चक दे इंडिया! भारतीय संघाकडून पाकिस्तानचे वस्त्रहरण; इतिहासातील सर्वात मोठा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 08:01 PM2023-09-30T20:01:31+5:302023-09-30T20:02:05+5:30

IND vs PAK Hockey at Asian Games 2023 : भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर वैरी आज तीन वेगवेगळ्या खेळांत समोरासमोर आले आणि तिन्ही मैदानावर भारतीयांनी बाजी मारली.

IND vs PAK Hockey at Asian Games 2023 : India beat Pakistan 10-2 in Hockey which assures us a semi-final berth,  THIS IS THE HIGHEST MARGIN IN ASIAN GAMES HISTORY for an IND vs PAK match  | चक दे इंडिया! भारतीय संघाकडून पाकिस्तानचे वस्त्रहरण; इतिहासातील सर्वात मोठा विजय

चक दे इंडिया! भारतीय संघाकडून पाकिस्तानचे वस्त्रहरण; इतिहासातील सर्वात मोठा विजय

googlenewsNext

IND vs PAK Hockey at Asian Games 2023 : भारत-पाकिस्तान हे दोन कट्टर वैरी आज तीन वेगवेगळ्या खेळांत समोरासमोर आले आणि तिन्ही मैदानावर भारतीयांनी बाजी मारली. आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये पुरुषांच्या स्क्वॉश फायनलमध्ये थरारक लढतीत भारताने २-१ अशा फरकाने पाकिस्तानला नमवून गोल्ड मेडल जिंकले. त्यानंतर सायंकाळी हॉकीत साखळी फेरीत पाकिस्तानचे वस्त्रहरण केले. तेच दुसरीकडे नेपाळमध्ये सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघाने पाकिस्तानला नमवून जेतेपद नावावर केले. 


भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना कोणत्याही मैदानावर असो, त्याची उत्सुकता दोन्ही देशांतील लोकांना असतेच.. पुरुष हॉकीतील अ गटाच्या आजच्या सामन्यातही तशीच ठस्सन पाहायला मिळाली. भारताने ८व्या मिनिटाला मनदीप सिंगच्या गोलच्या जोरावर आघाडी घेतली. १०व्या मिनिटाला पाकिस्तानचा गोलरक्षक अकमल हुसेन याने चुकीच्या पद्धतीने भारतीय खेळाडूला पाडले अन् रेफरींनी त्वरित पेनल्टी स्ट्रोक दिला. पाकिस्तानी खेळाडूंनी यासाठी व्हिडीओ रेफरल घेतला, परंतु त्याचा काहीच उपयोग नाही झाला. ११ व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर केले अन् भारताला पहिल्या क्वार्टरमध्ये २-० अशी आघाडी मिळवून दिली.


दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला हरमनप्रीत कौरने १७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून पाकिस्तानला सपशेल बॅकफूटवर फेकले. भारताचा बचावही तितकाच अप्रतिम दिसला. त्यानंतर ३०व्या मिनिटाला सुमितने भन्नाट गोल करून भारताला पहिल्या हाफमध्ये ४-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानी खेळाडूंकडे गोल करण्याच्या संधी मिळण्याची वाट पाहण्यापलिकडे काहीच उरले नव्हते. त्यात तिसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीत सिंगने ३३ व ३४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून दोन गोल केले अन् ही आघाडी ६-० अशी भक्कम केली.

३८व्या मिनिटाला सुफियान खानने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून पाकिस्तानचे खाते उघडले. ४१व्या मिनिटाला वरुण कुमारच्या अप्रतिम गोलने पाकिस्तानच्या पुनरागमनाच्या आशा पूर्णपणे मावळून टाकल्या.  अब्दुल राणाने ४५व्या मिनिटाला पाकिस्तानसाठी दुसरा गोल केला. चौथ्या क्वार्टरमध्येही भारताची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आणि शमशेर सिंग ( ४६ मि.), ललित उपाध्याय ( ४९ मि.) व वरुण कुमार ( ५४ मि.) यांच्या गोलने भारताला १०-२ असा विजय मिळवून दिला. या विजयासोबतच भारताने उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारताने ३ सामन्यांत एकूण ४२ गोल्स केले. आजचा हा विजय भारत-पाकिस्तान सामन्यातील सर्वात मोठा विजय ठरला. यापूर्वी भारताने ६ गोल्सच्या फरकाने पाकिस्तानला नमवले होते.  


फुटबॉलमध्ये बाजी...
भारतीय संघाने १९ वर्षांखालील सॅफ अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानला ३-० असे लोळवून जेतेपद पटकावले. पहिला हाफ गोलशून्य सुटल्यानंतर मांग्लेंनथांग किपगेनने ( ६२ व ८५ मि.) दोन गोल केले आणि त्यात ९०+४ मिनिटाला जी गोयारीने गोल करून भारताचा विजय निश्चित केला. 

Web Title: IND vs PAK Hockey at Asian Games 2023 : India beat Pakistan 10-2 in Hockey which assures us a semi-final berth,  THIS IS THE HIGHEST MARGIN IN ASIAN GAMES HISTORY for an IND vs PAK match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.