जगाला मिळाला नवा युसेन बोल्ट, 60 मीटरमध्ये रचला विश्वविक्रम 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 09:58 AM2018-01-20T09:58:33+5:302018-01-20T11:05:00+5:30

वाऱ्याच्या वेगाने धावणारा जमैकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट निवृत्त झाल्यानंतर, ट्रॅक अँड फिल्डवरचा नवा हिरो कोण, याबद्दल तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. त्या सगळ्यांना आता नवा 'युसेन बोल्ट' सापडला आहे.

Christian Coleman breaks 60m indoor world record with time of 6.37 | जगाला मिळाला नवा युसेन बोल्ट, 60 मीटरमध्ये रचला विश्वविक्रम 

जगाला मिळाला नवा युसेन बोल्ट, 60 मीटरमध्ये रचला विश्वविक्रम 

Next

क्लेमसन, दक्षिण कॅरोलिनाः वाऱ्याच्या वेगाने धावणारा जमैकाचा विश्वविक्रमी धावपटू युसेन बोल्ट निवृत्त झाल्यानंतर, ट्रॅक अँड फिल्डवरचा नवा हिरो कोण, याबद्दल तमाम क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. त्या सगळ्यांना आता नवा 'युसेन बोल्ट' सापडला आहे आणि तो आहे अमेरिकेचा सुस्साट धावपटू क्रिस्टियन कोलमन. 60 मीटरची इनडोअर शर्यत अवघ्या 6.37 सेकंदांत पूर्ण करून त्यानं नव्या विश्वविक्रमाची नोंद केली आहे. स्वाभाविकच, आता तो 100 मीटर आणि 200 मीटरमध्ये काय किमया करतो, याकडे सगळ्यांच्या लक्ष लागलंय. 

अमेरिकेचाच धावपटू मॉरिस ग्रीनने दोन वेळा 60 मीटरची शर्यत 6.39 सेकंदांत पूर्ण केली होती. 1998 मध्ये त्याने हा विक्रम रचला होता. त्यानंतर, तब्बल 20 वर्षांनी तो मोडण्याचा पराक्रम अमेरिकेच्याच क्रिस्टियन कोलमननं करून दाखवलाय. 

21 वर्षीय कोलमनने गेल्या वर्षी यूएस इनडोअर स्पर्धेदरम्यान जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं. 100 मीटरची शर्यत 9.82 सेकंदांत पूर्ण करत त्याने आपली क्षमता दाखवून दिली होती. आणखी थोडी मेहनत घेतल्यास तो युसेन बोल्टच्या विक्रमाच्या जवळ जाऊ शकतो किंवा तो विक्रम मोडूही शकतो, असं अनेकांना वाटलं होतं. त्या दिशेनं त्याची वाटचाल सुरू असल्याचे संकेत या 60 मीटर शर्यतीने दिले आहेत. 

दक्षिण कॅरोलिना येथील क्लेमसन युनिव्हर्सिटीत ही स्पर्धा झाली. अंतिम फेरीच्या 2 तास आधी झालेल्या फेरीत कोलमननं 6.47 सेकंदांत 60 मीटरचं अंतर पूर्ण केलं होतं. पण, अंतिम फेरीत सगळं तंत्र जुळून आलं आणि कोलमन नवा विक्रमवीर ठरला. 



अमेरिकेच्या अॅथलेटिक्स विश्वात कोलमनची तुलना जस्टिन गॅटलिनशी होऊ लागलीय. गेल्या वर्षी लंडन इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत गॅटलिन अजिंक्य ठरला होता. बोल्टच्या 'सोनेरी' कारकीर्दीतील ही शेवटची स्पर्धा होती आणि नेमकी इथेच त्याला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती. बोल्टने 9.95 सेकंदांत ही शर्यत पूर्ण करून कांस्य पदक जिंकलं होतं. या स्पर्धेत कोलमननं रौप्य पदकावर नाव कोरलं होतं. त्याने 9.94 सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली होती. त्याचा हा वेगाने उंचावणारा आलेख बघता, तो ट्रॅक अँड फिल्डचा भावी बादशहा ठरू शकतो.     

दरम्यान, वेगाचा बादशहा युसेन बोल्टने 2009 मध्ये बर्लिन इथल्या जागतिक स्पर्धेत विश्वविक्रम रचला होता. 100 मीटरची शर्यत त्याने 9.58 सेकंदांत जिंकली होती. त्यासोबतच, 200 मीटरचं अंतर 19.19 सेकंदांत पूर्ण करण्याची 'न भुतो' कामगिरीही त्याने करून दाखवली होती. आता कोलमनला हे दोन विक्रम नक्कीच खुणावत असतील. 

Web Title: Christian Coleman breaks 60m indoor world record with time of 6.37

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा