रेल्वेफाटकावरचा ‘तो’ रस्ता बेकायदेशीरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:07 PM2018-11-25T23:07:46+5:302018-11-25T23:07:57+5:30

रेल्वेला उशिरा आली जाग : मार्ग बंद करण्याच्या प्रयत्नामुळे परिसरात तणाव

that road was illegal | रेल्वेफाटकावरचा ‘तो’ रस्ता बेकायदेशीरच!

रेल्वेफाटकावरचा ‘तो’ रस्ता बेकायदेशीरच!

Next

नवी मुंबई : रेल्वेने बसला धडक दिल्याच्या घटनेनंतर तिथला वाहनांचा मार्ग बेकायदेशीर असल्याचा दावा रेल्वेने केला आहे, यामुळे रेल्वेकडून सदर रस्ता बंद करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जुईनगरमधील रहिवाशांना जुईनगर स्थानकाकडे येण्याचा हा सोयीस्कर ऐकमेव मार्ग असल्याने तो बंद झाल्यास नागरिकांची गैरसोय होणार आहे.


कारशेडच्या रेल्वेमार्गावरील जुईनगर येथील रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्या ठिकाणी रेल्वेची ये-जा सुरू असतानाही रेल्वेसमोरून वाहने पळवण्याचे प्रकार घडत असल्याने अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून शनिवारी दुपारी त्या ठिकाणी रेल्वेची एनएमएमटी बसला धडक बसली. यामुळे त्या ठिकाणी फाटक बसवण्याची नागरिकांची मागणी असतानाच तो रस्ताच बेकायदेशीर असल्याचा दावा रेल्वेने केला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने शनिवारी रात्रीच त्या ठिकाणचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला, याकरिता जेसीबीने रस्ता खोदण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे काम थांबवून रविवारी त्या ठिकाणी दोन्ही बाजूला रंबलर बसवण्यात आले.


जुईनगरच्या रहिवाशांना सानपाडा अथवा जुईनगर स्थानकाकडे येण्याचा तो एकमेव सोयीस्कर मार्ग आहे. १९८० च्या दरम्यान त्या ठिकाणी स्थानिकांच्या सोयीसाठी छोटासा पूल उभारण्यात आला होता. कालांतराने परिसराचा विकास होत असताना मात्र तिथला रस्ता आराखड्यावर घेण्याचा प्रशासनाला विसर पडला असावा. त्यानंतर सुमारे १५ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी कारशेडचा रेल्वेमार्ग आल्यानंतरही हा मार्ग वापरात होता. त्याच वेळी रेल्वेने अथवा सिडको किंवा पालिकेने त्या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक होते.
काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींनी महासभेकडे मांडलेला प्रस्ताव मंजूर होऊनही पूल अद्याप कागदावरच असल्याची खंत व्यक्त होत आहे.

 

कारशेडमध्ये ये-जा करणाºया रेल्वेच्या धडकेने होणारे अपघात टाळण्यासाठी क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारणीची मागणी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार मांडलेल्या ठरावाला सभागृहाने सप्टेंबर २०१५ मध्ये मंजुरी देखील दिलेली आहे. परंतु परवानगीच्या लालफितीत अडकल्याने पूल उभारणीचा लांबत चाललेला निर्णय जीवघेणा ठरत आहे.
-तनुजा मढवी, स्थानिक नगरसेविका (प्रभाग-८३)

जुईनगरच्या फाटकाच्या ठिकाणी ग्रामपंचायतकालीन पूल होता. कारशेडचा रेल्वेरुळ आल्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आला नाही. यामुळे नागरिकांना रहदारीसाठी एकमेव सोयीस्कर असलेला रुळावरील मार्ग वापरावा लागत आहे. तो बंद झाल्यास गैरसोय होणार आहे.
- जयेश मढवी, स्थानिक ज्येष्ठ रहिवासी

Web Title: that road was illegal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.