पनवेल-जेएनपीटीदरम्यान जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:12 PM2019-05-27T23:12:26+5:302019-05-27T23:12:30+5:30

पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहे.

The water leakage between the Panvel-JNPT | पनवेल-जेएनपीटीदरम्यान जलवाहिनीला गळती

पनवेल-जेएनपीटीदरम्यान जलवाहिनीला गळती

Next

- वैभव गायकर
पनवेल : पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. अनेक वेळा दुरुस्ती करून देखील जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने ती फोडली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांत एकीकडे भीषण पाणीटंचाई असताना, लाखो लीटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पनवेल शहरातून जेएनपीटीकडे एमजेपीची जलवाहिनी गेली आहे. पनवेल शहर कोळीवाडा परिसरातून करंजाडे, पारगाव, दापोली, विठ्ठलवाडी, चिंचपाडा तलाव या सुमारे ६ ते ७ किमीच्या अंतरावर अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने अक्षरश: पाण्याचे कारंजे उडत आहेत. ही जलवाहिनी जुनी झाली असून जीर्ण झाली आहे. तिला काही ठिकाणी गळती लागली आहे तर काही ठिकाणी ती जाणूनबुजून फोडण्यात येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. तसेच झोपडपट्टीवासीय, टँकरमाफियांकडून याठिकाणी सर्रास पाणीचोरी केली जाते.
दिवसाढवळ्या पाणीचोरी करण्यात येत असली तरी याला आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.
विशेष म्हणजे, ही जलवाहिनी पनवेल शहरातून आली असून शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणीही अल्पदाबाने अपुऱ्या प्रमाणात असते. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. असे असताना जलवाहिनीतून दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असूनही योग्य उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पनवेल- जेएनपीटी परिसरातील सुमारे सहा किलोमीटरच्या अंतरावर २० पेक्षा जास्त ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. संबंधित जलवाहिनी अमृतयोजनेंतर्गत नव्याने बांधली जाणार आहे. त्या योजनेला मंजुरीही मिळाली आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अशाच प्रकारे पाण्याची नासाडी होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

>शटडाउन घेऊन गळती दुरुस्ती करणार
पनवेल ते जेएनपीटी दरम्यान ६ किमीच्या जलवाहिनीपैकी ९० टक्के जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे तिला वारंवार गळती लागते. सोमवारी शटडाऊन घेऊन गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. अनेकदा जाणूनबुजूनही जलवाहिनी फोडण्यात येत असल्याने त्यावरही उपाययोजना करण्यात येतील. याशिवाय टँकरमाफियांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाचे मुख्य मुख्य कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांनी दिली.

Web Title: The water leakage between the Panvel-JNPT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.