आरक्षणाच्या जनसुनावणीस मराठा समाज एकवटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 02:20 AM2018-05-17T02:20:04+5:302018-05-17T02:20:04+5:30

मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला.

 Maratha community united by reservation for reservation | आरक्षणाच्या जनसुनावणीस मराठा समाज एकवटला

आरक्षणाच्या जनसुनावणीस मराठा समाज एकवटला

Next

नवी मुंबई : मराठा आरक्षणासाठी आयोजित जनसुनावणीमध्ये नवी मुंबई व रायगडमधील पाच हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. तब्बल ९० संघटनांनी त्यांची निवेदने दिली असून, समाजाला लवकर आरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये मराठा संघटनांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, तज्ज्ञ सदस्य, सचिव व आयोगाचे अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये रायगड व नवी मुंबई परिसरासाठी जनसुनावणीचे आयोजन केले होते. सकाळपासूनच कोकण भवन परिसरामध्ये मराठा समाजाच्या संघटना व नागरिकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो कामगारांनी कोकणभवनसमोर उपस्थिती दर्शविली होती. पाच हजार कामगारांच्या सह्यांचे निवेदन यावेळी आयोगाला देण्यात आले. मराठा समाजामधील माथाडी कामगार व इतर कष्टकरी नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अनेकांवर बेकारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये पुरेसे उत्पादन होत नाही. यामुळे समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आरक्षणाचा निर्णय घेऊन समाजाला न्याय मिळावा अशी विनंतीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे रायगडमधील संघटक विनोद साबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवेदने सादर केली आहेत. मराठा स्वराज्य संस्था, खारघर मराठा समाज, मराठा अस्तित्व प्रतिष्ठान यांच्यासह तब्बल ९० संघटनांनी निवेदने सादर केली आहेत. जवळपास पाच हजार नागरिकांनी वैयक्तिक निवेदने सादर केली आहेत.
कोकण भवन परिसर मराठामय झाला होता. सुनावणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सुनावणीसाठी येणाºया नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवेशद्वारावरच टोकन नंबर देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मागासवर्ग आयोगाच्या सदस्याने सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. रायगड जिल्ह्याच्या कानाकोपºयातून नागरिक सुनावणीसाठी येत होते. सर्वांनी लेखी निवेदने सादर केली आहेत. निवेदन सादर करण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी गैरसोय होऊ नये व गोंधळ होऊ नये यासाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीचे पदाधिकारी सर्वांना सहकार्य करत होते. स्वयंसेवकांमुळे कुठेही वाहतूककोंडी झाली नाही. निवेदन सादर करण्यासाठी आलेल्यांमध्ये माथाडी नेते नरेंद्र पाटील, पोपटराव देशमुख, शिवाजीराव बर्गे, मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीमधील विनोद साबळे, अंकुश कदम, मोहन पाडळे, अ‍ॅड. राहुल पवार, मयूर धुमाळ, अभिजित भोसले, सूरज बडदे, राहुल गावडे, नीलेश मोडवे, अनिल गायकवाड, जनार्दन मोरे उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत शांततेत सुनावणी पार पडली.
>मोर्चाची आठवण
कोकण भवनमध्ये मराठा आरक्षणासाठी जनसुनावणी होती. या वेळी ९० पेक्षा जास्त संघटना व ५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी निवेदने सादर केली आहेत. सुनावणीसाठी रायगड व नवी मुंबईमधून हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे आले होते. यामुळे सर्वांना २१ सप्टेंबरच्या मूक मोर्चाची आठवण झाली. रायगड व नवी मुंबईमधील ७ लाख नागरिकांनी शांतपणे कोकणभवनवर मोर्चा काढून आरक्षणाची मागणी केली होती.
>कडक बंदोबस्त
सुनावणीदरम्यान कोकण भवन परिसरामध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारावर व इमारतीमध्येही पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते. परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना पोलीसही योग्य सहकार्य करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाºयांनी योग्य नियोजन केल्यामुळे सुनावणी शिस्तबद्धपणे पार पडली.
>मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्यक आहे. आरक्षण मिळाल्यास माथाडी कामगार व इतर कष्टकरी मराठा नागरिकांना त्याचा लाभ होईल. आयोगासमोर समाजाच्या स्थितीविषयी व आरक्षण का मिळावे याविषयी भूमिका आम्ही मांडली आहे.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते
आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने यापूर्वी मोर्चे काढले आहेत. समाजाच्या भावना आयोगासमोर मांडल्या आहेत. आता लवकरात लवकर आरक्षण जाहीर करून समाजाला न्याय मिळावा अशी सर्वांचीच इच्छा आहे.
- विनोद साबळे,
मराठा क्रांती मोर्चा

Web Title:  Maratha community united by reservation for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.