तीर निशानेपर

By admin | Published: July 18, 2014 11:54 AM2014-07-18T11:54:11+5:302014-07-18T11:54:11+5:30

‘टार्गेट’वर अचूक नेम साधणारी नव्या दमाची पाऊलं

Arrow Shooter | तीर निशानेपर

तीर निशानेपर

Next
>- नरेश हाळणोर
 
खेळाची परवड आणि खेळाडूंचे हाल याच्या कथा यांत नवीन ते काय? पण खूप सोयी सुविधा मिळतात म्हणून काही कुणी खेळ खेळत नाही. खेळासाठी लागते ती खेळण्याची दुर्दम्य इच्छा, त्या खेळासाठीची अंतरिक ओढ आणि जिद्द.
तो ‘जस्बा’ नक्की काय असतो हे पहायचं असेल तर खेड्यापाड्यातल्या या तरुण खेळाडूंना भेटा. तिरकामट्याचा जुना पारंपरिक खेळ, त्यांचं  आता आधुनिक स्वरूपाचं प्रशिक्षण घेत ही कोवळी मुलं आता राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधे पदकांची दावेदारी सांगत आपली स्वप्नं पूर्ण करायला निघाली आहेत.पण त्यांच्यसाठी ती वाट सोपी नाही.आर्थिक परिस्थिती जेमतेम. सोयुसुविधा नाहीच, पण आंतरराष्ट्रीय दर्जाचंच काय पण साधं बाबूंचं प्रशिक्षण घ्यायलाही अनेकांकडे पैसे नाहीत.त्यांचे प्रशिक्षक जीवाचं रान करत, आपापल्या खेळाडूंसाठी धनुष्यासह बाकीच्या सुविधांसाठी झगडतात.आणि त्यातून ही मुलं आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचं स्वप्नंही पाहतात.काय सांगावं, ही स्वप्नं पूर्णही होतील.नुकत्याच झालेल्या बजेटमधे सरकारनं मणिपुरात एक क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे.अशा प्रकारच्या विद्यापीठातून भविष्यात खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण आणि चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा करायला हवी.
पण आज ज्या खेळांना ग्लॅमर नाही, ज्यात फार पैसा नाही, जिथं स्पॉन्सर्स पोहचत नाहीत आणि टीव्हीवर झळकण्याचीही संधीही नाही असं फारसं काहीच नसतानाही, खेळाची जिद्द आणि आवड तरुण खेळाडूंना झगडायला कशी भाग पाडते, हे समजून घ्यायचं तर या तिरंदाज मुलामुलींना भेटायलाच हवं. ते सांगताहेत, त्यांच्या तिरंदाजीची गोष्ट.
 
