AusOpen 2024: भारताचा रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम चॅम्पियन; विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुकाची थाप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 07:35 PM2024-01-27T19:35:02+5:302024-01-27T19:37:20+5:30

Australian Open 2024: भारताच्या रोहन बोपन्नाने ऐतिहासिक कामगिरी करत चाहत्यांसह विविध क्षेत्रातील दिग्गजांना भुरळ घातली. 

India's Rohan Bopanna and Australia's Matthew Ebden beat Italy's Simone Bolelli and Andrea Vavassori to win the Grand Slam in the Australian Open 2024 final  | AusOpen 2024: भारताचा रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम चॅम्पियन; विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुकाची थाप

AusOpen 2024: भारताचा रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम चॅम्पियन; विविध क्षेत्रातील दिग्गजांकडून कौतुकाची थाप

Australian Open Final, Rohan Bopanna: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्नाने वयाच्या ४३ व्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी केली. शनिवारी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पुरूष दुहेरीच्या फायनल सामन्यात विजय मिळवून ग्रँड स्लॅम जिंकले. हा मान पटकावणारा तो जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. आपल्या तगड्या अनुभवाच्या जोरावर त्याने युवा खेळाडूंना चीतपट केले. रोहन बोपन्ना आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एबडेन या जोडीने तमाम भारतीयांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. 

शनिवारी मेलबर्न पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी सिमोन बोलेल्ली व आंद्रीया व्हॅवासोरी या इटालियन जोडीचा ७-६, ७-५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह बोपन्नाने कारकिर्दीत प्रथमच पुरुष दुहेरीचे ग्रँड स्लॅम जिंकण्यात यश मिळवले. वयाच्या ४३ व्या वर्षी भारतीय दिग्गजाचे स्वप्न साकार झाले. ग्रँड स्लॅममध्ये पुरुषांच्या कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. या विजयानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारताच्या टेनिस स्टारचे कौतुक केले अन् कौतुकाची थाप दिली. 

उद्योग क्षेत्रातील दिग्गज आनंद महिंद्रा, मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, दिनेश कार्तिक, अनिल कुंबळे, व्ही व्ही एस लक्ष्मण, व्यंकटेश प्रसाद, अभिनेता रितेश देशमुख, समालोचक हर्षा भोगले यांसह इतरही खेळाडूंनी रोहन बोपन्नाच्या खेळीला दाद दिली. 

कठोर परिश्रम आणि चिकाटी - मोदी 

दरम्यान, मागील वर्षी बोपन्ना आणि एबडेन जोडीला यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र नवीन वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅममध्ये या जोडीने विजेतेपद पटकावत जबरदस्त कामगिरी केली. २००३ मध्ये आपल्या प्रवासाला सुरूवात करणाऱ्या बोपन्नाने वयाच्या ४३ व्या वर्षी केलेली कामगिरी अनेकांसाठी प्रेरणा आहे. वय हा केवळ आकडा असल्याचे दाखवून देणाऱ्या बोपन्नाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. अलीकडेच भारत सरकारने त्याला देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री जाहीर करून त्याचा सन्मान केला.

खरं तर पुरूष दुहेरीत ग्रँड स्लॅम जेतेपदाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या बोपन्नासाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा आहे. आतापर्यंत कधीच न करता आलेली कामगिरी केल्यानंतर तो भावूक झाल्याचे दिसले. विजयी क्षण अन् बोपन्नाचा आनंद गगनात न मावणारा होता. त्याने २०१८ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले होते. 

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या शिलेदारांना विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. अनुभवाच्या जोरावर सुरूवातीपासूनच बोपन्ना आणि एबडेन यांच्या जोडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. तरीदेखील पहिला सेट ६-६ असा बरोबरीत आला आणि टायब्रेकरमध्ये बोपन्नाने सहकारी एडबेनसह प्रतिस्पर्धींना ७-० असे भिरकावून दिले. बोपन्ना- एबडेन या जोडीने पहिला सेट ७-६ ( ७-०) असा जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. आपापल्या सर्व्हिसमध्ये गेम घेत हा सेट ५-५ असा बरोबरीत आला होता. ११व्या गेममध्ये बोपन्ना आणि एबडेन या जोडीने इटलीच्या खेळाडूंची सर्व्हिस ब्रेक केली आणि ६-५ अशी निर्णायक आघाडी घेतली. आता त्यांना त्यांच्या सर्व्हिसमध्ये बाजी मारून हे जेतेपद नावावर करायचे होते. बोपन्नाने सर्व अनुभव पणाला लावताना हा गेम जिंकला आणि दुसरा सेट ७-५ असा नावावर करून ग्रँड स्लॅम जेतेपदाचा दुष्काळ वयाच्या ४३ व्या वर्षी संपवला. विजयी फटका अन् बोपन्नाने एकच जल्लोष साजरा केला. 

Web Title: India's Rohan Bopanna and Australia's Matthew Ebden beat Italy's Simone Bolelli and Andrea Vavassori to win the Grand Slam in the Australian Open 2024 final 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.