धनगर आरक्षणासाठी आंदोलकांचा २४ तास ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:11 AM2019-03-01T00:11:58+5:302019-03-01T00:12:09+5:30

मुंबईत जाण्यास पोलिसांची मनाई : सानपाडा परिसराला छावणीचे स्वरूप; आंदोलकांनीही दाखविला संयम

Protester for 24 hours for moderate reservation | धनगर आरक्षणासाठी आंदोलकांचा २४ तास ठिय्या

धनगर आरक्षणासाठी आंदोलकांचा २४ तास ठिय्या

Next

नवी मुंबई : आरक्षणासाठी धनगर समाजाने काढलेला मोर्चा पोलिसांनी नवी मुंबईमध्ये अडविला. कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबईमध्ये जाण्यास मनाई केली. यामुळे २४ तास आंदोलकांनी नवी मुंबईमध्ये ठिय्या मांडला होता. कडक बंदोबस्तामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मागण्यांवर ठाम असलेल्या आंदोलकांनीही दिवसभर संयमाचे दर्शन घडविले व शासनाने मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.


महाडमधील चवदार तळे येथून धनगर आरक्षणासाठीचा लढा बुधवारी सुरू करण्यात आला. सुरुवातीपासूनच पोलिसांनी आंदोलकांना अटकाव करण्यास सुरुवात केली होती. महाडमध्ये प्रमुख नेत्यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर सायंकाळी पनवेलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आंदोलकांना अडविण्यात आले. नेत्यांना व प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलकांनी रास्ता रोखो केल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. बुधवारी सायंकाळी आंदोलक सानपाडामधील दत्तमंदिर परिसरामध्ये मुक्कामाला थांबले. गुरुवारी सकाळीच पोलिसांनी या परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवला. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर देशभर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, यामुळे आंदोलकांना मुंबईत जाण्यास पोलिसांनी मनाई केली होती. आंदोलनाचे नेते गोपीनाथ पडळकर व उत्तमराव जानकर यांनी पोलीस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सकाळी केला.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले. दिवसभर राज्यभरातून नागरिक आंदोलनामध्ये भाग घेण्यासाठी नवी मुंबईमध्ये येत होते. कोणत्याही स्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याचा दाखला मिळेपर्यंत मागे हटायचे नाही, असा निर्धार केला. यामुळे दिवसभर परिसरामध्ये तणावाचे वातावरण होते.


परिमंडळ एकचे उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांच्यासह मुंबईमधील पोलीस अधिकारी व कर्मचारीही बंदोबस्तासाठी बोलावण्यात आले होते. आंदोलकांना मुंबईत जाण्यापासून थांबविण्यात आले. यासाठी नेत्यांची व कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना देशातील स्थितीची माहिती देण्यात आली. आंदोलक मागण्यांवर ठाम असले, तरी त्यांनी दिवसभर संयमी भूमिका घेऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता घेतली. तब्बल २४ तास आंदोलकांनी नवी मुंबईमध्ये ठिय्या मांडला होता. आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेमुळे शासनाने मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलकांनी पाळली शिस्त
आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या आंदोलकांनी दिवसभर मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, याविषयी घोषणा केल्या. आक्रमक भूमिका घेतली असली तरी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली. मंदिर परिसरामध्ये कचरा होणार नाही. आंदोलनाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात होती.

Web Title: Protester for 24 hours for moderate reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.