सुधागड संवर्धनासाठी शिवप्रेमी एकवटले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 02:13 AM2019-01-08T02:13:20+5:302019-01-08T02:13:45+5:30

गड घेतला दत्तक : श्रमदानातून ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी; बा रायगड परिवारचा पुढाकार

Sivapremi concentrated for Sudhagad culture | सुधागड संवर्धनासाठी शिवप्रेमी एकवटले

सुधागड संवर्धनासाठी शिवप्रेमी एकवटले

Next

नामदेव मोरे 

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील सुधागड किल्ला संवर्धनासाठी शिवप्रेमींनी दत्तक घेतला आहे. बा रायगड परिवार संस्थेच्या शिलेदारांनी दोन वर्षांपासून ग्रामस्थ, वनविभाग व भोराईदेवी संस्था यांच्यासह सर्वांना विश्वासात घेऊन विकासकामे सुरू केली आहेत. महादरवाजासह ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई करण्यात आली आहे. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता केली आहे. सर्वत्र माहिती फलक लावण्यात आले असून कोसळलेले महादेव मंदिर उभारण्याचे कामही सुरू केले आहे.

गड, किल्ले हे महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. परंतु पुरातत्व विभाग व शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक किल्यांचे खंडरात रूपांतर झाले आहे. सरकार ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी काहीच करत नाही अशी ओरड सर्वत्र होताना दिसत असते. बा रायगड परिवार संस्थेमधील शिवप्रेमींनी कोणालाही दोष न देता दोन वर्षांपासून सुधागड किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेतला आहे. संस्थेचे शिलेदार प्रत्येक शनिवारी रात्री गडावर पोहचतात. रविवारी दिवसभर श्रमदान करून ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई व डागडुजी करत आहेत. गडावर पोहचण्याच्या दोन्ही मार्गावर सूचना फलक प्रसिद्ध केले आहेत. गडावरील तलाव, पाण्याच्या टाक्या, टकमक टोक, भोरेश्वर, महादेव , हनुमान व इतर मंदिरे, पंतसचिवांचा वाडा व सर्व ठिकाणे कोणत्या दिशेला आहेत याचे फलक लावण्यात आले आहेत. पाच्छापूर गावातून गडावर गेल्यानंतर पहिल्याच बुरुजामध्ये एक मोठी खोली तयार करण्यात आली होती. त्यामध्ये दगड, माती जावून बुजली होती. तरुणांनी सर्व घाण काढून ती मोकळी केली आहे. महादरवाजामध्येही दगड व मातीचा खच पडला होता. दरवाजामधून आत येण्यासही अडथळा निर्माण होत होता. श्रमदानातून येथील माती व दगडांचा भराव काढण्यात आला आहे. गडावर शिवजयंतीला मोठा उत्सव आयोजित करण्यात येतो. यावेळी मशाल महोत्सवामध्ये शेकडो तरुण सहभागी होत असतात.

गडावरील महादेव मंदिराची दुरवस्था झाली होती. मंदिर पडले असून उघड्यावर महादेवाची पिंड होती. बा रायगड परिवार संस्थेमधील तरुणांनी पाच्छापूर ग्रामस्थ, भोराईदेवी संस्थान व वनविभागाची परवानगी घेऊन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू केला आहे. मंदिर उभारणीसाठी गडावरील माती व दगडांचा वापर केला जात आहे. काही प्रमाणात सिमेंट व वाळू लागत असून ती ठाकूरवाडी गावातून दोन तासांचा गड चडून वर आणावे लागत आहे. यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घेतली जात आहे. मंदिर आकारास येऊ लागले आहे. दोन वर्षे सातत्याने गड संवर्धनाचे काम सुरू असून या अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. संस्थेच्यावतीने परिसरातील शाळांमध्ये सायकल वाटपही करण्यात आले आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नामुळे गडाला भेट देणाºयांची संख्याही वाढली आहे.

सुधागडचे ऐतिहासिक महत्त्व
सुधागड हा देशातील प्राचीन किल्ल्यांमधील एक आहे. या परिसरातील ठाणाळे लेणी २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यामुळे सुधागडही तेव्हापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. १६४८ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला. गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावामध्ये छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबचा मुलगा अकबर यांची भेट झाली होती. हा किल्ला म्हणजे भोर संस्थानचे वैभव समजले जाते. याला पूर्वी भोरपगड असेही म्हणत. गडावर शेकडो वर्षांपासून भोराई देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

साहित्य गडावर नेण्याची कसोटी
गडावरील मंदिराचे व इतर दुरुस्तीचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य ठाकूरवाडी गावातून दोन तासांचा डोंगर चढावा लागत आहे. मंदिरावरील छतासाठी पत्रे व लोखंडही गडावर घेऊन जावे लागणार आहे. यासाठी जास्तीत जास्त शिवप्रेमींना श्रमदानासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन वर्षे सर्व संकटावर मात करून तरुण संवर्धनाचे काम करत आहेत. बा रायगड परिवार संस्थेच्या फेसबुक पेजवरून संपर्क नंबर घेऊन अनेक तरुण या मोहिमेमध्ये सहभागी होऊन संवर्धनाच्या कामात योगदान देत आहेत.

बा रायगड परिवार संस्था महाराष्ट्रभर दुर्गसंवर्धनाचे काम करत आहे. दोन वर्षांपासून सुधागड किल्ला विकासासाठी दत्तक घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थ, वनविभाग, भोराईदेवी संस्था व किल्ल्याशी संबंधित सर्वांचे चांगले सहकार्य लाभत आहे. सर्वांना सोबत घेवून वास्तूंची देखभाल व मंदिर उभारणीपासून सूचना फलकापर्यंत सर्व कामे केली जात आहेत.
- चैतन्य भालेराव,
उपाध्यक्ष,
बा रायगड परिवार

शिवप्रेमी तरुण व नागरिकांच्या मदतीने दोन वर्षांपासून सुधागड संवर्धन मोहीम सुरू आहे. या मोहिमेमध्ये अनेक तरुण सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. याठिकाणी शिवजयंती उत्सव सुरू केला असून त्यावेळीही शेकडो तरुण उपस्थित रहात असतात. या अभियानामध्ये जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी व्हावे.
- रूपेश शेळके,
मुख्य कार्यकारिणी सदस्य,
बा रायगड परिवार

Web Title: Sivapremi concentrated for Sudhagad culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.