भारतीय महिला बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक भरारी! आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 08:06 PM2024-02-18T20:06:00+5:302024-02-18T20:06:28+5:30

भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचला.

Indian women's badminton team's historic run won the match in the Asia Team Championship | भारतीय महिला बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक भरारी! आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मारली बाजी

भारतीय महिला बॅडमिंटन संघाची ऐतिहासिक भरारी! आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत मारली बाजी

नवी दिल्ली: भारतीय महिला संघाने बॅडमिंटन आशिया सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत इतिहास रचला. मलेशिया येथे पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ३-२ अशा फरकाने थायलंड संघावर विजय मिळवला आणि जेतेपद नावावर केले. या स्पर्धेत भारतीय संघाने चीनला धक्का देताना आपल्या मोहीमेला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जपानला पराभवाची चव चाखवली. माजी जागतिक विजेती पी व्ही सिंधू, ऑल इंग्लंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारी ट्रीसा जॉली व गायत्री गोपिचंद आणि राष्ट्रीय विजेती अनमोल खरब यांच्या दमदार खेळाच्या जोरावर भारतीय संघाने फायनलमध्ये विजय मिळवला.

विजेतेपदासाठी संघाचे अभिनंदन करताना, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव संजय मिश्रा म्हणाले, “आम्हा सर्वांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे भारतातील बॅडमिंटन प्रतिभेची सखोलता अधोरेखित झाली आणि आम्हाला विश्वास आहे की हे खेळाडू येत्या काही वर्षांत आणखी अनेक विजेतेपदे जिंकतील.”
 
महिला एकेरीत सिंधू विरुद्ध सुपानिदा काटेथाँग यांच्यात एकतर्फी सामना पाहायला मिळाला. मागील काही सामन्यांत सुपानिदाने भारतीय खेळाडूला चांगले दमवले होते, परंतु तो भुतकाळ लक्षात ठेवताना सिंधूने या खेळाडूविरुद्ध आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि त्याचा तिला फायदा झाला. सिंधूने ३९ मिनिटांत २१-१२, २१-१२ असा विजय मिळवून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ट्रीसा व गायत्री या जोडीने भारताची आघाडी वाढवली. 

अटीतटीच्या या लढतीत भारतीय जोडीने जागतिक क्रमवारी १०व्या क्रमांकावर असलेल्या जाँगकोल्फन कितिथाराकुल व रविंदा प्रजोंगजय या जोडीचा २१-१६, १८-२१, २१-१६ असा पराभव केला. या जोडीने प्रतिस्पर्ध्यांचा चांगला अभ्यास करून कोर्टवर रणनीती आखली होती आणि सुरुवातीचा गेम जिंकण्यासाठी आलेल्या प्रत्येक संधीवर आक्रमण करण्याच्या त्यांच्या स्पष्ट गेम प्लॅनसह सुरुवात केली. मात्र, थाई जोडीच्या उत्कृष्ट बचावामुळेच त्यांना सामन्यात पुनरागमन करण्यात मदत मिळाली. भारतीयांकडून काही चुका झाल्या. मात्र, गायत्री व ट्रीसा यांना श्रेय द्यायला हवे. त्यांनी ६-१० असा पिछाडीवरून गेम १४-१४ असा आणला. त्यानंतर १५-१५ अशा बरोबरीत असताना सलग पाच गुणांची कमाई करून बाजी मारली.

अश्मिता चालिहाला थायलंडच्या बुसानान आँग्बाम्रुंगफानकडून १४-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर महिला दुहेरीत प्रिया कोंजेंग्बाम व श्रुती मिश्रा यांना थायलंडच्या बेन्यापा व नुंताकर्न ऐम्सार्ड जोडीकडून हार पत्करावी लागल्याने हा सामना निर्णायक लढत पर्यंत गेला. 

१७ वर्षीय अनमोलवर भारतीयांच्या अपेक्षांचे ओझं होते. पण तिने पोर्नपिचा चोएईकिवाँगविरुद्ध सावध खेळ केला आणि ती ४-६ अशा पिछाडीवर होती, परंतु तिने हळुहळू सामन्यात पुनरागमन केले आणि त्यानंतर तिला रोखणे थायलंडच्या खेळाडूला अवघड गेले. अनमोलने २१-१४, २१-९ असा विजय मिळवून भारताला जेतेपद जिंकून दिले.
 
महिला फायनल - भारत वि. वि. थायलंड ३-२ ( पी व्ही सिंधू वि. सुपानिदा काटेथाँग २१-१२, २१-१२; ट्रीसा जॉली/गायत्री गोपिचंद वि. वि. जाँगकोल्फन कितिथाराकुल व रविंदा प्रजोंगजय २१-१६, १८-२१, २१-१६; अश्मिता चालिहा पराभूत वि. बुसानान आँग्बाम्रुंगफान ११-२१, १४-२१; प्रिया कोंजेंग्बाम व श्रुती मिश्रा पराभूत वि. बेन्यापा व नुंताकर्न ऐम्सार्ड ११-२१, ९-२१; अनमोल खरब वि. वि. पोर्नपिचा चोएईकिवाँग २१-१४, २१-९)

Web Title: Indian women's badminton team's historic run won the match in the Asia Team Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.