नववर्षाचे स्वागत, शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 02:37 AM2018-03-19T02:37:29+5:302018-03-19T02:37:29+5:30

शहरात पारंपरिक पध्दतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आली. लेझीम पथकांसह नवी मुंबईसह पनवेल परिसरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

New year's reception, organized events in the city | नववर्षाचे स्वागत, शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन

नववर्षाचे स्वागत, शहरात ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन

Next

नवी मुंबई : शहरात पारंपरिक पध्दतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी गुढी उभारण्यात आली. लेझीम पथकांसह नवी मुंबईसह पनवेल परिसरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नवी मुंबई प्रेस क्लबच्यावतीने वाशी येथील शिवाजी चौकात शेकडो नवी मुंबईकरांच्या उपस्थितीत महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते एकात्मतेची गुढी उभारु न हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयवंत सुतार यांच्या समवेत माजी खासदार संजीव नाईक, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, महापालिका सभागृह नेते रवींद्र इथापे, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, सुप्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव, शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, माजी नगरसेवक राजू शिंदे, शिवसेना उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे, नीलेश कुलकर्णी गुरु जी, रांगोळीकार श्रीहरी पवळे आदी उपस्थित होते.
गुढीपाडवा जरी हिंदूंचा सण असला तरीही नवी मुंबईत विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या शहरात सर्वधर्मसमभावाची भावना कायम जोपासण्यासाठी सर्वांचेच सहकार्य अपेक्षित असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी यावेळी स्पष्ट केले. तर नवी मुंबईत १९९५ पासून महापौरांच्या हस्ते गुढीपूजन करण्याची प्रथा आजही सुरू असल्याबद्दल माजी खासदार संजीव नाईक यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
हिंदू नववर्ष स्वागत समारंभात दिवाळे गाव येथील प्रसिध्द छाया कला सर्कल यांचेद्वारा ब्रास-बँडवर सादर करण्यात आलेल्या सुमधुर मराठी-हिंदी गीतांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. ब्रास-बँड वादन यावर्षीच्या पाडव्याचे विशेष आकर्षण ठरले. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या कुंचल्यातून शिवाजी चौकातील प्रदर्शनी दालनात कॅनव्हासवर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाच शहर स्वच्छता, महिला सक्षमीकरण, सामाजिक एकतेचा संदेश प्रसारित केला.
प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
सानपाडा येथील अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे सालाबादप्रमाणे नववर्ष स्वागत करण्यासाठी शोभायात्रा काढण्यात आली. यात पारंपारिक वेषभूषा केलेल्या महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तसेच महिलांचे लेझीम पथक, महिलांची बाईक रॅली, चित्ररथ हे या यात्रेतील खास आकर्षण ठरले.
घणसोली येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने देखील नववर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. घणसोली नाका ते घणसोली गावापर्यंत ढोल ताशांच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती .
ऐरोली सेक्टर १५ मध्ये शिवसेनेचे कमलाकर कदम यांच्या नेतृत्वाखाली मयूर पंडित युवा प्रतिष्ठान, बाल गोपाळ मित्र मंडळ व धर्मयोद्धा शंभूराजे युवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी शिवकालीन शस्त्रास्त्रे चालविण्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच हिंदुहृदयसम्राट या मराठी दिनदर्शिकेचे वितरण देखील यावेळी करण्यात आले. ऐरोली सेक्टर २ येथील सिध्दिगणेश मंदिर संस्कार भारती ऐरोली समिती, जय गणेश मित्र मंडळ, ज्ञानदीप ग्राहक संघ व नादगर्जा ढोल ताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रा काढण्यात आली. ऐरोली येथील श्री सिध्दिविनायक मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने देखील शोभायात्रेसह पालखी मिरवणूक काढण्यात आली. जुुहू गावातील गावदेवी मरीआई मंदिरापासून शिवाजी चौकापर्यंत ही स्वागत यात्रा काढण्यात आली. त्यामध्ये विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
>पनवेलमध्ये स्वागतयात्रा
गुढीपाडव्यानिमित्त नवीन पनवेलमध्ये उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्र ीडा मंडळाने नववर्ष स्वागत यात्रा २0१८ आयोजित केली होती. या वेळी मोठ्या संख्येने पारंपरिक पोषाखात महिला उपस्थित होत्या. सहभागी होणाºयांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. नवीन पनवेलमधील उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि
क्र ीडा मंडळाने रविवार १८ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता गुढीपाडव्यानिमित्त बांठिया हायस्कूल ते सीकेटी शाळा या मार्गावर शोभायात्रा आयोजित केली होती. आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, संतोष शेट्टी, राजश्री वावेकर, अजय बहिरा, सुशीला घरत, सभापती प्रकाश बिनेदार व नगरसेविका वृषाली वाघमारे आदी उपस्थित होते.
>महापौरांमधील कलाकार जागृत झाला...
वाशीतील शिवाजी चौकात गुढीपूजनाचा कार्यक्रम पार पडताच छाया कला सर्कल पथकाने सादर केलेल्या ब्रास बॅन्ड वादनावेळी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे महापौर जयवंत सुतार यांच्यातील ब्रास बॅन्डमधील कलाकार जागा झाला अन् महापौर सुतार यांनी ट्रम्पेट हाती घेऊन बॅन्डच्या सुरांमध्ये सूर मिसळून हम भी कुछ कम नही असे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी देखील महापौरांच्या ट्रम्पेट वादनावर नाचून त्यांना साथ दिली. महापौर सुतार यांच्यातील या कलाकाराला उपस्थित सर्व मान्यवरांसह नागरिकांनी कौतुकाची दाद दिली.
>घणसोली येथे आधार ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये परिसरातील महिला- पुरुषांसह युवकांनी मराठमोळ्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. संस्थेचे अध्यक्ष राजू गावडे, समाजसेवक सुरेश सकपाळ, शृंखला गावडे, योगेश चव्हाण, अशोक राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी वाशी ते घणसोली दरम्यान ही शोभायात्रा काढण्यात आली. नेरुळमधील चिड्रन आॅफ द वर्ल्ड इंडिया ट्रस्टच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते माजी महापौर सुधाकर सोनवणे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, सुरज पाटील, संस्थेचे अध्यक्ष गणेश शेळके यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये परिसरातील ३०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी राष्टÑीय एकात्मता या विषयावर चित्र काढून आपले विचार मांडले.
नव दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तुर्भे स्टोअर येथे सद्भावना कलश यात्रेचे आयोजन केले होते. त्यामध्ये एक हजार हुन अधिक महिला पुरुषांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे, विजय माने, दिलीप घोडेकर, महेश कोटीवाले, कमलेश वर्मा, अजय गुप्ता आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: New year's reception, organized events in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.