तुम्हाला डोकं आहे? - मग ते वाचवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 04:40 PM2018-11-22T16:40:15+5:302018-11-22T16:40:40+5:30

हेल्मेटला नकार देणं खरंच आपल्या फायद्याचं आहे का?

Do you have a head? - Then save it! use helmet! | तुम्हाला डोकं आहे? - मग ते वाचवा!

तुम्हाला डोकं आहे? - मग ते वाचवा!

Next
ठळक मुद्देतुम्ही पोलिसांना गुंगारा देऊ शकता पण अपघाताला आणि त्या अपघातातून होणार्‍या मेंदूच्या दुखापतीला फसवून निसटता नाही येत!

-डॉ. महेश करंदीकर

कशाला हेल्मेट? वैताग नुस्ता असं अनेक तरुण मुलांना वाटतंच वाटतं. काहीजण तर रस्त्यावर हवालदार पकडेल आणि पावती फाडेल, उगीच डोक्याला ताप नको म्हणून हेल्मेट विकत घेतात. गाडीच्या कॅरिअरला मागे लावूनही ठेवतात. दिसलाच पोलीस तर तेवढय़ापुरतं ठेवतात डोक्यावर आणि सटकतात.
तुम्ही पोलिसांना गुंगारा देऊ शकता पण अपघाताला आणि त्या अपघातातून होणार्‍या मेंदूच्या दुखापतीला असं फसवून निसटता नाही येत. आमचा अनेक वर्षाचा अभ्यास असं सांगतो की,  ज्यानं हेल्मेट घातलेलं असतं त्याला अपघातात तुलनेनं कमी दुखापत होते. डोकं वाचतं, मेंदूला गंभीर इजा होत नाही आणि हेल्मेट घातलेलं नसतं त्याला मात्र दुर्दैवानं ब्रेन हॅमरेज होतं, कुणी जागीच दगावतं, काहींना पॅरालिसिस होतो, मेंदूला मोठी इजा होते, डोळा जातो, एक ना अनेक गोष्टी.
एका हेल्मेटमुळे आपण हे टाळू शकतो. सर सलामत तो सबकुछ हो सकता है। पण डोक्यातले गैरसमज आणि कशाला झंझट ही मनोवृत्ती अनेकांना हेल्मेट वापरू देत नाही.  
हेल्मेटविषयी असलेले गैरसमज वेळीच दूर केले, तर आपण स्वतर्‍चा आणि इतरांचाही जीव वाचवू शकू. मुख्य म्हणजे आपलं डोकं वाचवू शकू .
आणि ते वाचवायचे तर आपल्या डोक्यात हेल्मेटविषयी असलेले काही गैरसमज आधी घासूनपुसून टाकावे लागतील..
1) मी तर काय ‘स्लो’ आणि ‘सेफ’च चालवितो, घर ते कॉलेज, मला कशाला हवंय हेल्मेट?
आपण काही रॅश ड्रायव्हर नाही, आपण काही बायकर नाही, हायवेलासुद्धा जात नाही. सेफ आणि स्लोच चालवितो असा अनेक जणांचा दावा असतो; पण तुम्ही वाहनावर बसता आणि त्याला वेग देता याचा अर्थ तुम्ही स्वतर्‍ची काळजी घ्यायलाच हवी. ताशी 17 किलोमीटर वेगानं जरी तुम्ही गाडी चालवली तरी अपघाताची आणि मेंदूला इजा होण्याची शक्यता असते. ताशी 17 किलोमीटर याचा अर्थ बाइक आणि नॉन गिअर दुचाक्याच काय सायकल चालवणार्‍यानंसुद्धा हेल्मेट वापरलं पाहिजे आणि ते तुम्ही नाकारता याचा अर्थ तुम्ही धोका पत्करता!
2) हेल्मेट घातलं की केस गळतात, डोक्याला टक्कल पडतं?
हा पुन्हा अत्यंत चुकीचा, सांगोवांगी पसरलेला अपसमज, हेल्मेट घालण्याचा आणि केस गळण्याचा काय संबंध? तुमच्या हेल्मेटची क्वालिटी चांगली असेल, त्यातले व्हेण्टिलेटिंग पोर्ट्स उत्तम असतील, फार घाम येत नसेल, डोक्याला पुरेशी हवा लागत असेल तर केस गळणारच नाहीत. त्यामुळे मुलं टक्कल पडण्याचं आणि मुली केस गळण्याचं जे कारण सांगतात, तो निव्वळ एक गैरसमज आहे. 
हेल्मेट निवडताना काय काळजी घ्याल?
1) सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे आयएसआय मार्क असलेलं हेल्मेट घ्यायचं. वैद्यकीय गरज, वाहतुकीचे नियम, वेग या सार्‍याचा विचार करून सरकारने ज्या प्रकारच्या हेल्मेटला मंजुरी दिलेली आहे, असे हेल्मेट म्हणजे आयएसआय मार्कवाले; मात्र असे मार्कही नकली असूच शकतात. त्यामुळे जेव्हा केव्हा हेल्मेट घ्याल तेव्हा तेव्हा विकत घेतल्याची पक्की पावती घ्यायची म्हणजे त्यासोबत एक वर्षाची वॉरण्टी-गॅरण्टीही मिळते.
2) हेल्मेट जितकं लाइटवेट तितकी त्याची किंमत जास्त, चांगले पोर्ट, उत्तम फॅब्रिक, मेटलची जाळी, सुरक्षितता आणि कम्फर्ट या सार्‍याचा विचार जितका जास्त तितकं हेल्मेट महाग. त्यामुळे घ्यायचं म्हणून घ्यायचं, नगाला नग म्हणून रस्त्यावर शे-दोनशे रुपयांत मिळणारे जड हेल्मेट घेऊ नका. त्याचा काहीच उपयोग होत नाही.
3) काहीजण हेल्मेट म्हणून फक्त डोकं झाकतात. पूर्ण चेहरा झाकला जात नाही. डोळ्याखालचा भाग उघडाच राहतो. असं हेल्मेटही धोकादायक. मानेचा पहिला मणका जिथं असतो तिथवरचा भाग हेल्मेटनं झाकला गेला पाहिजे. तो कवटीचाही सगळ्यात खालचा भाग असतो, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे. तेच डोळ्यांच्या खालच्या हाडाचं आणि खोबणीचं. अनेकांची खोबणी अपघातात फ्रॅ क्चर होते, डोळ्याला इजा होऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता घ्यायची तर पूर्ण डोकं, चेहरा झाकला जाईल असं हेल्मेट घ्या.
4) हेल्मेटला डेंट आला, चिरा गेल्या तर ते हेल्मेट वापरणं तातडीनं बंद करा. त्या एका डेण्टसाठी हेल्मेटनं तुमचं डोकं वाचवलेलचं असतं हे लक्षात घ्या आणि हेल्मेट बदला. खराब झालेलं हेल्मेट अजिबात वापरू नका.

मेंदूविकारतज्ज्ञ

 

***

 

हेल्मेट न घालण्यात
काय शौर्य?

वाहतूक अपघातांमुळे भारतात दरवर्षी दीड लाखांपेक्षा अधिक व्यक्ती आपले प्राण गमावतात. अपघातांमुळे जखमी होणार्‍या व्यक्तींची संख्या अचूक उपलब्ध नसली तरी ती अंदाजे दहा लाखांहून अधिक आहे. चारचाकी वाहनं व सार्वजनिक वाहतुकीची वाहनं यांच्यामुळे होणार्‍या अपघातांपेक्षा स्कूटर्स, मोटरसायकल्समुळे होणार्‍या अपघातांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक आहे. प्रत्येक एक चारचाकी वाहनाच्यामागे कमीतकमी पाच दुचाकी वाहनं नोंदवली जातात. शहरांच्या होणार्‍या वाढीमुळे महाराष्ट्रात हे प्रमाण यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. रस्त्यावरील अपघात हे  वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे, रस्त्यावर असलेल्या अनेक अनधिकृत आक्रमणांमुळे, रस्ते ठिकठिकाणी खणल्यामुळे, खड्डय़ांमुळे, बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकण्यामुळे होत असतात. प्रवेश बंद अशा मार्गिकेतून अचानक येणार्‍या वाहनांमुळे नियंत्नण सुटण्यानं अनेक अपघात होतात. अपघातांचं प्रमुख कारण दारू पिऊन वाहनं चालवणं, वेगमर्यादा न पाळणं हे आहेच.
दुचाकीचे हे अपघात त्यातही जास्त. दुखापतींचं प्रमाणही जास्त. अचानक येणार्‍या स्पीड ब्रेकरमुळे, अन्य कारणांमुळे वेग नियंत्रित होऊ न शकल्याने दुचाकी स्वार व विशेषतर्‍ बेसावध असलेली मागे बसलेली व्यक्ती अपघातांना सहज बळी पडतात.
वाहतूक अपघातातील हे मृत्यू टाळायचे असतील तर दुचाकी वाहनाने जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीने आयएसआय प्रमाणित हेल्मेट वापरणं अतिशय जरूरीचं आहे. 
सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्ती असावी असे निर्देश दिले आहेत. ही सक्ती काही जबरदस्ती नाही, ती स्वीकारायला हवी. आपलं डोकं आणि जीव वाचवण्यासाठी आवश्यक ते हेल्मेट न घालण्यात कसलं आलंय शौर्य?


प्रवीण दीक्षित
(निवृत्त पोलीस महासंचालक)

Web Title: Do you have a head? - Then save it! use helmet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.