शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

By योगेश पिंगळे | Published: May 4, 2024 02:38 PM2024-05-04T14:38:52+5:302024-05-04T14:39:09+5:30

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत.

Farmers market in Belapur, Nerul, Vashi etc. in Navi Mumbai city is in recession for weeks | शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

शेतकरी आठवडे बाजाराला उन्हाच्या झळा; ग्राहकांची कमी, शेतकऱ्यांना फटका

नवी मुंबई : शेतकरी आठवडे बाजारामुळे नवी मुंबईतील ग्राहकांना शेतमाल थेट मिळू लागला आहे. मात्र, कडक उन्हाचा फटका या बाजाराला बसला असून, शहरातील बेलापूर, नेरूळ, वाशी आदी ठिकाणी सुरू असलेला शेतकरी आठवडे बाजार मंदीत सुरू असून, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

दलालांची साखळी तोडून काढण्याच्या उद्देशाने शासनाने थेट ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचता करण्याची शेतकऱ्यांना आणि पर्यायाने ग्राहकांना दिलासा देणारी योजना अमलात आणली आहे. या आठवडे बाजारात किरकोळ व्यापाऱ्यांकडे मिळणाऱ्या भावापेक्षा कमी किमतीत व ताजा भाजीपाला, फळे मिळत असल्याने या बाजाराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे सुरू होणारा हा बाजार दुपारपर्यंत संपतो.

मागील काही आठवड्यांपासून कडक उन्हाळा सुरू झाला असून, नवी मुंबईतील तापमानात मागील काही दिवसात वाढ झाली असून नागरिक घराबाहेर निघण्याचे टाळत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षादेखील संपल्या आहेत. यामुळे अनेक नागरिक गावी गेले आहेत. ग्राहकांचे प्रमाण घटल्याने आठवडे बाजारात दुकाने थाटून बसलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्यावर आले असून, प्रवास खर्चदेखील सुटत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने त्याच मालाची ने-आण करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे अनेकवेळा शेतमाल फेकून द्यावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात अशाच समस्या उद्भवत असल्याने उरलेला शेतमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Web Title: Farmers market in Belapur, Nerul, Vashi etc. in Navi Mumbai city is in recession for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी