तस्करीचे धागेदोरे उत्तरप्रदेशपर्यंत, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मुख्य पुरवठादारास अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:04 AM2017-12-13T03:04:59+5:302017-12-13T03:05:06+5:30

अमली पदार्थ विरोधी पथकाने ऐरोलीमध्ये ३१ लाख ५० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या गुन्ह्याचे धागेदोरे उत्तरप्रदेशपर्यंत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Trafficking: Uttar Pradesh, major anti-drug squad operations, main supplier arrested | तस्करीचे धागेदोरे उत्तरप्रदेशपर्यंत, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मुख्य पुरवठादारास अटक 

तस्करीचे धागेदोरे उत्तरप्रदेशपर्यंत, अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मुख्य पुरवठादारास अटक 

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने ऐरोलीमध्ये ३१ लाख ५० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या गुन्ह्याचे धागेदोरे उत्तरप्रदेशपर्यंत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अमली पदार्थांचा पुरवठा करणा-या कैसर अमीन खानला पोलिसांनी मूळ गावातून अटक केली आहे. स्थानिकांचा विरोध डावलून पोलिसांनी कौशल्याने आरोपीला पकडून नवी मुंबईत आणल्याने पथकाच्या धाडसाचेही कौतुक होवू लागले आहे.
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जून २०१६ पासून विशेष कारवाई सुरू केली आहे. दीड वर्षामध्ये ५० पेक्षा जास्त आरोपी गजाआड केले आहेत. आयुक्त, सहआयुक्त यांच्याबरोबर गुन्हे शाखेचे उपआयुक्त तुषार दोशी, अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राणी काळे यांच्या पथकाने सहा महिन्यांपासून एम. डी. पावडरची तस्करी करणाºया आरोपींवर पाळत ठेवण्यास सुरवात केली होती. १५ नोव्हेंबरला ऐरोली रेल्वे स्टेशनबाहेर एम.डी. पावडरचा मोठा व्यवहार होणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे रेल्वे स्टेशनच्या बाहेर ठाणे-बेलापूर रोडवर सापळा रचण्यात आला होता. येथे एम.डी. पावडर विकण्यासाठी आलेल्या अफताब सिद्दीकी याला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. यावेळी दुसरा आरोपी सचिन पाटील ऊर्फ जठार व अलोक सोनी हे दोघे पळून गेले. अटक केलेल्या आरोपीकडे ३१ लाख ५० हजार रूपये किमतीचे साडेचार किलो एमडी पावडर व गुन्ह्यासाठी वापरलेली कार हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी पळून गेलेल्या सचिन पाटीललाही अटक केली. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांना उत्तरप्रदेशमध्ये राहणाºया कैसर अमीन खान याने एम.डी. पावडर पुरवली असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या पथकाने या आरोपीविषयी माहिती घेतली व वरिष्ठांच्या परवानगीने थेट उत्तरप्रदेश गाठले. तेथे मूळ गावातून त्याला अटक केली आहे. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचाही गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिकांनी अटक करण्यासाठी व त्याला नवी मुंबईत घेवून येण्यासाठी पोलिसांना विरोध केला होता. त्या विरोधाला न जुमानला पोलीस पथकाने त्याला अटक करून येथे आणला असून सद्यस्थितीमध्ये तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. अमली पदार्थाच्या गुन्ह्यात प्रथमच परराज्यात जावून आरोपीला अटक करण्यात आली असल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईमध्ये राणी काळे यांच्यासोबत अमित गोळे, संजय चौधरी, सलीम इनामदार, इकबाल शेख, संतोष गायकवाड, कासम पिरजादे, रमेश उटगीकर, संजयसिंग ठाकूर, सचिन भालेराव, राजेश गाढवे, अमोल कर्डीले, सुप्रिया ठाकूर, आकाश मुके व बाबासाहेब सांगोळकर यांचा सहभाग होता.

फिल्मी स्टाईल कारवाई
उत्तरप्रदेशमध्ये आरोपी कैसर खानला पकडण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. परंतु तेथील राजकीय व इतर हस्तकांनी आरोपीला मुंबईत घेवून जाण्यास विरोध केला. मुंबईत घेवून कसे जाता हेच आम्ही पाहतो असे आव्हान देण्यात आले होते. परंतु या आव्हानाला न जुमानला पोलिसांनी खासगी वाहनामध्ये आरोपीला बसविले. विरोध होवू नये यासाठी लखनऊ व कानपूर रेल्वे स्टेशन ऐवजी दूरचे उरई रेल्वे स्टेशन गाठले व तेथून रेल्वेने त्याला नवी मुंबईत आणले. यामुळे अमली पदार्थाच्या गुन्ह्यात प्रथमच मुख्य पुरवठादाराला गजाआड करण्यात यश मिळाले आहे.

- आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर एमडी पावडर विक्रीचे सर्वाधिक ९ गुन्हे गत एका वर्षामध्ये दाखल झाले असून, ५८ लाख १४ हजार रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली आहे.
- रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून राफे ऊर्फ रफिक कदीर खान व आरफात शकील काझी या दोघांना सप्टेंबर २०१६मध्ये अटक करून, १७५ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली.
- सीबीडीमध्ये शन्नू रमजान शेखकडून १२७ ग्रॅम मेथॅक्युलोन (आईस रॉक) जप्त केले. कोपरखैरणेमधून बेन्समिन चिबुके इमॅन्युअल या नायजेरियन नागरिकाकडून २२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली.
- नेरुळमधून अझिथा बेगम अब्दुल मुथलिफ शेखकडून ३० लाख रुपये किमतीचे मॅफेड्रिन हस्तगत केले.
- बिलाल ऊर्फ सलमान अब्दुल रज्जाक पटेलकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केले.
- फरमान जहुर सैनकडून १५१ ग्रॅम, मोहम्मद साबीर मोहम्मद याकुब शेखकडून ६० ग्रॅम एमडी जप्त केले.
- शोयेब हनिफ खानकडून १०० ग्रॅम, युगोचुकू जॉन नेयाडी या नायजेरियनकडून २५ ग्रॅम एमडी जप्त केले.
- गॅरी ओकाफोरकडून
१७८ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात यश मिळविले.

ऐरोलीमध्ये सापळा रचून तब्बल ३१ लाख ५० हजार रूपये किमतीची एमडी पावडर व कार जप्त केली आहे. वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई आहे. आतापर्यंत तिघांना अटक केली असून पळून गेलेल्या एक आरोपीचा शोध सुरू आहे.
- सुनील बाजारे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
अमली पदार्थ विरोधी पथक

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एमडी पावडर विकणाºया टोळीला अटक करण्यात यश आले आहे. वर्षभरातील सर्वात मोठा साठा जप्त केला असून मुख्य आरोपीला उत्तरप्रदेशमधून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
- राणी काळे,
पोलीस उपनिरीक्षक

Web Title: Trafficking: Uttar Pradesh, major anti-drug squad operations, main supplier arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक