गगराणी यांची सिडकोतील सुपरफास्ट कारकीर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:47 AM2018-05-10T06:47:36+5:302018-05-10T06:47:36+5:30

सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची दोन वर्षांची कारकीर्द सुपरफास्ट ठरली. या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिल्याने खऱ्या अर्थाने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे.

Gagrani's Superfast career in CIDCO | गगराणी यांची सिडकोतील सुपरफास्ट कारकीर्द

गगराणी यांची सिडकोतील सुपरफास्ट कारकीर्द

Next

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची दोन वर्षांची कारकीर्द सुपरफास्ट ठरली. या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिल्याने खऱ्या अर्थाने नवी मुंबईला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. नवी मुंबई विमानतळाची उभारणी, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, साडेबारा टक्के योजनेचा निपटारा, मेट्रो, नैना, नेरूळ-उरण रेल्वे, पंधरा हजार घरांची उभारणी या प्रकल्पासह न्हावा-शिवडी सी लिंक, जेएनपीटी-दिल्ली फ्रंट कॉरिडोर आदी प्रकल्पांमुळे विस्थापित होणाºया प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान भूषण गगराणी यांच्यासमोर होते. राज्यातील अधिकाºयांत स्पीड मॅन म्हणून ओळखल्या जाणाºया गगराणी यांनी अवघ्या दोन वर्षांच्या कार्यकाळात या प्रश्नांचा निपटारा केला.
गेले वर्षभर बदलीची टांगती तलवार डोक्यावर घेऊन सिडकोचा यशस्वीरीत्या गाडा हाकणारे गगराणी यांची अखेर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताना गगराणी यांच्यासमोर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत मार्गी लावण्याचे प्रमुख आव्हान होते. भूसंपादन, पुनर्वसन आणि विमानतळबाधित दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावत त्यांनी हे आव्हान लीलया पेलवत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजनही करण्यात आले. त्याचबरोबर विकासकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रकल्प असलेल्या नैना क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यात ते यशस्वी झाले. यापूर्वी नैना क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणलेली नैना योजना फारसी प्रभावी न ठरल्याने गगराणी यांनी नगर योजनेच्या (टीपी स्किम) माध्यमातून या क्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय घेतला. त्याला राज्य सरकारने अलीकडेच मंजुरीही दिली आहे. त्यामुळे नैना टप्पा १ अंतर्गत येणाºया क्षेत्राचा ११ नगर योजनेच्या माध्यमातून आता विकास करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. त्याला शहरातील विकासकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शहराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या, परंतु विविध कारणांमुळे अडगळीत पडलेला नवी मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. या मार्गावर एकूण ११ स्थानके आहेत. त्यातील बहुतांशी स्थानकांचे काम पूर्ण झालेले आहे. पहिला टप्पा २0१९ पर्यंत पूर्ण करण्याची सिडकोची योजना आहे. त्यामुळे २0१९ अखेर मेट्रो व विमानतळाचे स्वप्न साकार होण्याची आशा निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारच्या हाऊस फॉर आॅल या धोरणानुसार पुढील काही वर्षात सिडकोने ५३ हजार ६४३ नवीन घरे बांधण्याचा निश्चय केला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांच्या प्रकल्पाचे प्राथमिक काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पातील घरांसाठी लवकरच सोडत काढण्याची सिडकोची योजना आहे. नेरूळ - उरण रेल्वेमार्गावर खारकोपर रेल्वेस्थानकापर्यंतचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, रेल्वे मार्गासाठी लागणारी गव्हाण परिसरातील चार हेक्टर जागा मागील १0 वर्षात संपादित झाली नव्हती. त्यामुळे या मार्गाचे काम काही प्रमाणात रखडले होते, परंतु गगराणी यांनी हा प्रश्न सुध्दा मार्गी लावल्याने भूसंपादनाचा तिढा सुटला आहे. तूर्तास बेलापूर ते खारकोपरपर्यंत लोकलसेवा सुरू करण्यास सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत.

विविध नागरी प्रश्नांवर घेतले सकारात्मक निर्णय

सिडकोतील दोन वर्षांच्या अल्प कालावधीत बड्या प्रकल्पांना गती देतानाच त्यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या जागेची लिज होल्डची मुदत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे नागरिकांना आता त्यांची घरे किंवा वाणिज्यिक जागा विक्री अथवा हस्तांतरित करताना सिडकोची परवानगी लागणार नाही. यशिवाय खारघर गोल्फ कोर्समध्ये सुविधा निर्माण करणे, कॉर्पोरेट पार्क सेंट्रल पार्कच्या विकासाचे काम गगराणी यांनी अंतिम टप्प्यात आणून ठेवले आहे. विशेष म्हणजे कित्येक वर्षे सिडकोच्या भूखंडावर झालेले अतिक्र मण काढून सदर भूखंड निविदेद्वारे विक्र ी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे सिडकोला हजारो कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील गावठाणांचा समूह विकास योजनेअंतर्गत करावे व बेलापूर गावाचा पायलट प्रोजेक्ट सिडकोने शासनाकडे सादर केला आहे.

लोकेश चंद्र आज पदभार स्वीकारणार

सिडकोचे मावळते व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिवपदाचा पदभार यापूर्वीच स्वीकारला आहे. तर सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र उद्या पदभार स्वीकारणार आहेत. मागील दोन वर्षात गगराणी यांनी विमानतळ, मेट्रो, नेरूळ-उरण रेल्वे मार्ग व नैना प्रकल्पांच्या कामाला गती दिली. त्यामुळे लोकेश चंद्र यांच्यासमोर फारशी आव्हाने शिल्लक राहिलेली नाहीत. असे असले तरी सुरू असलेले प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी लोकेश चंद्र यांना पार पाडावी लागणार आहे. विमानतळबाधित दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काही प्रमाणात रेंगाळला आहे. त्याला गती देवून लवकरात लवकर विमानतळ गाभा क्षेत्राचा ताबा संबंधित कंपनीला देण्याचे महत्त्वाचे आव्हान चंद्र यांच्या समोर आहे.

Web Title: Gagrani's Superfast career in CIDCO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.