ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 21 - मुस्लिम पुरुषांबरोबर विवाह करणा-या हिंदू महिलांना ट्रिपल तलाकचा नियम लागू करु नये अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. हिंदू महिलांची ट्रिपल तलाकच्या जाचातून सुटका करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. 
 
ट्रिपल तलाकचा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असल्यामुळे या विषयामध्ये सुनावणी करणार नाही असे मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल आणि न्यायमूर्ती अनू मल्होत्रा यांनी सांगितले. ट्रिपल तलाकच्या मुद्यावर सुनावणी करण्यासाठी विशेष खंडपीठ बनवण्यात आले आहे. त्यामुळे या खंडपीठाकडून जो नियम बनवला जाईल तो सर्व महिलांना लागू होईल असे न्यायालयाने सांगितले. 
 
सर्वोच्च न्यायालयाने बनवलेले पाच सदस्यीस खंडपीठ येत्या 11 मे पासून ट्रिपल तलाकच्या मुद्यावर नियमित सुनावणी घेणार आहे. कायदा सर्व महिलांना समान संरक्षण देणारा असला पाहिजे असे न्यायालयाने सांगितले. ट्रिपल तलाकमुऴे मुस्लिम पुरुषांबरोबर लग्न करणा-या हिंदू महिलांचे हाल होत आहेत असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. विजय कुमार शुक्ला यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. विशेष विवाह कायद्यातंर्गत आंतरजातीय विवाहांना नोंदणी बंधनकारक करण्याचीही मागणी त्यांनी याचिकेतून केली होती.