बजरंग पुनिया- वर्ल्ड नंबर वन झाला कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 06:00 AM2018-11-15T06:00:00+5:302018-11-15T06:00:07+5:30

वर्ल्ड नंबर वन रेसलर. या चार शब्दांत त्याची ‘ताकद’ आहेच, पण त्या किताबापलीकडे आहे त्याच्या मेहनतीचा जिद्दी खडतर प्रवास.

Bajrang Punya - journey of his struggle to become world number one? | बजरंग पुनिया- वर्ल्ड नंबर वन झाला कसा?

बजरंग पुनिया- वर्ल्ड नंबर वन झाला कसा?

Next
ठळक मुद्देया वर्षीच एका सीझनमध्ये त्यानं 5 पदकं जिंकली आहेत. राष्ट्रकुल आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रजतपदक जिंकलं. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने म्हणूनच त्याला ‘नंबर वन’चं रॅकिंग दिलं आहे.

- अनन्या भारद्वाज

सिनेमाची असते तशी त्याच्या आयुष्याची एक गोष्ट आहे. हिरोवाली कहानी.  काय नाही त्या कहाणीत? भयंकर गरिबी आहे, हालअपेष्टा आहेत, ढोर मेहनत, कष्ट, रात्रंदिवस झगडा आणि जिद्द आहे. यश आहेच, पण त्या यशापेक्षाही यशार्पयतचा प्रवास ही गोष्ट आहे. नावाला सार्थ ठरवणारी हनुमान उडी त्यानं जगून दाखवली आहे. म्हणून त्याची ही गोष्ट आजच्या काळात महत्त्वाची आहे, कारण वर्ल्ड नंबर वन होण्याची स्वप्न तर सहजी पाहता येऊ शकतात; पण नंबर वन होण्यासाठी काय करावं लागतं हे त्याचा प्रवास सांगतोय.
बजरंग पुनिया.
65 किलो वजनीगटात वर्ल्ड नंबर वन कुस्तीपटू बनण्याचा बहुमान नुकताच त्याच्या वाटय़ाला आला. वर्ल्ड नंबर वन रेसलर. हे चार शब्द वाचतानाच ही अव्वल होण्याची ताकद काय असू शकेल याचा अंदाज आपल्याला येतो.
पण तरी ही गोष्ट बजरंगच्या आयुष्याच्या फ्लॅशबॅकपासूनच सुरू करावी लागते. हरयाणातल्या झझ्झर तालुक्यातील खुद्दन गावाचा हा बजरंग. लहानपणापासून घरात तंगीच. एरव्ही हरयाणात दुधा-तुपाला घरोघर तशी कमी नसते; पण बजरंगच्या घरात तेही नव्हतंच. अलीकडेच एका मुलाखतीत बजरंग म्हणाला होता, ‘ मै प्रॅक्टिससे लौटता तो, मुझे पता था की घर जाकर मुझे खाने में क्या मिलनेवाला है!’ ते माहीत असणं इतकं सहज होतं कारण दूधपोळी हे एवढंच जेवायला मिळायचं. बाकी काही घरात नव्हतंच. त्याच काळात त्याला कळलं होतं की, ही जिंदगी बदलायची तर कुस्तीशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून वयाच्या 8 व्या वर्षापासूनच त्यानं कुस्ती खेळायला आखाडय़ात जायला सुरुवात केली. त्याचे वडील बलवान सिंह, तेही विद्यापीठ स्तरार्पयत कुस्ती खेळले होते. मोठा मुलगा हरेंद्र तोही कुस्ती खेळायचा. पण घरात कुस्ती पहिलवान वाढवणं सोपं नसतंच. दूध-तूप-बदामाचा खुराक कुठून आणणार. त्यावर उपाय म्हणून त्यांनी छारा नावाच्या गावातल्या दिवानचंद आखाडय़ात बजरंगला पाठवलं. 35 किलोमीटर दूर तो आखाडा. पहाटे तीन वाजता बजरंगचा दिवस सुरू व्हायचा. आजही तो रोज पहाटे तीन वाजताच उठतो.
बजरंग 2007 सालचा असाच एक किस्सा सांगतो. माछरौली नावाच्या गावात कुस्त्यांची दंगल होती. तेव्हा बजरंग फक्त 14 वर्षाचा होता. अंगापिंडानं मजबूत. हरयाणात कुस्ती दंगल होळीच्या आसपास जोरात असतात. या गावातही भलेभले पहिलवान आलेले होते. एकमेकांना चीत करत होते. तर हा मुलगा आयोजकांना जाऊन म्हणाला की, मला खेळवा. त्यांनी याला उडवून लावलं पण तरी तो ऐकेना. पोरगं हातपाय तोडून घेणार असं वाटत होतं; पण लोकांचं मनोरंजन होतंय तर जाऊ द्या म्हणत आयोजकांनी त्याला सांगितलं, तू निवड पहिलवान, खेळ.
त्यानं पहिलवान निवडला. त्याच्यापेक्षा दुप्पट वजनाचा गडी. कुस्ती रंगली आणि बजरंगनं त्याला लोळवला. तिथून जी लोळवायची सुरुवात सुरू झाली तीच आग आणि जिगर त्याला प्रत्येक सामन्यात पुढं नेत राहिली. ती आगच अशी होती की, कालांतरानं त्याच्या वयाच्या नि वजनाच्या कुस्तीपटूंनी त्याच्याशी खेळणंच बंद केलं. म्हणता म्हणता त्याच्या कुस्तीनं दिवस बदलायला लागले. हार वाटय़ालाच आली नाही असं नाही; पण जिंकताना मात्र त्याला माहिती होतं, जिंकलं तर जिंदगी बदलेल!
चार पैसे येणं आणि चॅम्पियन होणं यात मात्र फरक असतो. तो असतो अ‍ॅटिटय़ूडचा. तो अ‍ॅटिटय़ूड मात्र बजरंगकडे नव्हता. जिंकलो, हरलो काही फार महत्त्वाचं त्याला वाटत नव्हतं. मात्र ती आग त्याच्यात योगेश्वर दत्तने ओतली. जकार्ताला जातानाच योगेश्वर दत्तने त्याला सांगितलं होतं, 2014 साली मी मेडल जिंकलं होतं, कुस्तीत गोल्ड मेडल भारतानं जिंकलं त्याला 28 वर्षे झाली, आता तुला यावेळी ती जिंकायचंच आहे, ते न जिंकता परत येऊ नकोस!’
मग तेच ध्येय मनाशी घेऊन बजरंगी मॅटवर उतरला, जिंकला. आता तो म्हणतो, जिंकलो त्याचा आनंद आहे; पण जश्न नाही, मला ऑलिम्पिक मेडल दिसतंय, इथं थांबून चालणार नाही.
2018 या वर्षभरात तर तो थांबलाच नाही. या सीझनमध्ये त्यानं पाच मेडल जिंकलीत आणि वर्ल्ड नंबर वन झालाय.
नंबर वन होण्याचा हा प्रवास म्हणूनच जास्त रोमांचकारी आहे. कष्ट आणि मेहनत स्वप्नांची पायाभरणी करतात त्याचं हे उदाहरण.

Web Title: Bajrang Punya - journey of his struggle to become world number one?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.