करंजाडेतील रिक्षाचालकांचा बससेवा सुरू करण्याला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:28 AM2019-06-12T02:28:38+5:302019-06-12T02:29:00+5:30

स्थानिकांमध्ये नाराजी : ओनर्स असोसिएनशनने बससेवेची मागणी घेतली मागे

Resistance to the introduction of bus operators in Karanjad | करंजाडेतील रिक्षाचालकांचा बससेवा सुरू करण्याला विरोध

करंजाडेतील रिक्षाचालकांचा बससेवा सुरू करण्याला विरोध

Next

पनवेल : नव्याने विकसित होत असलेल्या सिडकोच्या करंजाडे नोडमधील रहिवासी सध्या रिक्षाचालकांच्या दादागिरीमुळे त्रस्त आहेत. करंजाडेतून खांदेश्वर रेल्वे स्थानकाकडे जाणारी बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांवर आता हीच बससेवा नाकारण्याची वेळ आली आहे. रिक्षाचालकांनी बसला केलेल्या विरोधामुळे करंजाडे ओनर्स असोसिएशनने बसचा आग्रह सोडल्याचे पाहावयास मिळाले आहे.

करंजाडे नोडमध्ये नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. याठिकाणी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने स्थानिक ओनर्स असोसिएशनने खांदेश्वर ते करंजाडे अशी बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. याठिकाणी बससेवा सुरू करण्याच्या दृष्टीने एनएमएमटीने सर्वेक्षणही सुरू केले. मात्र सर्वेक्षणादरम्यान स्थानिक रिक्षाचालकांनी विरोध करून सर्वेक्षण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बस सुरू झाल्यास स्थानिक रिक्षाचालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे ही नवी बससेवा सुरू करायची नाही असा पवित्रा करंजाडेतील रिक्षा चालकांनी घेतला. यातून तोडगा काढण्यासाठी रविवारी रिक्षा युनियन व करंजाडे नोड ओनर्स असोसिएशन यांच्यात बैठक झाली. बैठकीत नागरिकांच्या बसवाहतुकीच्या पर्यायाला स्थानिक रिक्षाचालकांनी विरोध केला. स्थानिकांच्या विरोधामुळे करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी अखेर बससेवा सुरू करण्याची मागणी मागे घेतली. मात्र या निर्णयामुळे येथील रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

कामोठे शहरातही अशाच प्रकारे एनएमएमटी बससेवा सुरू करताना स्थानिक रिक्षा चालकांनी विरोध दर्शविला होता. यावेळी मोठा संघर्ष निर्माण झाला होता. शेवटी पोलीस बंदोबस्तात ही बससेवा सुरू करण्यात आली. यासंदर्भात सिटीझन युनिटी फोरमचे अरुण भिसे यांनी बससेवेला अशाप्रकारे कोणीही विरोध दर्शवू शकत नाही. रहिवाशांना जे सोयीचे आहे ती प्रवासी सेवा निवडणे त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्षाचालकांनी त्यांचा व्यवसाय करावा. मात्र रहिवाशांना बससेवा आवश्यक असताना अशाप्रकारे बससेवेला विरोध करणे चुकीचे आहे. राजकीय पक्षांनी येथील रहिवाशांच्या पाठीशी उभे राहून बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
- मदन केदार, रहिवासी, करंजाडे
 

Web Title: Resistance to the introduction of bus operators in Karanjad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.