खारघरमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प : कार्पोरेट पार्क दृष्टिपथात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 03:43 AM2019-02-08T03:43:04+5:302019-02-08T03:43:21+5:30

मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केपीसी) उभारण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.

The ambitious project in Kharghar: The corporate park is in sight | खारघरमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प : कार्पोरेट पार्क दृष्टिपथात

खारघरमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प : कार्पोरेट पार्क दृष्टिपथात

Next

- कमलाकर कांबळे

नवी मुंबई - मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केपीसी) उभारण्याच्या दृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. या पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी सिंगापूरच्या इकॉनिमिक्स डेव्हलपमेंट बोर्ड (ईडीबी) या शासकीय कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. पुढील १५ दिवसांत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून सदर कंपनीबरोबर करार केला जाणार आहे.

सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात मोठमोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, जेएनपीटी, प्रस्तावित शिवडी सी लिंक, मेट्रो या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे एक नवे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या धर्तीवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार खारघर येथील सेंट्रल पार्कच्या बाजूला १२० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आला होता. जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण २४ वास्तुविशारदांनी भाग घेतला होता. त्यांना विकास आराखड्याच्या संकल्पना सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. स्पर्धात्मक प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या सात कंपन्यांच्या विकास आराखड्यांची सिडकोने निवड केली होती. निवड करण्यात आलेल्या या सात वास्तुविशारदांना आपले अंतिम आराखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राप्त झालेल्या सातपैकी एका उत्कृष्ट वास्तुविशारद व सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती गठीत केली होती. या समितीने सिंगापूरच्या ईडीबी डिझायनर या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. पुढील १५ दिवसांत संबंधित कंपनीबरोबर सामंजस्य करार केला जाणार आहे. त्यानंतर नवी मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणाऱ्या कार्पोरेट पार्कचा अत्याधुनिक दर्जाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले जाईल, असे सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यावर सिडकोचा भर
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यावर भर दिला आहे. सिडकोचा पदभार स्वीकारताच त्यांनी नेरुळ-उरण रेल्वे मार्गाचा पहिल्या टप्पा प्रवाशांसाठी खुला केला. त्यानंतर मेट्रोच्या कामासाठी नवीन कंत्राटदारांची नेमणूक केली. महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्पाच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात यशस्वी झाले. ग्रामस्थांच्या स्थलांतराचा प्रश्न मार्गी लावला. आता शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या खारघर कार्पोरेट पार्क या प्रकल्पावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.

सिडकोने स्पर्धात्मक प्रक्रियेतून मागविलेल्या प्रस्तावाला सिंगापूर, नेदरलँड, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्समधील वास्तुविशारद कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. तर नवी दिल्ली, मुंबई व बंगळुरूमधील काही वास्तुविशारदांनी परदेशी कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करून आपले आराखडे सादर केले होते. या स्पर्धात्मक प्रक्रियेत १४ आंतरराष्ट्रीय तर १३ राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी भाग घेतला होता. या सर्वांना मागे टाकत सिंगापूरच्या ईडीबी या शासकीय कंपनीने बाजी मारली.

केपीसीची वैशिष्ट्ये
पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट
बहुतांशी इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्याची संकल्पना
परदेशातील नाइट लाइफच्या धर्तीवर दुकाने व व्यावसायिक गाळ्यांची रचना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून
१२.५ किलोमीटरचे अंतर
खारघर रेल्वे स्थानकापासून केवळ ५ कि.मी.चे अंतर
मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर
सायन-पनवेल महामार्गापासून १.५ कि.मी. अंतर
 

Web Title: The ambitious project in Kharghar: The corporate park is in sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.