अतिक्रमणाविरोधात सिडको आक्रमक; रबाळेतील ६0 झोपड्या केल्या जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 05:35 AM2017-11-01T05:35:37+5:302017-11-01T05:35:48+5:30

सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी गोठीवली येथील सुरू असलेल्या एका नवीन बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तर रबाळे रेल्वे स्थानक परिसरातील ६0 बेकायदा झोपड्या या वेळी जमीनदोस्त करण्यात आल्या.

CIDCO aggressive against encroachment; 60 huts made of rubbish | अतिक्रमणाविरोधात सिडको आक्रमक; रबाळेतील ६0 झोपड्या केल्या जमीनदोस्त

अतिक्रमणाविरोधात सिडको आक्रमक; रबाळेतील ६0 झोपड्या केल्या जमीनदोस्त

Next

नवी मुंबई : सिडकोने बेकायदा बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मंगळवारी गोठीवली येथील सुरू असलेल्या एका नवीन बांधकामावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, तर रबाळे रेल्वे स्थानक परिसरातील ६0 बेकायदा झोपड्या या वेळी जमीनदोस्त करण्यात आल्या. सिडकोने अतिक्रमणांच्या विरोधात अचानक सुरू केलेल्या या आक्रमक कारवाईचा भूमाफियांनी चांगलाच धसका घेतला आहे.
महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयाअंतर्गत येणाºया गोठीवली गावात (सर्व्हे क्रमांक १३६/१३७) सुमारे ३00 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यात येत होते. यासंदर्भात सिडकोने संबंधित बांधकामधारकाला रीतसर नोटीस बजावली होती. त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मंगळवारी या बांधकामावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस.एस.पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर रबाळे रेल्वे स्थानक परिसरात उभारलेल्या सुमारे ६0 बेकायदा झोपड्याही या वेळी जमीनदोस्त करण्यात आल्या. अतिक्रमण विभागाचे नियंत्रक पी.बी. राजपूत, सहायक नियंत्रक गणेश झिने, व्ही.के. खडसे तसेच महापालिकेचे विभाग अधिकारी दत्तात्रय नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अनधिकृत इमारतीत घरे विकत घेऊ नयेत, असे आवाहन राजपूत यांनी केले आहे.

सानपाडा, जुईनगर स्थानकात कारवाई
रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमणांवरही सिडकोने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी सानपाडा आणि जुईनगर स्थानक परिसरातील पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यात आली. काही दिवासांपूर्वी बेलापूर आणि नेरूळ स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.

वाशीत महापालिकेची कारवाई
सिडकोपाठोपाठ महापालिकेनेही अतिक्रमणाच्या विरोधात कंबर कसली आहे. मंगळवारी वाशी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले व अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी सांगितले.

Web Title: CIDCO aggressive against encroachment; 60 huts made of rubbish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको