सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 08:03 PM2023-11-10T20:03:55+5:302023-11-10T20:04:31+5:30

वाशिमच्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

Sikander Sheikh won the prestigious Maharashtra Kesari! Defeated defending champion Shivraj Rakshe | सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत

सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत

वाशिमच्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. गतवर्षी त्याला अपयश आले होते आणि त्याच्या लढतीवरून बराच वाद झाला होता. सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. पण, सिकंदरने त्याचा निर्धार कायम ठेवला आणि लक्ष विचलित होऊ न देता अखेर महाराष्ट्र केसरीची गदा उचलली. त्याने गतविजेत्या शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe) पराभूत केले.  त्याने राक्षेला अवघ्या २२ सेकंदामध्ये आस्मान दाखवले.  


शिवराजने उपांत्य फेरीच्या लढतीत हर्षद कोकाटेचा पराभव केला, तर माती विभागात सिकंदरने उपांत्य फेरीत संदीप मोटेचा १०-० असा पराभव केला. शिवराज दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण, अखेर सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बलाढ्य शरीरयष्टीच्या शिवराजला अवघ्या आस्मान दाखवले.


अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आणि गरिबीतून सिकंदरने कुस्तीतला प्रवास करत आपलं प्रस्थ निर्माण केलंय. आज लाखो कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे. सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. कुस्तीत जिंकलेल्या इनामावरच लग्नानंतर त्यांचं जगणं सुरू होते. मात्र, दोन मुलांच्या जन्मानंतर, बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. म्हणून, त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा सुरू केली. मात्र, आता कुस्तीचा शौक ते आपल्या मुलांत पाहू लागले. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते. 

मुलगा सिंकदर चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. पण, वडीलांना आजाराने गाठले सिकंदरच्या खुराकाला पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडिलांच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या २५ व्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे. 

अन्य निकाल -
माती विभाग - ६५ किलो रोहन पाटील (कोल्हापूर) वि.वि. यश मगदूम (गडचिरोली), ७४ किलो -अनिल कचरे (पुणे) वि.वि. संदेश शिषमुळे (गडचिरोली) , ७० किलो - निखिल कदम (पुणे) वि.वि. अभिजित भोसले (सोलापूर), ६१ किलो - अमोल वालगुडे (पुणे जिल्हा) वि.वि. भालचंद्र कुंभ (पुणे), ५७ किलो - सौरभ इंगवे (सोलापूर) वि.वि. कृष्णा हरणावळ (पुणे), ८६ किलो - विजय डोईफोडे (सातारा) वि.वि. ओंकार जाधवराव (पुणे)

गादी विभाग ६१ किलो - पवन डोन्हर (नाशिक) वि.वि योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), ७० किलो - विनायक गुरव (कोल्हापूर) वि. वि. संकेत पाटील (कोल्हापूर), ५७ किलो - आतिश तोडकर (बीड) वि.,वि. आकाश सलगर (सोलापूर).  ७४ किलो - शुभम थोरात (पुणे ) वि.वि. राकेश तांबुलकर (कोल्हापूर)

Web Title: Sikander Sheikh won the prestigious Maharashtra Kesari! Defeated defending champion Shivraj Rakshe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.