सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 02:46 AM2018-05-15T02:46:37+5:302018-05-15T02:46:37+5:30

सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने भुयारी मार्गांचे काम अर्धवट ठेवले होते.

Repair of subway lines on Sion-Panvel highway | सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांची दुरुस्ती

googlenewsNext

नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने भुयारी मार्गांचे काम अर्धवट ठेवले होते. यामुळे प्रवाशांची गैरसोय होवू लागली होती. रस्ता ओलांडताना अपघात होण्याचे प्रमाणही वाढले होते. गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने चार भुयारी मार्गांची दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा दिला आहे.
महामार्गावरील वाहतूककोंडी व अपघात कमी करण्यासाठी राज्य शासनाने सायन - पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केले. रुंदीकरण केल्यानंतर खारघरमध्ये टोलनाकाही सुरू केला आहे. परंतु शासनाने छोट्या वाहनांना टोलमधून वगळल्यामुळे ठेकेदाराने शिल्लक कामे करण्यास नकार दिला. यामध्ये भुयारी मार्गांचाही समावेश आहे. नेरूळ ते उरण फाटा परिसरामध्ये चार भुयारी मार्ग आहेत. चारही भुयारी मार्गांची स्थिती गंभीर झाली होती. वर्षभर त्यामध्ये पाणी साचून रहात होते. कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले होते.
भुयारी मार्गांचा वापर करता येत नव्हता. फिफा सामन्याच्या दरम्यान महापालिका प्रशासनाने भुयारी मार्गांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वसाधारण सभेने ४३ लाख रूपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरीही दिली होती. उरणफाटा, एसबीआय कॉलनी व एलपी जंक्शनजवळील चार भुयारी मार्गांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला होता.
याविषयी निविदा प्रक्रिया पूर्ण करून पालिकेने भुयारी मार्गांमधील भिंतींना प्लास्टर बसविले आहे. छतास पॉली कार्बोनेट शिट, भिंतींना प्लास्टर व इतर कामे पूर्ण केली आहेत. भुयारी मार्गामध्ये विजेची सोय केली आहे. नेरूळमधील भुयारी मार्गामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. यामुळे अनेक वर्षांपासून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबली आहे.
>प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महामार्गावरील चार भुयारी मार्गांची दुरुस्ती करण्यात आली आहे. भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत.
- अंकुश चव्हाण,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Web Title: Repair of subway lines on Sion-Panvel highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.