राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 07:02 PM2018-12-07T19:02:16+5:302018-12-07T19:04:00+5:30

पुण्याच्या वृषभ वाघला वीर अभिमन्यु तर ठाण्याच्या रेश्मा राठोडला जानकी पुरस्कार

National championship Kho-kho: Maharashtra won double crown | राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो : महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

Next

भोपाळ : ३८ वी कुमार–मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय खो-खो स्पर्धा भोपाळ, मध्य प्रदेश येथे संपन्न झाली असून या स्पर्धेत गतवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजयाला गवसणी घालत दुहेरी मुकुट मिळवला.  
कुमारांच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या महाराष्ट्राने कोल्हापूरचा १२-११ असा एक डाव एक गुणाने सहज पराभव करत अजिंक्यपदाला गवसणी घातली. या सामन्यात वृषभ वाघने कर्णधारची खेळी करताना २:००, २:०० मि. संरक्षण करत एक गडी बाद केला व राष्ट्रीय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा वीर अभिमन्यु पुरस्कार मिळवला. राहुल मंडलने २:००, २:०० मि. संरक्षण केले, दिलीप खंडवीने १:३०, २:३० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, संदेश जाधवने नाबाद १:००, १:२० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, रूपेश जाधवने तीन गडी बाद केले. कोल्हापूरच्या रोहन शिंगाडेने १:०० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, मनोज पाटील व आदर्श, गणेशने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-९ असा चार मिनिटे राखून दोन गुणांनी दणदणीत विजय साजरा करत अजिंक्यपद मिळवले. महाराष्ट्राच्या रेश्मा राठोडने कर्णधारची खेळी करताना ३:००, २:२० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला व सरळ राष्ट्रीय स्पर्धेतला सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा जानकी पुरस्कारवर हक्क प्रस्तापित केला. स्नेहल जाधवने २:००, २:१० मिनिटे  संरक्षण केले, प्राजक्ता पवारने १:४०, २:०० मिनिटे  संरक्षण करताना तीन बळी घेतले, दिव्या जाधवने १:००, १:४० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला, अश्विनी मोरेने नाबाद १:२० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला. कर्नाटकच्या एल. मोनिकाने २:३०, १:४० मिनिटे  संरक्षण करताना तीन बळी घेतले, के. आर. तेजस्विनीने १:२०, २:२० मिनिटे संरक्षण केले, आर. पी. शितलने १:३० मिनिटे संरक्षण करताना एक बळी घेतला. 
तत्पूर्वी झालेल्या कुमारांच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-०८ असा एक डाव तीन गुणांनी धुव्वा उडवला व कोल्हापूरने केरळचा १९-१३ असा ६ गुणांनी पराभव केला. तर मुलींच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा ११-०४ असा एक डाव सात गुणांनी धुव्वा उडवला व कर्नाटकने गुजरातचा १२-०५ असा सात गुणांनी पराभव केला.

Web Title: National championship Kho-kho: Maharashtra won double crown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.