टू-जी घोटाळा झालाच नव्हता! सर्व आरोपी निर्दोष; भाजपाचे आरोप निघाले फुसके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:54 AM2017-12-22T03:54:11+5:302017-12-22T03:54:53+5:30

संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असा भाजपाने गाजावाजा केलेल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी टेलिकॉममंत्री ए. राजा व राज्यसभा सदस्या कणिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींना विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्त केले.

Two -G scam did not happen! All accused innocent; The BJP's allegations have been blamed | टू-जी घोटाळा झालाच नव्हता! सर्व आरोपी निर्दोष; भाजपाचे आरोप निघाले फुसके

टू-जी घोटाळा झालाच नव्हता! सर्व आरोपी निर्दोष; भाजपाचे आरोप निघाले फुसके

googlenewsNext

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असा भाजपाने गाजावाजा केलेल्या २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात माजी टेलिकॉममंत्री ए. राजा व राज्यसभा सदस्या कणिमोळी यांच्यासह सर्व १७ आरोपींना विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्त केले. ‘संपुआ’ सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला मोठी चपराक बसली तर काँग्रेसला यामुळे नवा हुरूप आला आहे.
सीबीआयने सादर केलेले साक्षी-पुरावे आणि आरोपींचा बचाव यांचे तब्बल १,८३५ परिच्छेदांमध्ये सविस्तर विश्लेषण करून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी निष्कर्ष काढला की, सरकार पक्ष आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यास सबळ पुरावा न्यायालयापुढे आणू शकले नाही, हे मी नि:संदिग्धपणे जाहीर करतो.

सीबीआयने सादर केलेले आरोपपत्रच सदोष तथ्यांवर आधारलेले आहे व त्यासाठी सरकारी फायलींमधील रेकॉर्डचा अर्धवट व सोयीचा आधार घेतला, असेही न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाने म्हटले की, गोंधळ आणि संभ्रमाची स्थिती निर्माण होण्यास टेलिकॉम विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी बनविलेले नियम व मार्गदर्शिका एवढ्या क्लिष्ट आणि बोजड भाषेत आहेत की इतरांचे तर सोडाच, पण अधिकाºयांनाही त्यांचे आकलन झाल्याचे दिसत नाही. राजा, कणिमोळी, शाहीद बलवा व आसिफ बलवा यांच्यशिवाय नऊ कंपन्यांसह एकूण १९ आरोपींवर ईडीने
मनी लाँड्रिंगचा खटला दाखल केला होता. हा आरोप ठेवण्याइतकाही पुरावा नाही, असे नमूद करत न्यायालयाने सर्वांना निर्दोष मुक्त केले.

सहा वर्षे प्रतीक्षा-
निर्दोष सुटकेबद्दल राहुल गांधी यांनी माझे अभिनंदन केले आहे. मला प्रकाश बघायला मिळेल असा माझा विश्वास होता. या दिवसाची मी गेल्या सहा वर्षांपासून वाट बघत होते.
- कणिमोळी, राज्यसभा सदस्य, द्रमुक
आरोप खोटेच-
माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटे होते, हे आता सिद्धच झाले आहे. शिवाय टू-जी स्पेक्ट्रम वाटपात घोटाळा झाला आणि त्यामुळे सरकारचे कोट्यवधींचे नुकसान झाले, हे आरोपही निराधार व असत्य असल्याचे उघड झाले आहे.
- ए. राजा, माजी
दूरसंचारमंत्री व द्रमुकचे नेते
न घडलेला घोटाळा असा होता...
खासगी टेलिकॉम कंपन्यांना २ जी स्पेक्ट्रमचे वाटप करताना मोठा घोटाळा झाला आणि त्यामुळे सरकारचे १.७६ लाख कोटी रुपयांचे संभाव्य नुकसान झाले असा अहवाल कॅगने (विनोद राय) २०१० मध्ये दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१२ मध्ये दिले गेलेले १२२ टेलिकॉम परवाने रद्द केले.
सीबीआयने भादंवि व भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वये दोन खटले दाखल केले तर ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये एक खटला दाखल केला.
तत्कालीन टेलिकॉममंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कणिमोळी त्या खात्याचे सचिव सिद्धार्थ बेहुरा व राजा यांचे स्वीय सचिव आर. के. चांदोलिया यांच्यासह स्वान टेलिकॉम, युनिटेक वायरलेस आणि रिलायन्स टेलिकॉम
या कंपन्या आणि त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना आरोपी केले गेले होते.
खटले चालविण्यासाठी सुप्रीम कोर्टाने ओ. पी. सैनी यांची न्यायाधीश म्हणून व ज्येष्ठ वकील आनंद ग्रोव्हर यांची विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नेमणूक केली होती.
निकाल देणारे न्यायाधीश सैनी म्हणाले,
हे केवळ अफवा, गावगप्पा व आडाखे
निवडक तथ्यांची आकर्षक मांडणी करून आणि वास्तवाची अकल्पनीय पातळीवर अतिशयोक्ती करून काही लोकांनी या घोटाळ्याचे कुभांड रचले. कोणीतरी विधिसंमत पुरावे घेऊन येईल, याची मी वाट पाहत होतो गेली सात वर्षे. अगदी उन्हाळ्याच्या सुटीतही मी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत रोज कोर्टात बसत होतो. पण सर्व व्यर्थ.
एकही जण आला नाही. असे दिसते की, प्रत्येकाने अफवा, गावगप्पा व आडाखे यावर आपापली धारणा करून घेतली होती. परंतु अशा प्रकारच्या जनतेच्या मनोधारणेला न्यायप्रक्रियेत कोणतेही स्थान नाही.
- ओ. पी. सैनी, सीबीआय विशेष न्यायाधीश

Web Title: Two -G scam did not happen! All accused innocent; The BJP's allegations have been blamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.