माथाडी संघटनेमध्ये राजकीय फूट; नेत्यांमध्ये मतभिन्नता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:37 PM2019-03-12T23:37:13+5:302019-03-12T23:37:31+5:30

शशिकांत शिंदेंची सरकारवर टीका; नरेंद्र पाटील यांची आघाडीवर आगपाखड

Political divide in Mathadi organization; Contrasts among leaders | माथाडी संघटनेमध्ये राजकीय फूट; नेत्यांमध्ये मतभिन्नता

माथाडी संघटनेमध्ये राजकीय फूट; नेत्यांमध्ये मतभिन्नता

Next

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वात मोठ्या माथाडी कामगार संघटनेमध्ये राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपा सरकार कामगार विरोधी असल्याचा आरोप केला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी सरकारची बाजू घेऊन आघाडीवर टीकेची झोड उठविली आहे. ५५ वर्षांमध्ये प्रथमच संघटनेमध्ये दोन राजकीय भूमिका मांडण्यात आल्यामुळे नक्की कोणासोबत जायचे याविषयी कामगार संभ्रमात आहेत.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनमधील मतभेदामुळे कामगार वर्तुळामध्येही खळबळ उडाली आहे. ५५ वर्षांच्या वाटचालीमध्ये संघटनेने नेहमीच ठाम राजकीय भूमिका घेतली होती. प्रथम काँगे्रसच्या सोबत असलेली संघटना राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून त्यांच्या सोबत आहे. अनेक वेळा राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचाराची सुरवात माथाडी मेळाव्यापासून करण्यात येत होती. संघटनेच्या नेत्यांमध्ये अनेक विषयांवर मतभेद असले तरी राजकीय भूमिकेवर त्याचा फारसा कधी परिणाम झाला नव्हता. परंतु २०१४ च्या निवडणुकीमध्ये राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर संघटनेमध्येही राजकीय मतभेद सुरू झाले. १४ वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला.

मुख्यमंत्र्यांनीही कामगारांच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेवून संघटनेबरोबर जवळीक वाढविली. नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्षपद देवून त्यांना भाजपामध्ये घेतले. सातारा मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे निवडणुकीमधील भूमिकेवरून संघटनेमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
कळंबोलीमधील मेळाव्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे व कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी सरकारवर टीका केली आहे. माथाडी चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप करून कामगारांनी राष्ट्रवादी व काँगे्रसच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले आहे. नरेंद्र पाटील यांनी भाजपा सरकारवर टीका करताना जीभ सांभाळून बोलावे असा इशारा दिला आहे. राज्यातील सहा लोकसभा मतदार संघामध्ये माथाडी कामगारांची मते निर्णायक ठरणार आहेत. यामुळे शशिकांत शिंदे यांनी कामगारांची ताकद राष्ट्रवादी व काँगे्रसच्या मागे उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर टीका करण्यास सुरवात केली आहे. नरेंद्र पाटील हे स्वत: भाजपामधून निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांनी कामगारांनी भाजपाच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन केले आहे. यासाठी चार वर्षामध्ये सरकारने कामगारांचे कोणते प्रश्न सोडविले याची माहिती देण्यास सुरवात केली आहे. संघटनेमध्ये राजकारण सुरू असून गद्दार कोण हे कामगारांनी ओळखावे, असे आवाहन केले आहे. नेत्यांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय मतभेदामुळे संघटनेमध्येच पुन्हा फूट पडण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठीची भूमिका
माथाडी नेते शशिकांत शिंदे व गुलाबराव जगताप यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू केला आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी संघटनेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच सहकार्य केले आहे. भाजपा सरकारने माथाडी कामगारांच्या विरोधात भूमिका घेतली असल्याची टीका केली आहे. कामगार व कायद्याचे अस्तित्व धोक्यात असल्यामुळे आघाडीसोबत राहण्याचे आवाहन केले आहे.

भाजपासोबत जाण्याची कारणे
नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून भाजपा सरकारचे कौतुक केले. आघाडी सरकारने १४ वर्षांमध्ये वडाळ्यामधील घरे, माथाडी बोर्डामधील सदस्यांची नियुक्ती व इतर प्रश्न सोडविले नाहीत. काँगे्रसने कामगारांचे प्रश्न रखडविण्याचेच काम केल्याचा आरोप केला. भाजपा सरकारने चार वर्षामध्ये वडाळ्यातील घरांचा व इतर प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य केले आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी दिला आहे. माथाडी कायदा देशभर लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत. नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संघटना फुटण्याची भीती
माथाडी कामगार संघटनेमधील नेत्यांमध्ये अनेक विषयांवर मतभेद होत असतात. गटबाजीची चर्चा नेहमीच सुरू असते. परंतु आतापर्यंत राजकीय भूमिकेवरून मतभेद झाले नव्हते. सुरवातीला काँगे्रस व नंतर राष्ट्रवादीसोबत संघटना होती. पहिल्यांदाच एक गट भाजपासोबत गेला आहे. संघटनेमध्ये राजकीय फूट पडली असून ही दरी वाढत जावून संघटनेमध्ये फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नेत्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी कामगारांचा वापर करू नये अशा प्रतिक्रियाही काही कामगार व्यक्त करू लागले आहेत.

माथाडींची राजकीय ताकद
लोकसभेच्या सहा मतदार संघामध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये सातारा, ठाणे, माढा, मावळ, हातकणंगले, बारामती मतदार संघाचा समावेश आहे. यामधील सातारा, माढा व ठाणे मतदार संघामध्ये निवडणुकीचा निकाल फिरविण्याची ताकद कामगारांच्या मतांमध्ये आहे. यामुळे आघाडी व युतीने कामगारांची मते मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Political divide in Mathadi organization; Contrasts among leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.