भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

By नामदेव मोरे | Published: April 29, 2024 06:49 PM2024-04-29T18:49:51+5:302024-04-29T18:50:11+5:30

फरसबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांची तेजी

Inflation of vegetables! Inflows decreased due to intense heat; The rate of spoilage of vegetables also increased | भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्यभर वाढलेल्या तापमानाचा भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घसरली असून, बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले असून, दुपारी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. बाजार समितीमध्ये सोमवारी ५३२ वाहनांमधून २०७९ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, यामध्ये चार लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.

मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाल्याचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर ९० ते १०० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबीचे दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. फ्लॉवरचे दर १२ ते १६ वरून १४ ते १८, घेवडा ३२ ते ४० वरून ३५ ते ४५ रुपये किलोंवर पोहोचले आहेत. शेवगा शेंगही २४ ते ३० वरून २५ ते ३५ रुपयांवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर, मेथी, पालक यांचे दरही वाढले आहेत. मुळा जवळपास मार्केटमधून गायब झाला आहे.

दुपारी भाजीपाल्याची दुकाने बंद

नवी मुंबईतील तापमानही ४२ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे शहरातील सर्व मंडईमधील भाजीपाल्याची दुकाने दुपारी १२ नंतर सायंकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. माल खराब होऊ नये यासाठी दुकानातील तापमान कमी ठेवण्यासाठी भाजीपाल्यावर पाण्याचा शिडकाव करावा लागत आहे. यानंतरही माल खराब होत असून, वजनावरही परिणाम होत आहे.

  • यांचे दर कडाडले- फरसबी, फ्लॉवर, घेवडा, काकडी, शेवगा शेंग, कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, वाटाणा.
  • या भाज्या नियंत्रणात- घेवडा, गवार, कारली, ढोबळी मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची
  • होलसेल व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव

भाजी - होलसेल - किरकोळ मार्केट

फरसबी - ९० ते १०० - १६० ते २००
घेवडा - ३५ ते ४५ - १०० ते १२०
काकडी - १६ ते २४ - ५० ते ६०
शेवगा शेंग २५ ते ३५ - ६० ते ८०
वाटाणा ९० ते ११० - १०० ते १२०

  • पालेभाज्यांचे प्रतीजुडी दर

भाजी- होलसेल - किरकोळ मार्केट

कोथिंबीर १४ ते १८ - २५ ते ३०
मेथी १४ ते १८ - २५ ते ३०
पालक १० ते १२ - २० ते २५

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला सुकण्याचे व खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात तेजीचे वातावरण आहे.
-स्वप्निल घाग, भाजीपाला व्यापारी

Web Title: Inflation of vegetables! Inflows decreased due to intense heat; The rate of spoilage of vegetables also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.