सपा-बसपा आघाडीची आज अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 03:50 AM2019-01-12T03:50:00+5:302019-01-12T03:50:30+5:30

मायावती, अखिलेश एकत्र; दोन्ही पक्ष प्रत्येकी ३७ जागा लढविणार

Today's official announcement of SP-BSP leader | सपा-बसपा आघाडीची आज अधिकृत घोषणा

सपा-बसपा आघाडीची आज अधिकृत घोषणा

Next

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव व बहुजन समाज पार्टी (बसपा)च्या प्रमुख मायावती हे उद्या, शनिवारी उत्तर प्रदेशातील आघाडीची घोषणा करणार आहेत. त्या आघाडीत काँग्रेस असणार नाही; मात्र सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसतील.

राज्यात लोकसभेच्या ८० जागा असून, सपा व बसपा प्रत्येकी ३७ जागा लढविणार आहेत. राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) व निशाद पार्टी या लहान पक्षांनाही आघाडीत घेण्यात येऊन त्यांना काही जागा दिल्या जातील, असे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांच्या जागांबाबत बोलणी व्हायची आहेत. भाजपा व मित्र पक्षांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशातील ७३ जागा जिंकल्या होत्या. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तम यश मिळवायचे असल्यास सपा व बसपाची आघाडी होणे आवश्यक आहे हे या पक्षांना कळून चुकले होते. त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला ठेवून ते आता मित्रपक्ष बनले आहेत. राष्ट्रीय लोकदल हा या आघाडीत सामील होणार असल्याचे सांगितले जात असले तरी अखिलेश यादव, मायावती शनिवारी घेणार असलेल्या पत्रकार परिषदेला हजर राहण्यासाठी या पक्षाच्या नेत्यांना अद्याप निमंत्रण आलेले नाही. या पक्षाने लोकसभेच्या सहा जागा मागितल्या असल्या तरी त्याला फक्त दोन ते तीनच जागा देण्यात येतील, असे समजते.

काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार
लोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये स्वबळावर लढण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे नेते व माध्यम समन्वयक राजीव बक्षी यांनी म्हटले आहे. या निवडणुकांत समविचारी पक्षांची महाआघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. कोणत्या पक्षाबरोबर आघाडी करायची याचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Today's official announcement of SP-BSP leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.