खेळाडूंचा टक्का वाढविणे गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 05:03 AM2019-05-01T05:03:27+5:302019-05-01T05:04:14+5:30

सुनील वालावलकर गामी दशकाविषयी भविष्य वर्तवत असताना सद्य:परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि बेडरूमपासून ड्रेसिंगरूमपर्यंत ...

Need to increase the percentage of the players! | खेळाडूंचा टक्का वाढविणे गरजेचे!

खेळाडूंचा टक्का वाढविणे गरजेचे!

Next

सुनील वालावलकर

गामी दशकाविषयी भविष्य वर्तवत असताना सद्य:परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे गरजेचे आहे. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि बेडरूमपासून ड्रेसिंगरूमपर्यंत सर्व स्तरावर असमाधान आणि तणावाची छाया पडलेली दिसते. गरिबीमुळे निर्माण होणारे ताणतणाव हे एक वेळ समजून घेता येतात; परंतु आर्थिक सुस्थितीतील कुटुंबांमधल्या असमाधानाची कारणे शोधताना दमछाक होते. विशेष म्हणजे, समाजातील वरच्या स्तरामध्ये तणावग्रस्त व्यक्ती जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.

आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्ती असमाधानी का? याची अनेक अंगाने कारणमीमांसा करता येऊ शकते. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीकडे झालेले दुर्लक्ष. पैसे कमावण्याच्या ईर्षेने म्हणा किंवा करिअर करण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे, समाजातील एक फार मोठा वर्ग अंगमेहनतीपासून खूप लांब गेला आणि जेव्हा ही गोष्ट उशिराने लक्षात आली तेव्हापासून जॉगिंग, जिम, सायकलिंग, योग, हास्यकलासारख्या उपक्रमांवर हावरटासारखा हा वर्ग तुटून पडला. खरे म्हणजे शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळाला पर्याय नाही. घाम काढणारा कुठलाही मैदानी क्रीडा प्रकार हा व्यक्तीला आणि एकूण समाजाला प्रगतिपथावर नेणारा असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे युरोपियन देश.

युरोपियन चिमकुल्या देशाने संपूर्ण जगावर राज्य कशाच्या जोरावर केले? कोणत्या गुणवैशिष्ट्यांमुळे युरोपियन समाजामध्ये दर्यावर्दी आणि लढवय्येपण आले? याचा खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला असे आढळेल की युरोपमधले नागरिक मुळात क्रीडापटू होते. क्रीडानिपुण होते. क्रीडा कौशल्याच्या जोरावर त्यांनी जग जिंकले. क्रीडांगणामधली कौशल्य त्यांनी प्रत्यक्ष रणांगणामध्ये वापरली आणि संपूर्ण जग पादाक्रांत केले. ऑलिम्पिक चळवळीची सुरुवात ग्रीस देशातून सुरू होण्यामागे युरोपियन नागरिकांचे क्रीडा प्रेमच कारणीभूत असल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे.

ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसारखी छोटी राष्ट्रे सातासमुद्रापलीकडून येऊन भारतावर दीडशे वर्षे राज्य करतात. यामागच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे मैदानी खेळांकडे झालेले दुर्लक्ष. शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानात जाऊन घाम काढला पाहिजे. हा विचार आपल्या समाजाच्या केंद्रस्थानी पूर्वीपासून कधीच नव्हता. त्याची शिक्षा आज आपण सर्वजण भोगतो आहोत. आॅलिम्पिकमधील आपली सुमार कामगिरी असो किंवा देशातील वाढते धार्मिक उन्मादी वातावरण या सर्वांमागे एक निश्चित कारण आहे ते म्हणजे एक समाज म्हणून क्रीडापटू अथवा खेळाडूंचा आपला देश नाही. दुर्दैवाने आपण टाळ्या वाजवणाऱ्या प्रेक्षकांचा देश म्हणून ओळखले जात आहोत, अशा समाजातील क्रीडा संस्कृतीचे भवितव्य खूपच धोकादायक अवस्थेत आहे.

आपल्या देशाला उत्तम संगीताची, नृत्याची, शिल्पचित्र कलेची समृद्ध परंपरा आहे. वाङ्मयाचासुद्धा अभिमानास्पद वारसा आहे. त्याच्या तुलनेत क्रीडा प्रकाराचा आपल्याला इतिहास नाही, हे वास्तव मान्य करून भावी क्रीडा संस्कृतीचा विचार करावा लागेल. एका अभ्यास पाहणीचा निष्कर्ष असा सांगतो की, १०० भारतीयांपैकी केवळ दहाच नागरिक प्रत्यक्ष क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणून सक्रिय आहेत आणि उर्वरित ९० जण प्रेक्षकांच्या भूमिकेत जीवन जगत आहेत. याउलट प्रगत राष्ट्रातील म्हणजे युरोप, अमेरिका, चीन देशातील १०० नागरिकांपैकी ६० व्यक्ती क्रीडांगणावर खेळाडू म्हणून घाम काढत असतात. आपल्याकडच्या तोकड्या क्रीडा स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंची कामगिरी सुमार होते.

गेल्या २५ वर्षांत समाजातील अनेक क्षेत्रात लक्षणीय सुधारणा झाल्या. उदा. बँकिंग, विमा, शेअरबाजार, माध्यमे, वाहतूक, संपर्क यंत्रणा, खानपान सेवा इत्यादी. आधुनिक तंत्रज्ञानामुळे बºयाचशा क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडले; परंतु कृषी आणि क्रीडा क्षेत्रात सुधारणेचे वारे अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत. आजही क्रीडा क्षेत्रामध्ये सरकारी नियमांचा अंमल वाजवीपेक्षा जास्तीचा आहे. सरकारी पातळीवरून पूर्वीपेक्षा जास्त निधी उपलब्ध केला जात आहे; परंतु पुरेशा वापराअभावी अनेक क्रीडासंकुले धूळ खात उभी आहेत. पांढरा हत्ती पोसावा, अशी अनेक क्रीडा संकुलांची स्थिती झाली आहे. एका बाजूला मैदानांची संख्या घटत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला सुसज्ज क्रीडा संकुले ओस पडत आहेत. त्याच वेळी खासगी जिम्स मात्र तुफान धंदा करत आहे. विविध खेळांच्या प्रीमियर लीग्स स्पर्धा यशस्वी होताना दिसतात; परंतु त्यातून सर्व वयोगटातील खेळाडूंची संख्या वाढताना दिसत नाही. खेळांविषयी आकर्षण जरूर वाढलेले बघायला मिळते; परंतु प्रौढ वयोगटातील खेळाडूंची संख्या रोडावते आहे. त्यामुळे जीवनशैलीशी निगडित आजार वाढलेले दिसतात. सध्याचा बराच मोठा वर्ग तणावग्रस्त असण्यामागे या वर्गाचा मैदानी खेळाचा तुटलेला संबंध हे कारण आहे.

विशी - पंचविशीनंतरचा एक मोठा वर्ग प्रत्यक्ष खेळण्यापासून दुरावला गेला आहे. ज्या वयात शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी मैदानात घाम काढण्याची आवश्यकता असते नेमक्या त्याच वयोगटातील व्यक्ती, सध्या टी. व्ही. अथवा मोबाइलमध्ये क्रिकेट, फुटबॉल बघण्यात गुंग असतात. याचा विपरित परिणाम या वयोगटातील व्यक्तींच्या आरोग्यावर होताना दिसतो. सध्याचे क्रीडा विश्व एका दृष्टचक्रात अडकलेले आहे. समाजातील फार मोठा सबळ वर्ग निव्वळ प्रेक्षक म्हणून आयुष्य जगतो आहे, परिणामी आपल्या विशीतील खेळाडूंना पुरेसे स्पर्धात्मक वातावरण मिळत नाही आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा टिकाव लागत नाही. तुल्यबळ स्पर्धा नाही म्हणून आंतरराष्ट्रीय पदक नाही. आंतरराष्ट्रीय दबदबा नाही, म्हणून देशात क्रीडा क्षेत्रात दुय्यम स्थान. खेळांना प्राधान्य नाही, म्हणून खेळाडूंची संख्या व गुणवत्ता मर्यादित हे दृष्टचक्र भेदण्याची आवश्यकता आहे.

सध्या सर्व पातळीवरून आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त खेळात पदक मिळाले पाहिजे या एकमेव उद्दिष्टाने, निवडक खेळांनाच प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे की, जे एकांगी आहे. मुळात समाजात खेळाडूंची संख्या आणि वृत्ती कशी वाढली जाईल याकडे अधिक लक्ष
पुरवण्याची गरज आहे. त्यासाठी जे खेळाडू नाहीत, अशांना खेळांच्या मैदानात कस आणता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. भारतात मोबाइलधारकांची संख्या शंभरात ६० एवढी आहे. मात्र, मैदानात खेळणाºया खेळाडूंचा टक्का एकूण लोकसंख्येच्या अवघा १०% इतका आला आहे. त्यामुळे या पुढील १० वर्षांतील क्रीडा विश्वाचे भवितव्य या आकडेवारीत सामावलेला आहे.

क्रीडा प्रेक्षकांच्या संख्येत वाढ खेळाडूंच्या संख्येत घट
सध्याचे सर्व प्रचलित खेळ टीव्हीच्या प्रेक्षकांच्या संख्येत वाढ व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खेळले जात आहेत, त्यामुळे सर्व खेळ अधिक वेगवान आक्रमक होण्यासाठी, त्यानुसार खेळांचे नियम आणि खेळाच्या साधनांमध्ये बदल घडवले जात आहेत. खेळातील थरार वाढवण्याच्या व्यापारी नादात सध्याचे सर्व खेळ अधिक धोकादायक बनले आहेत, त्यामुळे खेळाडूंना वाढत्या दुखापतींचा सामना करावा लागतो, परिणामी, खेळाडूंची कारकीर्द अल्पजीवी होत आहे.

खेळ बघणे हे करमुणकीचे माध्यम आहे, अशी धारणा करून सर्व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात असते. व्यापारी उत्पादनांची मागणी क्रीडा क्षेत्रात सध्या वाढत आहे. त्यामुळे, बूट, पेहराव, क्रीडा साहित्य, आरोग्यवर्धक पेय आदी गोष्टींना अतिरिक्त महत्त्व प्राप्त होत आहे.

Web Title: Need to increase the percentage of the players!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.