झारखंड म्हणजे धोनी,कोणी सांगितलं?
सोबांरी सॉय (खरसावा, झारखंड) वय : १६ वर्षे. शिक्षण : दहावी  
झारखंडमधला आदिवासी जिल्हा खरसावा. इथल्याच कस्तुरबा गांधी विद्यालयात मी शिकते. धनुष्यबाणाची ओढ कधीपासून आहे हे मला आता धड आठवतही नाही. पण ते आवडतं हे नक्की. आता गेल्या दोन वर्षांपासून सराई किला खरसावा ट्रेनिंग सेंटरमध्ये हेमांसू मानती यांच्याकडे मी प्रशिक्षण घेतेय. पण आम्हाला  निशाणा - नेमबाजीसारख्या खेळांचं आकर्षण  लहानपासूनच वाटतं. रोज खेळतानाही आम्ही मुली मुली हा तिरंदाजीचाच खेळ जास्त खेळायचो. त्यामुळे आमची नजर पक्की, बाण निशाणावर लागला नाही  असं कधी व्हायचं नाही. पण आपण खेळतो हा ‘खेळ’ असतो, त्याचं प्रशिक्षण-स्पर्धा असतात हे कुणाला माहिती होतं. ते आता कुठं शाळेत कळायला लागलं. 
त्यात आमच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. वडील वारले. तीन भावंडांच्या  शिक्षणाची जबाबदारी माझ्या अडाणी आईवर येऊन पडली. आमच्या मालकीची काही शेती नाही. आई मोलमजुरी करते, त्यावर घर चालतं. अशात काय मी खेळात करिअर करण्याचं स्वप्न पाहणार?
त्यात आता आमच्या झारखंडात धोनीमुळे  पोरं क्रिकेटच्या मागं पार वेडी झाली. मुलींना मात्र फारच हौस असेल तर पारंपरिक खेळच खेळायचे. त्यातही फार सोयी-सुविधा नाहीत. तरीही आता आमच्याकडे आर्चरीचं ट्रेनिंग सेंटर झालं असल्यानं त्यात मुलींचा सहभाग वाढतो आहे. आम्हा आदिवासी मुलामुलींचा तिरकामट्याशी थोडा का होईना कधी ना कधी संबंध येतोच. तसा माझ्याही हातात तिरकामटा होताच. त्यातून मलाही शाळेतच आर्चरीची आवड निर्माण झाली. हेमांतू सरांनी शाळांच्या काही स्पर्धांमध्ये मला हेरलं आणि ट्रेनिंग सेंटरमध्ये येण्यास सांगितलं. गेले अन् सुरू झाला सराव. फार नाही, फक्त गेल्या दोन वर्षांपासूनच्या सरावानं अन् प्रशिक्षक हेमांतू सरांनी घेतलेल्या मेहनतीनं मला राज्यात पहिलं मानांकन आहे. नजरेतला निशाणा पक्का होता, गरज होती फक्त सफाईची. ती सरावातून मिळाली. सरांनीच रिकर्व्ह उपलब्ध करून दिलं. स्वत:चं रिकर्व्ह घेण्याची ऐपत नव्हतीच. आर्चरीसाठी येणारा कोणताही खर्च करण्याची माझी परिस्थितीच नाही तरीही सरांनी माझ्यासाठी परिश्रम घेणं सोडलं नाही, हे मी कसं विसरू. 
आजही आठवतं, गेल्या वर्षीच्या शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेसाठी रिकर्व्ह नव्हतं. ट्रेनिंग सेंटरला चांगलं रिकर्व्ह नव्हतं. ऐनवेळी विकत घेण्याची माझी ऐपत नव्हतीच पण सरांनाही अडचणी येत होत्या. एका रात्रीतून त्यांनी कुठून तरी रिकर्व्ह मिळविलं आणि दुसर्‍या दिवशी मी स्पर्धेत सहभागी होऊ शकले. एवढंच नाही तर सुवर्णपदक पटकावत ते मी सरांना समíपत केलं.  त्यांना आणि मला तेव्हा काय वाटलं हे आज नाहीच सांगता येणार.
खूप मेहनत करून, मी जास्तीत जास्त मेडल जिंकणार आहे,  तेच माझं आता स्वप्न आहे.
 
रिक्षाचालकाची मुलगी जिंकेल ना मेडल
सोनी कुमारी (धनबाद, झारखंड) वय : १६ वर्षे. शिक्षण : बारावी  
 
तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. शाळेला दिवाळीच्या सुट्टय़ा सुरू व्हायच्या होत्या. त्याचवेळी शाळेत काही खेळांच्या स्पर्धा तर काही नवीन खेळांची शिबिरं सुरू होणारेत असं आम्हाला कळलं. स्पर्धा नेहमीच्याच. पण नवीन म्हणवणार्‍या खेळात आमच्यासाठी एक जुनाच खेळ होता. मुख्य म्हणजे त्याला खेळ म्हणतात हे तेव्हाच कळलं. ती धनुष्यबाणाची स्पर्धा होती. लहानपणी  रामायण, महाभारतातल्या गोष्टी ऐकलेल्या. त्यातले राम-लक्ष्मण-रावण एकमेकांना बाण मारायचे हे माहिती होतं. पण कधी तो खेळ प्रत्यक्षात पाहिंला नव्हता. बांबूच्या कामट्या वाकवून त्याला दोरी बांधून पोरं धनुष्यबाण बनवायची अन् खेळायची, एवढीच काय ती धनुष्यबाणाची ओळख. पण शिबिरात एका वेगळंच धनुष्य, त्याचे बाणं दिसले. शाळेतल्या पोरीपैकी मी एकटीच धनुष्यबाणाच्या शिबिरात सहभागी झाले. बांबूपासूनचा बनविलेल्या धनुष्याला हात लावताच अंगाला शहारे आल्याचं आजही आठवतं. शिबिरात धनुष्यबाणाशी ओळख तर झालीच पण खूप काही माहितीही मिळाली. तेव्हाच मनाशी पक्क ठरवलं. हेच खेळायचं. 
वर्षभरानं धनबादमधल्याच महोदा इंटर महाविद्यालयात गेले. तिथे शाळेपेक्षा अधिकच्या सोयी-सुविधा. शालेय काळातली सुप्त इच्छा पूर्ण करण्याची संधी होतीच, त्यासाठी आई-बाबांचीही मदत लागणारच होती. बाबा रिक्षाचालक, त्यातून फारसं उत्पन्न मिळत नाहीच. म्हणून ते रिक्षा खरेदी-विक्रीचंही काम करायचे. पण मला हा खेळ खेळायचाय म्हटल्यावर त्यांनी कोणतीही आडकाठी केली नाही. मोडता घातला नाही.  त्यांनीच धनबादमधलं आर्चरी ट्रेनिंग सेंटर शोधलं अन् मला घेऊन गेले. तिथेच प्रशिक्षक बुद्धेश्‍वर यांची ओळख झाली. त्यांनी प्रात्यक्षिक पाहिलं. आणि तिथंच माझा सराव सुरू झाला.  हा महागडा खेळा. रिक्षाचालकाच्या मुलीला कसा झेपायचा खर्च?
 पण बाबांनी कोणताही विचार न करता माझ्या प्रशिक्षणासाठी मेहनतीची तयारी दाखविली. पहिलाच प्रश्न होता रिकर्व्हचा (धनुष्याचा). शालेय स्पर्धांसाठी इंडियन रिकर्व्हचा वापर केला जातो. ते बांबूचे धनुष्यदेखील खरेदी करण्याची ऐपत नव्हती. पण बाबांनी हिंमत दिली. प्रशिक्षकांनीही उत्साह वाढविला. अन् पहिल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेतून चमकदार कामगिरीची नोंद घेत राज्यस्तरीय स्पर्धेत पोहोचले. तिथेही मस्त प्रदर्शन. त्यामुळे शालेय राष्ट्रीय स्पर्धेला पहिल्यांदाच निवड झाली. तोपर्यंत हवं तसं गांभीर्य नव्हतं. पण तो माहौल, देशभरातून आलेल्या स्पर्धक पोरींची रेकॉर्डस् पाहून, ऐकून थक्कच झाले. मी मागे तर नाहीना, अशी काहीशी उदास भावना मनात डोकवायची. पण बुद्धेश्‍वर सरांनी हिंमत दिली. पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या दोन गटांत सुवर्णपदकांवर निशाणा साधला. रोजचा सहा-सहा तासांचा सराव कामी आला. गेल्या दोन वर्षांच्या सहा शालेय राष्ट्रीय स्पर्धेतून ५ सुवर्णपदके पटकावली. राज्य धनुर्विद्या स्पर्धेच्या मानांकनात द्वितीय स्थान असून, येत्या वर्षभरात अव्वल मानांकनाचं माझं लक्ष्य आहे.
आता कुठं मला पुढच्या पुढच्या वाटा दिसायला लागल्या आहेत.
 
इथवर तर आलो, पण पुढे?
प्रविण जाधव (सर्डे, फलटन, महाराष्ट्र) वय : १६ वर्षे.  शिक्षण : दहावी  
 
