नवी मुंबई : गेल्या काही वर्षांत सौरऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढला आहे, पण नवीन पिढीला शालेय जीवनापासून सौरऊर्जेविषयी माहिती आणि ऊर्जा वापरण्याचे प्रशिक्षण दिल्यास, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी बॉम्बेने ‘सोलर ऊर्जा थ्रू लोकलायझेशन फॉर सस्टेंनॅब्लिटी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रायगड येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ४०० विद्यार्थ्यांना सौरऊर्जा वापराचे प्रशिक्षण दिले आहे.
देशातील ग्रामीण भागात अजूनही लोडशेडिंग आहे. विजेची तूट असल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात अनेकदा व्यत्यय येतो. त्यामुळे आयआयटी बॉम्बेने सौरऊर्जेवर चालणारे दिवे तयार केले आहेत. ग्रामीण भागात या दिव्यांद्वारे सौरऊर्जेविषयी जनजागृती करून त्याचा वापर वाढावा, म्हणून आयआयटी बॉम्बेने उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी आणि सातवीच्या ४०० विद्यार्थ्यांना सौरऊर्जेविषयी प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये पारंपरिक वापरात येणारी वीज आणि सौरऊर्जेतून निर्माण होणारी वीज याविषयी माहिती देण्यात आली, तसेच सौरऊर्जेचे फायदे, उपयोग, तांत्रिक माहिती, सौर उपकरणांचा वापर याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
सौरदिवे लावून दिल्यावर त्याची देखभालही महत्त्वाची आहे. त्यामुळे या दिव्यांची देखभाल करण्यासाठी सौरऊर्जेची प्रयोगशाळादेखील गावांमध्ये उभी करण्यात येणार असल्याचेही आयआयटीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या प्रयोगशाळांमध्ये नवीन संशोधन करण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे मत, एनर्जी सायन्स विभागाचे प्रा. चेतन सोलंकी यांनी सांगितले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.