दिघा धरणाचे भिजते घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:50 AM2018-07-16T02:50:23+5:302018-07-16T02:50:27+5:30

ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्णपणे भरले आहे. वर्षभर भरपूर पाणी असूनही त्याचा वापर न होणारे दिघा हे देशातील एकमेव धरण आहे.

Digha Dam's Bhijate Ghongade | दिघा धरणाचे भिजते घोंगडे कायम

दिघा धरणाचे भिजते घोंगडे कायम

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्णपणे भरले आहे. वर्षभर भरपूर पाणी असूनही त्याचा वापर न होणारे दिघा हे देशातील एकमेव धरण आहे. ओसंडून वाहणाऱ्या धरणाच्या सुरक्षेकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून, पर्यटक बुडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर भरपूर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ब्रिटिशांनी नवी मुंबईमधील दिघा इलठाणपाडा येथे १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व १४.९५ मीटर उंचीचे धरण बांधले. नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे या धरणातील पाणी मे महिन्यातही आटत नाही; पण स्वातंत्र्यानंतर या धरणातील जलसाठ्याचा काहीच उपयोग करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटी-मोठी १८२१ धरणे आहेत. धरणांमधील पाणीवाटप व वापरावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असतात; पण पाण्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण ठरले आहे. पावसाळा सुरू होताच राज्यात सर्वात अगोदर हेच धरण भरले आहे. सद्यस्थितीमध्ये संरक्षण कठड्यावरून पाणी वाहत आहे. पर्यटकांनी या परिसरामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. रोज शेकडो पर्यटक या धरण परिसरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी जात आहेत. रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. धरण परिसरामध्ये सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, यामुळे अनेक तरुण धरणाच्या भिंतीवरील प्रवाहावर उभे राहून सेल्फी घेताना व फोटोसेशन करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्टंटबाजीमुळे धरण परिसरामध्ये अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
धरणाची मालकी रेल्वेची आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत फुटण्याची व धरण असुरक्षित झाल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरू लागले होते. रेल्वेच्या अभियंत्यांनी धरणाची पाहणी करून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले असून, दगडाचे बांधकाम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा यापूर्वीच दिला आहे. रेल्वेचे अधिकारी नियमित धरणाची पाहणी करत असले, तरी तेथील सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. धरण परिसरामध्ये पर्यटकांचा गोंधळ सुरू असतो. पावसाळ्यात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय धरणाच्या पायथ्याला झोपड्यांची संख्या वाढली आहे. पावसाचे पाणी वाढल्यास झोपड्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्याची मागणी केली आहे; पण त्या विषयी ठोस कार्यवाही झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी पाणी वापरावरून आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती; परंतु आता दोन्ही लोकप्रतिनिधींनीही या विषयावर मौन बाळगले आहे.
श्रेयासाठी फुकटची धडपड : दोन वर्षांपूर्वी दिघा धरणाचे पाणी नवी मुंबई व ठाणे शहराला देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. नवी मुंबई महानगरपालिकेकडे धरण हस्तांतर करण्याची महापालिकेची योजना होती. पण विद्यमान खासदार राजन विचारे व माजी खासदार संजीव नाईक यांनी धरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा दावा करून श्रेय मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु सद्यस्थितीमध्ये धरणातील पाण्याचा काहीही उपयोग होत नसून दोन्ही लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले आहे.पाणी असूनही घशाला कोरड : पाणी असूनही त्याचा वापर होत नसलेले दिघा हे राज्यातील व देशातील एकमेव धरण आहे. वर्षभर धरणातील पाणीसाठा पडून असतो. दुसरीकडे दिघा व ऐरोली परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात आठवड्यातून एक दिवस एमआयडीसी पाणीपुरवठा करत नाही. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो.
स्टंटबाज
पर्यटकांना रोखावे
दिघा धरण परिसरामध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. उत्साही तरुण धरणाच्या भिंतीवरील प्रवाहामध्ये उभे राहून सेल्फी व सामूहिक फोटोसेशन करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भिंतीवरून खाली व धरणात पडून पर्यटकांचा मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वेने या परिसरामध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. पोलिसांनीही गोंधळ घालणाºया पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पर्यटनाचीही संधी
दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर झाल्यास धरण परिसरातील जमिनीवर वनविभागाच्या मदतीने निसर्ग पर्यटन केंद्र उभारणे शक्य होणार आहे. महापालिकेकडून धरण हस्तांतरणासाठी काय कार्यवाही सुरू आहे याविषयी माहिती घेण्यासाठी मालमत्ता विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Digha Dam's Bhijate Ghongade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.