घरची परिस्थिती नाजूक. स्वत:ची शेती नाही. आई-वडील दुसर्‍याच्या शेतावर मजुरी करतात. शिक्षणाची हौस भारी. आठवीपर्यंत कसाबसा शिकलो. पुढे अंधार दिसू लागला. धावण्याच्या प्रकारात चांगला होतो त्यामुळे नगरच्या क्रीडा प्रबोधिनीत अन् नंतर अमरावतीच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये आलो. तिथंच तिरंदाजीच्या खेळात सिलेक्ट झालो. कुठं फलटणजवळचं सर्डे गाव कुठं अमरावती, पण शिकायचं आणि खेळायचं तर गाव सोडण्यावाचून पर्याय नव्हता.
गेल्या चार वर्षांमध्ये अमरावतीच्या क्रीडा प्रबोधिनीतील आर्चरीचे प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू करतोय. रोजचा चार-सहा तासांचा सराव होतो. गेल्या दोन-अडीच वर्षांंमध्ये मी १२ राष्ट्रीय स्पर्धांमधून सहभागी होताना ५ सुवर्ण, २ रौप्य, २ कांस्य पदक पटकावले आहेत. राज्य स्पर्धेतील पदकांची तर गिणतीच नाही. राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी खूपच छान आहे, पण त्यापुढे जाण्यास आर्थिक अन् साहित्याच्या अडचणी आहेत. सध्या जुनेच साहित्य वापरतो.
भीती वाटते, पुढं हा गेम कसा नेणार? आंतरराष्ट्रीय स्पर्धेची वाट कठीण वाटते. स्पर्धांंमध्ये जायचं असेल तर चांगला रिकर्व्ह हवा, साहित्य हवे आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक मदतही हवी. सध्या माझ्याकडे फक्त गेम आहे, त्याशिवाय तीनही गोष्टी नाहीत. राज्य-राष्ट्रीय स्पर्धांंमधून ३0 सुवर्णपदकं जिंकूनही आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नसेल तर काय उपयोग, असं वाटून खूप हताश वाटतं.
पण मग वाटतं, इथवर आलो तर अजून पुढं जाऊ. सापडतील वाटा.
जिंकू.एवढं काय?
 
 
दीपिका कुमारी हाच आदर्श
पुर्वा पल्लीवार (अमरावती, महाराष्ट्र) वय : १६ वर्षे.  शिक्षण : बारावी  
 
सहावीला असेन, तेव्हा मी तिरंदाजीचं प्रशिक्षण सुरू केलं. खरंतर मला खेळाची आवड होती, कुठल्यातरी खेळात कायतरी भारी करायचं असं डोक्यात होतं. पण कोणत्या हा प्रश्न जसा माझ्यासमोर होता, तसाच पप्पा-मम्मीसमोरही. खूप काही उठापटक केल्यानंतर आपल्याला सांघिकपेक्षा वैयक्तिक खेळात अधिक रस असल्याचं लक्षात आलं. त्याअंगानं विचार सुरू झाला आणि आम्ही अमरावतीतल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात गेलो. त्यात तिरंदाजीच मला जास्त आवडली.
वडील स्टेट बॅँकेमध्ये प्रशासकीय अधिकारी. आई हाउस वाईफ  पण उच्चशिक्षित. मध्यमवर्गीय कुटुंब, तशी आमची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानं इतर काही अडचण नव्हती. सहावीला असताना म्हणजे सहा-सात वर्षांंपासून मी नेमाबजी शिकते. प्रशिक्षक गणेश विश्‍वकर्मा यांच्याकडून धनुर्विद्येचे धडे घेतले. सुरुवातीला शालेय स्पर्धांंतून सहभागी होऊ लागले. राज्य स्पर्धांंमधून सहभागी होत आजपर्यंंत किमान २0 तरी सुवर्णपदकं मिळाली आहेत, तर गेल्या तीन राष्ट्रीय स्पर्धांंमधून ९ पैकी ६ सुवर्ण पटकावली. आता वेध लागलेत ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांंचे. त्यासाठी आणखी दोन वर्षंं कठोर मेहनत घ्यावी लागेल याची जाणीव आहेच. 
गेल्या वेळची स्कूल नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप झारखंडला होती. मी हा खेळ खेळायला लागले तेव्हापासून दीपिका कुमारी माझी फेव्हरिट होती. तिची स्टाईलही मी फॉलो करते. झारखंडला तिची भेट झाली. तिच्याशी काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही फक्त ती काय सांगतेय तेच ऐकत होतो. तो क्षण अविस्मरणीय होता. 
-तिनं जशी देदीप्यमान कामगिरी केली, तसंच काहीतरी करायचं स्वप्न पाहत मी सध्या सराव करतेय.स
 
