर पूर्ण झालंच नाही. पण नोकरी होतीच. मग तिनं घनसोलीत पेइंग गेस्ट म्हणून राहायला सुरुवात केली. साडेचार ते पाच हजार रुपयात तीन मैत्रिणींसोबत ती राहते आहे. सध्या हेही एक दुसरं कुटुंब बनत असल्याचं अनिता सांगते.
   अहमदनगरची रिटा. मॉडेल होण्यासाठी मुंबईत आली. कुटुंबाचा विरोध होताच. पण तिने मुंबई गाठली. सोबत काही पैसे आणि कपडे. मुंबईत कोणी नातेवाईकही नाही. बीकॉम झालेल्या रिटापुढे राहायचं कसं आणि कुठे असा प्रश्न उभा ठाकला. याच शोधात रात्री सीएसटी स्थानकाबाहेर बसलेल्या महिलेने तिला हेरले. तिच्याकडे विचारपूस केली तेव्हा रिटाने तिला मुंबईत राहण्यासाठी जागा शोधत असल्याचे सांगितले. तेव्हा त्या महिलेने आपल्या ओळखीतून राहण्याची व्यवस्था करून देते असे सांगितले. रात्रीच्या अंधारात झालेल्या १५ मिनिटाच्या ओळखीत विश्वास ठेवलेल्या त्याच महिलेने तिचा खरं तर परस्पर सौदा केला होता. रिटाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र शक्य झाले नाही. हळूहळू तिनंही त्या जगाला आपलंसं केलं. सुरुवातीचे काही दिवस तिने कामाठीपुºयात काढले. स्वत:ची ओळख लपवून ती सध्या पश्चिम उपनगरातील एका उच्चभ्रू इमारतीत दोन मैत्रिणींसोबत राहते. राहत असलेल्या खोलीचेच भाडे ती महिना ५० हजार रुपये देते. ती म्हणते, तिच्यासारख्या अनेक मुली अशा राहतात. ती आता घरी आईला पैसे पाठवते. आईला वाटतं मुंबईत मुलगी कामाला आहे. तिला काय सांगणार?
   पुण्याची रिना. गेल्या दोन वर्षांपासून ती इमारतीच्या आत दडलेल्या या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते. तिच्यासारख्या आणखी १२ ते १३ मुली तिथं राहताना दिसल्या. वाणिज्य शाखेच्या दुसºया वर्षात शिकते. आईबाबा दोघेही नोकरी करतात. मोठा भाऊ परदेशात शिक्षण घेतोय. ती सांगते, मला बिनधास्त आणि एकटं राहायचं होतं म्हणून मुंबईत आले. बाबांनी दादरमध्ये एका सोसायटीत राहण्याची व्यवस्था करून दिली. मात्र तेथे माझ्या लेट नाइट्स पार्ट्यांना विरोध होता. त्यानंतर मैत्रिणीकडून इथल्या जीर्ण इमारतीतील गर्ल्स हॉस्टेलची माहिती मिळाली. इथे मस्तय. बाहेरून कशीही वाटली तरी आत रूममध्ये गेल्यानंतर आपलंच राज्य. हे स्वातंत्र्य या लहान जागेतही आहे याचा आनंद वाटतो.
   अशा किती कहाण्या, किती प्रकारची मजबुरी.. पण तरी वास्तव एकच, मुंबईत जागांना सोन्याचं मोल आहे म्हणून घरमालक व्यवस्थेशी संधान बांधून कोंडवाडे तयार करतात. जिवावर बेतेल अशी असतात ही घरं, पण तरी तिथं या मुली राहतात. कारण, मुंबईत हक्काचं छप्पर डोक्यावर असणं हे काही सोपं नाही. आणि मग मजबुरीचा फायदा घेत एक विचित्र अर्थकारण फिरतच राहतं. कोण कुणाला जाब विचारणार असं हे भयाण चित्र..
म्हटलं ना, ए दिल है मुश्किल ये जिना यहॉँ..

(मनीषा लोकमच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहेत)

Web Title: Forced Girls Hostel in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.