कांदा-बटाटा मार्केट धोकादायक, एपीएमसीने दिली १ जूनची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:32 AM2019-04-29T01:32:56+5:302019-04-29T06:14:52+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट महापालिकेने धोकादायक घोषित केले आहे. दीड दशकापासून पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे.

The onion-potato market is dangerous, APMC has given June 1 deadline | कांदा-बटाटा मार्केट धोकादायक, एपीएमसीने दिली १ जूनची मुदत

कांदा-बटाटा मार्केट धोकादायक, एपीएमसीने दिली १ जूनची मुदत

नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट महापालिकेने धोकादायक घोषित केले आहे. दीड दशकापासून पुनर्बांधणीचा प्रश्न रखडला आहे. एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने १ जूनपासून मार्केटमधील व्यवहार थांबविण्याच्या नोटीस दिल्या आहेत. मार्केट स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू केले आहे; परंतु प्रशासनाकडे पुरेसे नियोजन नसल्याचे कारण देऊन व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. रखडलेली पुनर्बांधणी व स्थलांतराचे आव्हान यामुळे मार्केटचे अस्तित्वच धोक्यात आले असून, यामधून मार्ग काढण्यासाठी शासन व प्रशासनाची कसोटी लागली आहे.

मुंबईचे धान्य कोठार व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या बाजार समितीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मुंबईमध्ये शेकडो वर्षांपासून सुरू असलेला होलसेलचा व्यापार कायद्याच्या कक्षेत यावा, यासाठी शासनाने १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. वास्तविक यानंतर कृषी मालाच्या व्यापारास चालना मिळणे अपेक्षित होते; परंतु तेव्हापासूनच देशाच्या आर्थिक राजधानीमधील व्यापाराला घरघर लागली.

मुंबईमधील वाहतूककोंडी सोडविण्याच्या नावाखाली होलसेल व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सर्वच व्यापाºयांनी विरोध दर्शविला. नवी मुंबईचा विकास झालेला नसल्याने तेथे जाऊन व्यापार ठप्प होईल ही भीती सर्वांना वाटत होती. सरकारच्या आवाहनाला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो कांदा, बटाटा व लसूण व्यापाºयांनी. शासनाने १९८१ मध्ये मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित केले. येथे व्यापारासाठी सुसज्ज मार्केट उभारण्यात आले. व्यापाºयांना २४२ गाळे, लिलावगृह व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या; परंतु मार्केटचे बांधकाम चांगले झाले नसल्यामुळे २० वर्षांमध्ये बांधकाम खिळखिळे होण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी छताचा भाग कोसळू लागला. धक्के तुटले, धक्यांच्या वरील भागातील प्लॅस्टर कोसळू लागले. इमारतीला व पिलरलाही तडे जाण्यास सुरुवात झाली.

महापालिकेने २००३ मध्ये मार्केटमधील काही विंग धोकादायक घोषित केल्या, तेव्हापासून मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. व्यापाºयांनीही याविषयी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयानेही पुनर्बांधणी करण्याचे आदेश देऊन त्याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुनर्बांधणी करण्यात अद्याप यश आलेले नाही. मुंबईमधील रेल्वेचा पूल कोसळल्यानंतर त्याला संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरण्यात आले. यामुळे धोकादायक मार्केटचा वापर बंद करण्याचा निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना नोटीस दिल्या आहेत. १ जूनपासून मार्केटमध्ये व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्यापाºयांना लिलावगृह व मॅफ्को मार्केटजवळील भूखंडावर हलविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु स्थलांतरित ठिकाणी जागा कमी नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे.

कांदा-बटाटा मार्केटचा तपशील पुढीलप्रमाणे
7-92 हेक्टर क्षेत्रफळ
242 एकूण गाळे

प्रशासनाने मार्केटचा वापर थांबवून लिलावगृहासह मॅफ्कोजवळील भूखंडावर व्यापार स्थलांतरित करण्यासाठीच्या नोटीस दिल्या आहेत; परंतु स्थलांतरित ठिकाणची जागा अपुरी असून सुविधांचे नियोजन नाही. मार्केट पुनर्बांधणीविषयीही स्पष्टता नसून, आम्ही याविषयी न्यायालयात धाव घेतली आहे. - राजेंद्र शेळके, अध्यक्ष, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ 

संपूर्ण मार्केट एकाच वेळी स्थलांतर करण्याऐवजी पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावावा. विंगवाईज मार्केटची बांधणी करून टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात यावे. सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तोडगा काढण्यात यावा. - सुरेश शिंदे, बिगरगाळाधारक व्यापारी प्रतिनिधी

महानगरपालिकेने मार्केट धोकादायक घोषित केले आहे. भविष्यात मार्केट कोसळून जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी वापर थांबविण्याविषयी व्यापाºयांना नोटीस दिल्या आहेत. व्यापारासाठी लिलावगृह व मॅफ्कोजवळील भूखंडावर पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे; परंतु सद्यस्थितीमध्ये हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. - सतीश सोनी, प्रशासक, मुंबई बाजार समिती

Web Title: The onion-potato market is dangerous, APMC has given June 1 deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.