आहे, माझं टार्गेट मोठं.!
रुपाली यमगार (सोलापुर, महाराष्ट्र) वय : १६ वर्षे. शिक्षण : बारावी  
 
धनुष्यातून निघालेला बाण ज्या वेगानं जातो त्याच वेगानं माझाही श्‍वास चालतो. आर्चरी हाच माझा श्‍वास अन् ध्यासही. तशी माझ्या घरची परिस्थिती नाजूक. वडील मालवाहू टेम्पो चालवतात. त्यावरच घर चालतं. आई घर सांभाळते, तिच्याच प्रोत्साहनामुळे मी गेल्या चार वर्षांंत नेमबाजीत काहीतरी करू शकले. नाहीतर शक्य नव्हतंच.
शाळेत असल्यापासून अनेक खेळ खेळायची. कबड्डी खेळायला खूप आवडायचं. खो-खोही खेळायचे. चार वर्षांंंपूर्वी आर्चरीची ओळख झाली ती आमच्या इथल्या मनगिरे व्यायामशाळेत. रावसाहेब मनगिरे यांनीच या व्यायामशाळेत पहिल्यांदा तिरंदाजीचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. तिथं जाऊ लागले. सराव करू लागले. तिथेच भेटले कोच अरविंद कोळी सर. त्यांनी माझ्याकडून सराव करून घेतला. ते नेहमी सांगायचे की, स्पर्धेत टिकायचं असेल तर मेहनत घे, प्रयत्न कर तू खूप पुढे जाशील. 
 बस्स, तेव्हापासून सुरू झाली कठोर मेहनत अन् तिरंदाजीचा खेळ. हा तसा महागडा खेळ. इंडियन राऊंडसाठी वापरला जाणारा रिकर्व्ह अमेरिकन बांबूपासून तयार केलेला असतो. त्याची बाजारात पाच हजारांपेक्षाही अधिक किंमत. तोदेखील घेण्याची माझी ऐपत नाही. आजही राष्ट्रीय स्पर्धांंपर्यंंंतच वापरता येऊ शकतो असा बांबूचा रिकर्व्ह माझ्याकडे आहे. तोही मला कोळी सरांनी मिळवून दिलाय. ऑलिंपिक वा आंतरराष्ट्रीय स्पर्धांंंमध्ये अँल्युमिनियमचाच रिकर्व्ह वापरावा लागतो, तसाच नियमच आहे अन् त्याची किंमत आहे दीड ते पावणेदोन लाख रुपये. कुठून आणायचा एवढा पैसा? पण, त्याची मी आज अजिबात चिंता करीत नाही. बांबूच्या आहे त्या रिकर्व्हच्या जोरावर आत्तापर्यंंतच्या राज्य स्पर्धांंमधून ३0 सुवर्णपदकांसह ५२ पदकं पटकावली आहेत. गेल्या चार वर्षांंपासून सकाळी तीन, तर सायंकाळी तीन असा सहा तासांचा सराव मी न चुकता करते. बाणाच्या टोकाचं लक्ष्य असतं ते फक्त ५0 मीटरवरचं टार्गेट. हे जसं टार्गेट आहे तसंच अजून एक टार्गेट आहे अन् ते म्हणजे ऑलिंपिकमध्ये मानानं तिरंगा फडकताना पाहण्याचं. कुणाला वाटेल की काय बडी बडी स्वप्न पाहते, पण आपल्यात क्षमता आहे, नशिबाची साथ हवी. आजवर घरच्यांची साथ, प्रशिक्षक-मित्रमैत्रिणी यांनी दिलेलं प्रोत्साहन यांच्यामुळेच चांगली कामगिरी करता आली आहे. बर्‍याचदा एखाद-दोन पॉइंटवरून सुवर्णपदक हुकल्यानं निराशाही आली, ती येतेच पण सावरलं स्वत:ला. एकदा कमी पडलो म्हणजे हारणं नाही, हेच मी सांगतेय स्वत:ला.
मला  माझं नाव नॅशनल - इंटरनॅशनल लेव्हलवर झळकताना पाहायचं आहे अन् त्यासाठी वाट्टेल ती मेहनत घेण्याची माझी तयारी आहे.. 

Web Title: Arrow Shooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.