नवी मुंबई : पालिका प्रशासनाने ‘फिफा’च्या नियोजनातून समितीला डावलल्याच्या कारणावरून क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती विशाल डोळस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला आहे. यामुळे ‘फिफा’चे सामने सुरू होण्यापूर्वीच प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असे चित्र तयार झाले आहे.

शुक्रवारपासून शहरात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फिफा’च्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाचे अधिकारी लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. अशातच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती यांनी पदाचा राजीनामा दिल्याची बाब समोर आली आहे. प्रशासन व आयुक्त यांच्याप्रति नाराजी व्यक्त करत, त्यांनी हे राजीनामा पत्र आयुक्तांकडे सुपूर्द केले आहे. ‘फिफा’चे सामने नवी मुंबईत घेण्याचे ठरल्यापासून प्रशासनाने पालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीला त्यापासून अलिप्त ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंबंधी त्यांनी प्रशासनाला पत्र देऊनही आपली नाराजी व्यक्त केली होती.

मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नसल्याचीही खंत डोळस यांनी व्यक्त केली आहे. त्याशिवाय समितीशी संबंधित विषयांचे प्रस्ताव समितीपुढे मांडले जात नाहीत. यामुळे समितीचे नेमके अधिकार काय? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे समितीच्या सभा ठरवूनही विषयांअभावी सभेच कामकाज गुंडाळावे लागत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे समितीच्या सभांवर तरी प्रशासन अनावश्यक खर्च करते कशाला? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी राजीनामा दिला आहे.