Composite response to the city of 'Bharat bandh' | ‘भारत बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद
‘भारत बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद

नवी मुंबई : काँग्रेस व मित्र पक्षांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेसच्या वतीने सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेतर्फे वाशीच्या शिवाजी चौकात लाँग मार्च काढून इंधन दरवाढीचा निषेध केला.
सोमवारच्या बंदमधून जीवनावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिक्षासह परिवहनच्या बसेस सुरळीत सुरू होत्या. महाविद्यालये आणि शाळाही नियमित सुरू होत्या. काही भागात किरकोळ स्वरूपात दुकाने बंद होती. मनसेचे अनंत चौगुले यांच्या आवाहनानंतर वाशी सेक्टर १७ मधील दुकाने आणि हॉटेल्स काही काळ बंद करण्यात आली. कोपरखैरणेतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते, तर घणसोलीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काही ठिकाणची दुकाने बंद केली. ऐरोलीत सुद्धा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. नेरूळच्या काही विभागात बंदचा प्रभाव दिसून आला. एपीएमसीच्या काही भागात सकाळी किरकोळ बंद पाळण्यात आला. त्यानंतर येथील व्यवहार सुरळीत सुरू होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस व मनसेच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह ते शिवाजी चौक दरम्यान मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
महापौर जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, सभागृह नेते रवींद्र इथापे, काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, माजी उपमहापौर अविनाश लाड, नगरसेवक संतोष शेट्टी, मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे, अनंत चौगुले, संदीप गलुगडे आदीसह सहभागी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.
मोर्चानंतर शिवाजी चौकात एकत्रित जमून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शिवाजी चौकात चूल पेटवून इंधन दरवाढीचा प्रतीकात्मक निषेध करण्यात आला.
>बंदसाठी शांततापूर्ण आवाहन
काँग्रेससह राष्ट्रवादी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना शांततेत आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी व्यापाºयांनी आपली दुकाने बंद केली. एपीएमसी मार्केटमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत व्यापाºयांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यालाही संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद करण्याचे प्रकार घडले.
इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने आपल्या मित्र पक्षांच्या बळावर भारत बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत उरणमध्येही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. वाढती महागाई आणि भडकत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर, इंटकचे जिल्हा अध्यक्ष किरीट पाटील, संध्या ठाकूर, अमरीन मुकरी, राष्टÑवादीचे तालुका अध्यक्ष मनोज भगत, महिला तालुका अध्यक्षा भावना घाणेकर, शेकापचे उरण पं. स. सभापती नरेश घरत, उपसभापती वैशाली पाटील, मनसेचे राज्य उपाध्यक्ष संदेश ठाकूर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकºयांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले.
>पनवेलमध्ये व्यापारी संघटनांचा पुढाकार
पनवेल : काँग्रेसने सोमवारी पुकारलेल्या बंदला पनवेलमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. पनवेलसह खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल शहरात यावेळी बंद पाळण्यात आला, तसेच काही व्यापारी संघटनांनी या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवला. काँग्रेससह राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी, शेकाप या पक्षांनी देखील बंदमध्ये उतरून भाजपाविरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली. सकाळी तालुक्यातील पदाधिकाºयांनी आपआपल्या विभागात सुरू असलेल्या दुकानदारांना दुकाने बंद करण्यास सांगितली. खारघर शहरात पेट्रोलपंपावर मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या इंधनाच्या किमतीचा निषेध करण्यासाठी पनवेल शहरात तालुका काँग्रेसच्या माध्यमातून पनवेल शहरात बाइक रॅली काढण्यात आली होती. काँग्रेसचे नेते महेंद्र घरत, तालुका अध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगरसेवक लतीफ शेख, माजी नगरसेविका निर्मला म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शहरात शिवाजी पुतळा परिसरात झालेल्या छोटेखानी सभेत प्रमुख नेत्यांनी मोदी सरकारच्या नीतीचा निषेध केला. यावेळी आमदार बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, कांतीलाल कडू, सुदाम पाटील, हेमराज म्हात्रे, श्रुती म्हात्रे आदी उपस्थित होते.


Web Title: Composite response to the city of 'Bharat bandh'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.